शिवानीने बोलायला सुरुवात केली. ‘‘आंटी, आम्हाला ते व्हिडीओ फुटेज काल बघायला मिळालं. आणि त्यात सिमरनने तो मोबाइल सर्वात शेवटी खिशात टाकलेला दिसला आहे.’’ ..आणि त्या क्षणी त्या त्रिकोणी कुटुंबाच्या पायाखालची जमीनच खचली.

‘‘मम्मी, मी फिरून येते गं मैत्रिणीबरोबर, एका तासात येतेच.’’ सिमरनने स्नीकर चढवता चढवताच आईला इंटिमेशन दिली. ‘‘अगं, अगं सीमू, कोणाबरोबर जातीयेस?’’ मनीषाच्या प्रश्नाचे उत्तर जिन्यावर खाली धडधडत जाणाऱ्या सिमरनच्या पायांच्या पडसादाने दिले. ‘‘लवकर ये गं.’’ हे वाक्य फक्त मनीषाच्या मनाच्या समाधानासाठीच होतं. ‘‘काय हे घाई घाई सगळीकडे’’ पुटपुटत मनीषाने दरवाजा बंद केला आणि ‘होम मिनिस्टर’साठी टीव्ही लावून रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. नेहमीप्रमाणे साडेसात वाजताची डोअर बेल धनंजयचीच होती. फ्रेश होऊन त्याने सोफ्यावर गरम गरम चहाचे घोट घेत पेपर वाचायला सुरुवात केली आणि स्वयंपाकघरात शेगडीवर भाजीची फोडणी आणि ओटय़ाच्या बाजूला मनीषा चुचुरायला सुरुवात झाली. जिव्हाळ्याचा विषय साहजिकच होता सिमरन.
‘घरोघरी मातीच्या चुली’ म्हणीप्रमाणे जवळ जवळ सर्वच ‘टीन एजेड मुली’ असलेल्या घरातील सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय असतो ‘नवीन जनरेशनचे बेबंद वर्तन’ आणि हेही घर त्याला अपवाद कसे असेल. विषयांची सुरुवात ‘‘सिमरन कुठे गेली आहे गं?’’ या धनंजयच्या साध्या सरळ प्रश्नाने झाली होती. ‘‘कुठे असणार, हुंदडते आहे मित्र-मैत्रिणींबरोबर. सहामाही परीक्षा एवढी जवळ आली आहे तरी काही वाटतंय का बघ ना. अभ्यास कमी झाला तरी चालेल. फिरणे काही कमी करायचे नाहीये.’’ मनीषाच्या वाक्याला काळजीची झालर होती.
धनंजय, मनीषा आणि त्यांची एकुलती एक- उत्फुल्ल टीन एजेड मुलगी सिमरन असे आहे हे त्रिकोणी कुटुंब. सध्याच्या जमान्यातील नुक्लिअस फॅमिलीचे रीप्रेझेन्टेटीव. धनंजय एका मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनीअर तर मनीषा ‘पूर्वीची’ कॉमर्स पोस्टग्रॅजुएट. घरातील वातावरण- टिपिकल कॉन्झरव्हेटिव मराठी. धनंजय हा गोष्टी लॉजिकलपणे हाताळण्यावर विश्वास ठेवणारा तर मनीषा पटकन हायपर होणारी आणि त्यांच्या पुढच्या जनरेशनशी दुवा आणि जनरेशन गॅप म्हणजे त्यांची मुलगी सिमरन मित्र-मैत्रिणींमध्ये रमणारी. एकुलतीएक असल्याने थोडेसे लाड व जास्त लक्ष/ काळजीच्या गुंत्यात अडकलेली. तशी साधी-सरळ पण मेंदूला जास्त ताण न देणाऱ्यांच्या कॅटेगरीमधील.
घडय़ाळाचा काटा सव्वाआठकडे सरकू लागला तसे मनीषाचे सीरियल्सवरचे आणि धनंजयचे लॅपटॉपवरील लक्ष विचलित व्हायला सुरुवात झाली. सिमरन मनीषाच्या मोबाइल कॉल्सला रीस्पांड करत नव्हती. ‘‘अगं, नेहमीप्रमाणे सायलेंटवर असेल.’’ धनंजयचे असर्टीव स्टेटमेंट खरं तर त्यालाही कन्व्हीन्स करत नव्हते. शेवटी साडेआठ वाजता सिमरनचा कॉल आला. ‘‘पप्पा, मी घराजवळच आहे. माझ्या मैत्रिणीचा मोबाइल हरवलाय आणि आम्ही तो शोधतो आहोत. थोडय़ा वेळात येतेच.’’ सिमरनचा सूर दबका होता. काही रिस्पांस न घेता तिने फोन कट केला होता. आता मनीषा थोडी हायपर होऊ लागली होती. ‘‘अग्ां दहा मिनिटे वाट बघू या. नाहीतर मी तिला पिकअप करून घेऊन येईन.’’ धनंजयने तिला धीर दिला.
पावणेनऊ वाजले आणि धनंजयने सिमरनला फोन केला. ‘‘सिमरन, मी तुला घ्यायला येतोय. तू कुठे आहेस ते सांग.’’ त्याच्या आवाजातील जरब ऐकून सिमरनला काहीही उत्तर देण्याचा धीर झाला नाही.
धनंजयने अंधाऱ्या गल्लीतून याआधी न बघितलेल्या मैत्रिणीबरोबर येणाऱ्या सिमरनला पिकअप केले. ‘‘कोण गं ही?’’ धनंजयने विचारले.
‘‘अरे, माझ्या मैत्रिणीची फ्रेंड आहे.’’ इति सिमरन.
‘‘चल सिमरन, आपण जरा तुम्ही गेलेल्या वाटेने जाऊन येऊ. फोन मिळतोय का हेही बघता येईल आणि तुझ्या मैत्रिणीलाही भेटता येईल.’’ धनंजयला सिमरनने सांगितलेल्या गोष्टी पडताळून पाहायच्या होत्या. सिमरनने दिलेल्या डायरेक्शननुसार बाइक गल्लय़ा धुंडाळत मुख्य रस्त्यावरील प्रसिद्ध कॉफी-शॉपच्या बाजूला उभी राहिली. तिथे १५-१७ वर्षांच्या सहा-सात मुलांमुलींच्या घोळक्यामध्ये असलेल्या एका मुलीला समजावत होता. तीच मुले असावीत ह्या अंदाजानुसार धनंजयने बाइक वळण घेत त्यांच्या बाजूला उभी केली. घोळक्यातील मुले-मुली बघून धनंजय जरा धास्तावला होता. महागडय़ा बाईक, हाता-खांद्यावरील टॅटू, डोक्यावरील आणि दाढीच्या केसांचे विचित्र आकार, रीप्ड ऑफ जीन्स आणि मॉडर्न टॉप्समधील मुले-मुली तिच्या नेहेमीच्या ग्रुपमधली वाटत नव्हती.
‘‘ही शिवानी, हिचाच फोन हरवला होता.’’ घोळक्याच्या मधे असलेल्या मुलीशी सिमरनने ओळख करून दिली.

शिवानीबरोबर तिच्या दोन मैत्रिणी घरात आल्या. मनीषा आणि सिमरनही तोपर्यंत हॉलमध्ये आले. सिमरनचा चेहरा शिवानीशी प्रश्नार्थक सवाल करत होता.

‘‘अंकल, कॉफी-शॉपमध्ये असेपर्यंत होता मोबाइल. पण बाहेर आल्यावर लक्षात आले की माझ्याकडे नाहीये.’’ हे सांगताना शिवानीची हार्ड डिस्क डोक्यातील डेटा धुंडाळत आहे हे कळत होते. ‘‘शॉपमध्ये सीसी कॅमेरा असेल ना? त्याची हेल्प घ्या जमलं तर..’’ धनंजयने सूचना केली. ‘‘अहो, त्याच्यासाठीच उभे आहोत अंकल. टेक्निशिअन येणार आहे.’’ इमो स्पाईक केलेल्या मुलाने उत्तर दिलं. धनंजयनी बाईकला किक मारली. सिमरन मात्र घरी गेल्यावर होऊ घातलेल्या सीनमुळे जरा भांबावलीच होती.
‘‘काय गं, ही कुठली गं मुलं? आणि त्या शिवानीचे नाव कधी तुझ्याकडून फारसं नाही ऐकलं.’’ बाइकवरून जाता जाताच धनंजयचा पहिला प्रश्न आला. घरी मनीषा जास्त हायपर न होण्यासाठी सर्व गोष्टींचा बॅकग्राउण्ड घेऊन स्ट्रॅटिजी ठरवणं जरुरी होते.
‘‘अरे, ती शिवी, सॉरी शिवानी माझ्या बायोच्या टय़ूशनला येते आणि ते बाकी तिचे फ्रेंड्स होते. आम्ही फिरत असताना भेटले. त्यांनी ठरवलं म्हणून कॉफीशॉपमध्ये गेलो होतो.’’ सिमरनचे हे उत्तर समाधानापेक्षा जास्त प्रश्नच उभे करत होते.
‘‘माहिती नसलेल्या मुलांबरोबर जाऊ नये गं. किती वेळा सांगितलंय.’’
‘‘पप्पा, माहिती आहे. पण ते मध्येच भेटले तर मी काय शिवानीला सोडून जायचं का?’’ सीमरनचे उत्तर आले. घरी गेल्यावर जास्त चर्वीतचर्वण न होता विषय थोडक्यातच संपला.
तीन-चार दिवस झाले. सहसा हरवलेला मोबाइल परत मिळण्याची शक्यताच नसल्यामुळे तो विषय कोणाच्याही डोक्यात नव्हता. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी दाण्याच्या आमटीची तयारी करत असताना सिमरन गोंधळलेल्या चेहऱ्याने ड्रॉइंग रूममध्ये आली.
‘‘पप्पा, त्या दिवशी भेटली होती ना, ती शिवानी. शंकराच्या दर्शनासाठी देवळात जाणार आहे आणि मलाही बोलावतेय आहे. जाऊ?’’
सिमरनच्या बोलण्यावर धनंजय थोडासा कोडय़ात पडला. त्याच्या लॉजिकमध्ये ही गोष्ट बसत नव्हती. मनीषा अ‍ॅप्रनला हात पुसत बाहेर आली.
‘‘ते मित्रही आहेत का बरोबर?’’ ह्य तिच्या प्रश्नाला सिमरनने हळूच मानेनेच होकार दिला.
‘‘ते मित्र असतील तर त्यांना ‘आम्ही बाहेर जाणार आहोत’ असे सांग.’’ धनंजयने आपला निर्णय सांगितला. होकारार्थी मान हलवत सिमरनने मोबाइल उचलला. थोडेसे टेन्स झालेले वातावरण नॉर्मल होऊ लागले असतानाच डोअर बेल वाजली. दारात त्याच मुलांचा घोळका उभा होता. धनंजयच्या चेहऱ्यावर एक प्रश्नार्थक आठी उमटली होती. पण ती सरळ करण्याचा प्रयत्न करत त्याने त्या मुलांना सिमरन बाहेर जात आल्याचे परत एकदा सांगितले. पण मुलांचा मूड वेगळाच असल्याचे कळत होते. शिवानीबरोबर तिच्या दोन मैत्रिणी घरात आल्या. मनीषा आणि सिमरनही तोपर्यंत हॉलमध्ये आले. सिमरनचा चेहरा शिवानीशी प्रश्नार्थक सवाल करत होता.
‘‘अंकल, आंटी, तुमच्याशी थोडं बोलायचंय.’’ शिवानीच्या मैत्रिणीने अडखळत विषयाला सुरुवात केली. सगळ्यांनाच बसायची खूण करत धनंजय सोफ्यावर टेकला. वातावरण चांगलंच टेन्स झालं होतं. शिवानीने ओठांवरून जीभ फिरवत बोलायला सुरुवात केली. ‘‘आंटी, आम्हाला ते व्हिडीओ फुटेज काल बघायला मिळालं. आणि त्यात सिमरनने तो मोबाइल सर्वात शेवटी खिशात टाकलेला दिसला आहे. त्या दिवशी आम्ही नंतर सर्व मुलांची झडती घेतली होती, पण मुलींची नव्हती. आणि आता टेक्निशियननेही कन्फर्म केलंय आणि आम्ही सर्वानीच बघितलं आहे. फोन सिमरननेच घेतला आहे.’’ आणि त्या क्षणी त्या त्रिकोणी कुटुंबाच्या पायाखालची जमीनच खचली. आत्तापर्यंत उभी असलेली मनीषा गपकन सोफ्यावरच बसली. धनंजयही क्षणभर दिग्मूढ झाला. सिमरन तर रडायच्या बेतात आली होती. दोघींना शांत करत धनंजयने शिवानीला त्या गोष्टी परत वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या. पण शिवानी व तिच्या मैत्रिणी व्हिडीओ फुटेज आणि टेक्निशिअनचा दाखला देत सिमरनकडेच बोट दाखवत होत्या.
‘‘अंकल, आम्ही पोलिसांपर्यंत जाणार नाही. पण माझ्या पप्पांना माझा मोबाइल हरवल्याचं सांगितलं नाहीये. तर.’’
‘‘मोबाइल मी तुला घेऊन देईन. आत्ताच. डोंट वरी. तुम्ही ते फुटेज बघताना आम्हाला बोलवायचं होतं ना. आणि सिमरन हे करणं शक्यच नाही. मीच तिला त्या दिवशी पिक-अप केलं होतं आणि त्या वेळेस तुमच्यापैकी कोणीतरी तिच्याबरोबर होतं. काहीतरी नक्कीच घोळ आहे. मी बघतो काय करायचं ते आणि तुम्ही सगळे आता अभ्यासाकडे बघा बरं.’’ हे सांगताना धनंजयच्या लॉजिकची गाडी धावायला लागली होती. एका तासात तसाच नवीन मोबाइल देण्याचं आश्वासन देऊन धनंजयने सर्वाची बोळवण केली. इथे तोपर्यंत मनीषा मुलीवरच्या चोरीच्या आळामुळे आणि नंतर होऊ शकणाऱ्या नाचक्कीच्या भीतीने हादरलेली दिसत होती. सिमरन तिने तो मोबाइल चोरला नसल्याचे रडत रडत पण निक्षून सांगत होती. परिस्थितीचा आढावा घेत धनंजयने सिमरनला ‘‘तू नक्की तो मोबाइल चोरला नाहीयेस ना?’’ हा एकच प्रश्न विचारला. सिमरनने त्यालाही तेवढय़ाच कळकळीने ‘नाही’ म्हणून सांगितले. ‘‘ठीक आहे. आपण बघूया काय करायचं ते.’’ सिमरनला धीर देत धनंजय प्रायोरिटी फिक्स करायला लागला.

त्यानंतरच्या फुटेजमध्ये हे स्पष्ट झाले की तिथेच घुटमळणाऱ्या एका गिऱ्हाइकाने पाच मिनिटानंतर तो फोन हळूच उचलून पिलरच्या मागे जाऊन खिशात सरकवला होता.

सर्वप्रथम मोबाइल खरेदी आणि नंतर व्हिडीओ फुटेज बघणं असा अनुक्रम पक्का करून बाइकला किक मारली. मोबाइल विकत घेणं अवघड नव्हतेच, पण व्हिडीओ फुटेज लगेच बघणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. तरी बरं कॉफी शॉपमध्ये दुपार असल्याने विशेष गर्दी नव्हती. झालेल्या प्रसंगाचा बॅकग्राउंड देताना ‘त्या मुलीचे वडील का?’ असा काउंटरवरील माणसाचा लूक धनंजयला अस्वस्थ करून गेला.
‘‘काल रात्री आली होती ती मुलं साडेदहा वाजता. शटर बंद करण्याआधी. टेक्निशिअननी एवढय़ा घाईतही त्यांना फुटेज दाखवलं. पण आत्ता आमच्याकडे केबल नाहीये आणि ती घेऊन टेक्निशिअन रात्री येऊ शकेल कदाचित. कारण आज सुट्टी आहे ना. नाहीतर उद्या दुपारी नक्की बोलावतो.’’ काउन्टरवरील माणसाच्या या वाक्याने धनंजयला धक्काच बसला. हे ओझं घेऊन दोन दिवस काढायचं या कल्पनेने तो थोडासा खचलाच. पण सहजासाहजी हार न मानण्याच्या अ‍ॅटिटय़ूडमुळे धनंजयने दुसरा अव्हेन्यू शोधायला सुरुवात केली. ‘‘मी केबल आणली तर तुम्ही फुटेज दाखवू शकाल का?’’ ह्य प्रश्नावरचं त्या माणसाचे होकारार्थी उत्तर ऐकून धनंजयला एक वेगळाच उत्साह आला. जवळच असलेल्या कॉम्प्युटर शॉपमधून ती केबल विकत घेऊन हार्डवेअरची जोडणी केली. अखेरीस फुटेज सुरू झालं. तो आणि काउंटरवरची बाकी मुलंही टीव्ही मॉनिटरभोवती घोळका करून कॅमेऱ्याने टिपलेल्या सर्व मूव्हमेंट्स बारकाईने बघत होती. सिमरन आणि तिच्या बाजूस बसलेली सर्व मुलं मजेत गप्पा मारत असताना दिसत होती. शिवानीने सिमरनला दिलेला मोबाइलही दिसत होता. सर्वजण उठत असतानाच सिमरनच्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये नेमका एक मित्र आल्यामुळे सिमरनच्या पुढच्या हालचाली ब्लॉक झाल्या होत्या.
‘‘बघा, ह्य मुलीने हातातील मोबाइल खिशात टाकला आणि सर्वजण निघून गेले. टेक्निशिअननेही काल हेच दाखवलं.’’ काउंटरवरील माणूस म्हणाला.
‘‘अरे, तो मुलगा मधे आला असताना तुम्ही कसं म्हणू शकता की ह्यच मुलीने मोबाइल घेतला? हा एव्हिडन्स काही कन्क्लुझिव नाहीये.’’ विचारमग्न अवस्थेत धनंजय पुटपुटला.
‘‘सोपं आहे, ते टेबल आम्ही बऱ्याच वेळानी क्लियर केलं. तरी त्यावर आम्हाला कोणालाही मोबाइल दिसला नाही.’’ होम्सने ‘एलिमेंटरी, डीअर वॉटसन’ म्हणावं अशा आविर्भावात काउंटरवरील माणूस म्हणाला.
‘‘मोठ्ठा झोल आहे, गोष्टी क्लियर नसताना एखाद्यावर तुम्ही डेफिनेटली असा आरोप करणं चुकीचं आहे. सिमरनने जीन्स घातली होती आणि जीन्सच्या उभ्या खिशामध्ये कोपरातून हात दुमडल्याशिवाय मोबाइल सरकवताच येणार नाही. व्हिडीओमध्ये त्या वेळेस तिने तिचा हात कधीच एवढा दुमडला नाहिये.’’ धनंजयने मेंदूच्या ग्रे सेल्स अ‍ॅक्टिव्हेट करत विचारले.
‘‘दुसऱ्या अँगलने हेच दृश्य बघता येईल?’’
‘‘हो नक्कीच. आमचा दुसराही कॅमेरा चालू आहे.’’ आणि त्याने मॉनिटरवर दोन्ही कॅमेऱ्याचं फुटेज बाजूबाजूस दाखवावयास सुरुवात केली. धनंजयला आता भलताच हुरूप आला होता. दुसऱ्या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सिमरनने उठताना मोबाइल टेबलावर ठेवल्याचं स्पष्टपणे दिसलं आणि धनंजयने कोलंबसही अमेरिका सापडल्यावर ठोकली नसेल तेवढी मोठी आनंदाने आरोळी ठोकली. झूम करून तो फोन तिथेच आहे हे परत परत रिवाइंड करून बघून घेतले. बाकी सर्वजण स्टोरीच्या त्या नव्या ट्विस्टमुळे अचंबित झाले होते. त्यानंतरच्या फुटेजमध्ये हे स्पष्ट झाले की तिथेच घुटमळणाऱ्या एका गिऱ्हाइकाने पाच मिनिटानंतर तो फोन हळूच उचलून पिलरच्या मागे जाऊन खिशात सरकवला होता. धनंजयच्या उरावरचं एक मोठ्ठं ओझं उतरलं होतं. ही बातमी घरी कळवल्यावर ऐकू येत असलेला जल्लोष त्याच्या मनाला सुखावून गेला. सिमरनने न केलेल्या चोरीचं ओझं जन्मभर उरावर घेण्यापासून ते तिघं वाचले होते.
शिवानी आणि तिच्या मित्रांना कॉफी शॉपमध्ये बोलावून ते फुटेज दाखवल्यावर धनंजयने त्यांना जास्त खजील न करता कोणत्याही गोष्टीकडे सर्व अँगलने बघणं कसं जरुरीचं असतं ते समजावून सांगितलं. कितीही उशीर होत असला तरी कोणावर एवढा मोठ्ठा आरोप करण्याआधी टेक्निशियननेही ह्य गोष्टीकडे लक्ष देणे खूपच जरुरीचे होते आणि एक अँगल गोष्टी स्पष्ट करत नसताना दुसरा अँगल तपासणं कसं जरुरीचं होतं ते कॉफी-शॉपमधील कर्मचाऱ्यांनाही समजावून सांगितलं.
सिमरनला हा एपिसोड एक आय ओपनर होता. माहीत नसलेल्या मित्रांशी बोलू नये, दुसऱ्यांची गॅजेट्स उगाच हाताळू नये वगैरे तिच्या दृष्टीने एरवी असलेलं सो कॉल्ड ‘प्रवचन’ प्रत्यक्षात कसं योग्य असतं त्याचं प्रत्यंतर तिला आलं होतं. मोबाइल शिवानीच्या हातात न देता टेबलावर ठेवणं ही चुकी पूर्णपणे सिमरनचीच होती. त्यामुळे धनंजयने शिवानीला नवीन मोबाइल दिला. मोबाइल तिच्या हातात देताना धनंजयचा खिसा थोडासा हलका झाला असला तरी जन्मभर उतरलं नसतं असं ओझं कायमचं उतरल्यामुळे मन त्याच्या कितीतरी पटीने हलकं झालं होतं.