01prachiउदबत्तीचा मंद सुगंध. कसल्याशा जुन्या पण सुदिंग गाण्याची सुरावट. आजी कोचावर बसून पुस्तक वाचत आहेत कसलंस. या आमच्या शेजारच्या आज्जींकडे गेलं ना की अगदी निवांत वाटतं. म्हणजे अगदी काही महत्त्वाचं काम जरी असलं ना तरी त्यांच्या घरी गेल्यावर सगळं स्लो मोशनमध्ये चालल्यासारखं वाटतं. अगदी निवांत वाटतं. आजोबा गेल्यापासून आज्जी एकटय़ा घरी राहतात. मुलं आपापल्या संसारात मग्न. पण माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून रडणाऱ्यातल्या आमच्या आज्जी नव्हेत. त्या दिवशी सहज म्हणून त्यांच्याकडे गेले आणि नेहमीसारखी रेंगाळले. 

‘‘आज्जी तुमच्याकडे आलं ना की जावंसंच वाटत नाही. मस्त बसावं एखादं पुस्तक घेऊन गॅलरीत.’’
हातात चहाचा वाफाळता कप, कानात सतत गुणगुणणारं ते मोहून घेणारं म्युजिक. सगळं कसं शांत स्वस्थ. फक्त आपण आणि आपलं जग.
‘‘अगं मग येत जा तुला हवं तेव्हा.’’
‘‘पण आज्जी मला ना कधी वाटतं तुम्हाला कंटाळा येत असेल ना असं राहायचा. म्हणजे मला काही तासांसाठी छान वाटेल असं राहायला, पण रोज असं राहणं म्हणजे जरा कठीणच. खूप बोअर होत असेल ना तुम्हाला.’’
‘‘बिलकुल नाही. यात काय बोअर व्हायचं. उलट मला आवडतं असं रहायला.’’
‘‘पण आज्जी तुम्हाला एकटं तर वाटतंच असेल ना. सगळ्यांपासून दूर असं.’’
‘‘छे गं. तुला सांगू, एकटं असणं ही परिस्थिती नाही तर भावना आहे. आपण नाही का म्हणत मुंबईत गर्दीतला माणूससुद्धा एकटा आहे. तसंच आहे. एकटेपणा हा मानण्यावर असतो. अन् एकटं राहणं म्हणजे काही वाईट गोष्ट नसते ना. ते गेल्यावर मला खरंच एक पोकळी जाणवायला लागली होती. कोणीच नाही आपल्याबरोबर असं वाटायचं. मुलं होती, पण त्यांना त्यांचे व्यापही होते. पण हळूहळू मला जाणवलं की आपल्याला भक्कम आधार देणारी व्यक्ती तर सतत माझ्यासोबत असते. मग मी कशाला अवतीभोवती शोध घेतेय. आणि ती व्यक्ती म्हणजे कोण. तर मी स्वत:.. माणसांचा शोध घेणाऱ्या मला माझ्यातसुद्धा एक माणूस दडलाय याचा जणू विसरच पडलेला. आणि मग मी माझी मला शोधायला लागले. तुला खोटं वाटेल, पण अजूनही तो शोध सुरूच आहे. आपण वाटतो तितके मर्यादित नसतो. सारी क्षितिजं सामावलेली असतात आपल्यामध्ये. जितकं जवळ पोहोचावं तितकं अंतर वाढतं. क्लिष्ट आहोत गं आपण फार.’’
आज्जी बोलत होत्या. मी अगदी भारावल्यागत दोन क्षण त्यांच्याकडे पाहातच बसले. त्यांच्या वयाचे कित्येक लोक एकटेपणाची तक्रार करत असतात आणि या एकटेपणाची काहीतरी वेगळीच व्याख्या करताहेत.
‘‘काय गं कुठे हरवलीस? तुला सांगू मला तर वाटतं आजकालच्या प्रत्येक मुला-मुलीने एकदा तरी एकटं राहून बघावं. तसंही हल्ली तुम्हा मुलींना आवडतंच ना असं एकटं रहायला.’’
आता तर माझी विकेटच पडली. ‘‘आज्जी तुम्हाला पटतं असं मुलींनी घरापासून दूर एकटं राहाणं? रिस्क आहे ना त्यात पण.’’
आता अगदी टिपिकल आज्जीसारखं हसून त्या म्हणाल्या, ‘‘अगं रिस्क कशात नाहीये? तू साधं रस्त्यावर चाललीस तरी त्यात रिस्क आहे. पण म्हणून आपण चालणं सोडतो का? मग आयुष्यातला स्वत:साठी देऊ शकत असलेला वेळ केवळ रिस्क आहे म्हणून टाळायचा का? आणि तुम्ही आता एक जबाबदार नागरिक आहात. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीवही आहे.’’
मला कळत नव्हतं की माझ्यासमोर बसलीये ती ७० वर्षांची आजी आहे की ७० वर्षांची तरुणी. सतत ‘‘आजकालच्या पिढीचं काही खरं नाही. कसं होणार आहे यांचं देव जाणे’’ असं ऐकण्याची सवय असणाऱ्या कानांना अचानक ‘जबाबदार नागरिक’ कानावर पडल्यावर दोन मिनिटं ऐकू येणंच बंद झालं. आपली कोणी स्तुती केली की हुरळून जायला तर होतंच, पण त्या स्तुतीचं दडपणही वाटायला लागतं.
‘‘तुला पण वाटतच असेल ना एकटं रहावंसं?’’
त्यांच्या प्रश्नाने मी भानावर आले.
‘‘वाटतं खरं कधी कधी. असं वाटतं कोणीच नसावं बरोबर. आपले आपण, कोणाचीही कटकट नाही. पण मग त्या दिवशी घरातले सगळे दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले आणि मला घर खायला उठलं. किती विचित्र वाटत होतं त्या दिवशी. हवं ते सगळं केलं. मस्त उशिरा उठले. लोळत पडले कित्येक तास. खूप वेळ टी.व्ही पाहिला. मोबाइलवर चॅट केलं. पिझ्झा खाल्ला. छान वाटलं मला खरं तर, पण हळूहळू कंटाळा यायला लागला. बोलायला कोणीच नव्हतं घरी. घरी नुसती ‘आई’ हाक मारली तरी घर गजबजून जातं. नंतर तर इतकं बोअर झालं मला.’’
आज्जीना हे सगळं सांगितल्यावर मंदसं स्मित करून त्या म्हणाल्या, ‘‘तुला माहीतेय बरेच जण एकटं राहण्याला घाबरतात. माझ्या मते ते एकटं राहण्याला नाही तर स्वत:बरोबर वेळ घालवण्याला घाबरतात. म्हटलं ना मी खूप क्लिष्ट आहोत आपण. एकटं असताना आपल्याशिवाय आपल्यासोबत कोणीच नसतं. आणि रोजच्या कोलाहलात आपल्याला आपलाच आवाज परका झालेला असतो. भीती वाटत असते त्या आवाजाची. उगाच काहीतरी बोलून जायचा आणि नको त्या विचारात टाकायचा. माझंही असंच व्हायचं. खूप नकोसे विचार यायचे मनात. प्रचंड अस्वस्थ व्हायचे मी पण. नंतर मीच त्या आवाजाशी बोलायला लागले. मी माझ्याशी संवाद सुरू केला. आणि स्वत:ला समजून घ्यायला लागले. खूप छान प्रोसेस असते गं. मजा येते. हा एकटेपणा खूप काही शिकवून जातो. आपलं ओझं आपल्यालाच सांभाळायला लावतो. आपल्याला खऱ्या अर्थाने बोलतं करतो.’’
खूप विचारात टाकलं होतं मला आज्जींच्या बोलण्याने. स्वत:शी संवाद साधायची निकड भासू लागली होती. कायमचं एकटं नाही पण काही दिवस अथवा काही क्षणही केवळ स्वत:ला दिले तर काय हरकत आहे? रोजची मी आणि माझी मी यातला फरक तरी कळेल. एकटेपणाच्या माझ्या संकल्पना आता बदलत होत्या. अक्राळविक्राळ वाटणारा तो राक्षस आता जादूच्या कांडीने सगळं काही ठीक करणारी परीराणी झाला होता. आज्जींचं म्हणणं डोक्यात घुमत होतं.
‘‘एकटेपणा ही एक भावना आहे. तो मानण्यावर असतो.’’ माझ्या डोक्यात पिल्लू सोडून आज्जी मात्र त्यांचा एकांत एन्जॉय करत होत्या.
प्राची साटम