आरती कदम – response.lokprabha@expressindia.com

जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी मी चित्रपट निर्मिती करते, अशी स्वच्छ भूमिका असल्यामुळेच सुमित्रा भावे यांचे चित्रपट समाजजीवनाचा आरसा ठरतात. मानवी नाती आणि सामाजिक आशय यांची सांगड घालत मांडणी करणाऱ्या त्यांच्या चित्रपटातून जीवनाचं यथार्थ दर्शन घडतं.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

ती सायकल चालवायला शिकली आहे, चोरून. धाकटय़ा भावाला पैशांची लालूच दाखवून. घरातल्या लोकांना आवडणार नाही आणि गावातल्या तर नाहीच नाही, हे माहीत असलेल्या तिच्यासाठी तिचं असं हे खास गुपित आहे. पण एके दिवशी गावासमोर हे गुपित फुटतंच.. गावातल्या सगळ्यांसमोर ती सायकलवर टांग मारत स्वार होते आणि मुक्त होते.. पण त्याच वेळी एक गोष्ट घडते.. तिच्या पायातलं पैंजण खाली जमिनीवर गळून पडतं.. ती मात्र पुढे पुढे जातच राहते.. आसमंताकडे..मुक्तपणे..

परंपरेच्या बेडीतून तिचं मुक्त होणं दाखवण्यासाठी पैंजण पायातून पडण्याचा हा एकच प्रसंग सुमित्रा भावे यांच्या ‘चाकोरी’ या चित्रपटाला खूप मोठं करून जातो. किंबहुना चित्रपटाचा सारा आशय या एका प्रसंगातून तोलून धरला गेला आहे. असा वेगळा परिमाण देणारे चित्रपट हीच त्यांची खासियत. आणि तेच त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्टय़ही ठरतं. कथा-पटकथाकार, गीतकार- नेपथ्यकार- कला दिग्दर्शक-वेशभूषाकार-संकलक-निर्मात्या अशा सगळ्याच भूमिका त्यांनी समरसून केल्याच परंतु त्याचं दिग्दर्शक असणं, त्याहीपलीकडे जाऊन सामाजिक दिग्दर्शक असण्याने त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला वेगळा आयाम मिळत गेला आणि त्याचमुळे चित्रपटांचा मुख्य उद्देश मनोरंजन करणे असतो, या गृहीतकाच्या पार पलीकडे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक चित्रपटांचा प्रवाह बळकट झाला.

केवळ करमणूक हे कधीच त्यांच्या चित्रपटांचं ध्येय नव्हतं. कारण मुळात सुमितामावशी (त्यांना सगळेच मावशी म्हणत आणि तसं म्हटलेलं त्यांना आवडे) यांचा पिंडच समाजाचं तीव्र भान असलेला होता. त्यांच्याकडून निव्वळ मनोरंजनपर चित्रपट होणे शक्यच नव्हते उलट त्यांचे चित्रपट  समाजजीवन उलगडून दाखवत. जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी मी चित्रपट करते, असं त्या म्हणायच्या ते याच संदर्भात. म्हणूनच त्यांच्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम खूप विचारपूर्वक केलेली आणि काहीतरी सांगणारी, कथानकाला पुढे नेणारी असे. ‘लोकसत्ता चतुरंग’मध्ये २०१९ मध्ये त्यांनी ‘विचित्र निर्मिती’ हे सदर लिहिले होते. त्यातून त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटामागची भूमिका लिहिली होती. त्यातून जाणवत गेलं होतं की समाजावर, त्यातल्या घटितावर, समाजातल्या प्रत्येक गोष्टीकडे, माणसांच्या प्रत्येक कृती-उक्तीकडे बघण्याची त्यांची अशी एक नजर होती, विचार होता त्यामुळेच त्यांचे सारे चित्रपट समाजावर भाष्य करणारे तर आहेतच, पण त्यात सामान्य माणसांपासून सुरू झालेला प्रवास सार्वत्रिक होत गेलेला दिसतो. विषय माहितीचा असला तरी तो नात्यांच्या उभ्या-आडव्या गुंफणीतून त्या असा काही मांडतात की त्याचा माहितीपट न होता फीचर फिल्म वा लघुपट होतो. माहितीच्या अधिकाराची माहिती देणारा ‘एक कप च्या’ असो की समुपदेशनाची माहिती देणारा ‘मन की आँख’. त्यातून योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचतोच.

वयाच्या चाळिशीनंतर चित्रपट निर्मितीकडे जाणीवपूर्वक वळलेल्या सुमित्रा भावे यांच्यासाठी प्रत्येक चित्रपट एक ध्यास होता आणि म्हणूनच त्यातला प्रत्येक प्रसंग अन् प्रसंग उत्कटतेने व्यक्त होत असे. एखादा विषय त्यांच्या मनात बीजासारखा पडला की तो बराच काळ तिथे रुजत राही. आणि त्या रुजण्यातूनच प्रगल्भ चित्रपट आकार घेत जात. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट सजीव होत असे. त्यांच्याशी बोलत असे. स्वत:ची कथा सांगत असे. आणि म्हणूनच त्यातून निर्माण होणारा चित्रपट प्रेक्षकांनाही आपसूकच आपला वाटे. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या सगळ्या चित्रपटांतील ‘घर’ या वास्तूबद्दल सांगता येईल. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील घराला काही अर्थ असे. कोणतं घर कसं हवं याचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केलेला असे. ‘बाधा’ चित्रपटात एका दलित सैनिकाचं घर आहे. मुलगा सैन्यात आहे आणि त्याची बायको वाटय़ाला आलेला छोटासा शेताचा तुकडा कसते आहे. खूप जागा पालथ्या घातल्यावर सुमित्रामावशींना ते घर सापडलं. माळरानावरच्या कोरडय़ा जमिनीवर एक हिरवागार तुकडा असलेलं. योगायोग म्हणजे ते घरही दलित सैनिकाचं होतं. वास्तवाचा स्पर्श झाल्याने चित्रपटाचा आशय त्यात आपसूक उतरला हे सांगायला नकोच. ‘दोघी’मधला वाडा काय किंवा ‘वास्तुपुरुष’मधला वाडा, ‘वेलकम होम’, ‘अस्तु’मधलं आधुनिक घर असो की ‘एक कप च्या’मधल्या बस कंडक्टरचं कर्जाची चिंता करणारं घर असो किंवा ‘संहिता’मधला थेट राजवाडाच. या वास्तूंची त्या त्या चित्रपटात त्यांची त्यांची अशी एक भूमिका असे अर्थात याचं कारण त्यामागे असणारी सुमित्रामावशींची घराविषयीची भावना. त्या म्हणत, ‘‘चार भिंतींना त्यात राहणाऱ्या माणसांच्या गोष्टींचं सोयरसुतक असतं. त्या घरातल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या आंबट, गोड, तुरट चवी भिंतींनी मुरंब्यासारख्या मुरवून घेतलेल्या असतात.’’ इतकी स्वच्छ भूमिका असल्यामुळेच त्यांच्या सगळ्याच चित्रपटांमधल्या वास्तू फक्त पाश्र्वभूमीला न राहता चित्रपटाचा एक भाग होऊन जातात.

योग्य वास्तू मिळवण्याबरोबरच त्या त्या चित्रपटामधील कथेमध्ये त्या घराचं, त्या काळाचं, त्यातल्या माणसांच्या जगण्याचं प्रतिबिंब पडण्यासाठी सुमित्रामावशी प्रचंड धडपडत असत. ‘दोघी’ चित्रपटात मराठा शेतकरी कुटुंब असल्याने त्यांच्या घरात भाकरी थापण्यासाठी पितळी परातीपेक्षा लाकडी काथवट असायला हवी यासाठी आणि ‘वास्तुपुरुष’मधील देशपांडे या वतनदाराच्या घरातलं मोदकपात्र तांब्याचं हवं, या आग्रहापायी ते शोधण्यासाठी त्यांनी अनेक बाजार पालथे घातले. शेवटी नाशिकच्या मोड आणि जुन्या भांडय़ांच्या बाजारात त्यांना ती जुन्या काळातली भांडी मिळाली. आणि तो काळ पडद्यावर साकार झाला.

परफेक्शनिस्ट असणं हे सुमित्रामावशींचं वैशिष्टय़च होतं म्हणूनच ‘घो मला असलाच हवा’ या चित्रपटाच्या वेळी त्यांनी चित्रीकरण थांबवून आपल्याला हवी ती गोष्ट करून घेतली. घरी आलेल्या पाहुण्याला माशाचं कालवण द्यायचं होतं, मात्र प्रॉडक्शनवाल्यांनी आणून दिली ती कोलंबीची पातळ आमटी. साहजिकच मावशींच्या ते पचनी पडणार नव्हतं. त्यांनी मासे आणून वाटणघाटण करून कालवण करायला लावलं आणि मगच शूटिंग सुरू झालं. तसंच ‘संहिता’च्या वेळी डाळ-भाताच्या एवजी दालफ्राय आणला गेला. त्यांनी तो परत पाठवला. तुरीची डाळ मागवून, शिजवून, फोडणी घालून मगच ती डायनिंग टेबलवर मांडली गेली. अशा असंख्य छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनी सुमित्रा भावे यांचे चित्रपट वास्तवदर्शी ठरले.

हे वास्तवदर्शी घडले यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या चित्रपटातला सामाजिक आशय. त्यामागे होती ती त्यांची बालपणापासून झालेली जडणघडण. ‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. आबाबेन देशपांडे, प्रमिला दंडवते यांच्याबरोबर त्या राज्यभर विविध कार्यक्रम करत दौरा करीत. पुढे ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’तून त्यांनी समाजशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम. ए. पदवीही मिळवली. पुण्याच्या ‘कर्वे समाजसेवा संस्थे’त अध्यापक म्हणून केलेलं काम, ‘स्त्रीवाणी’ या स्त्रीच्या स्वप्रतिमेचा अभ्यास करणाऱ्या प्रकल्पाच्या प्रमुख अभ्यासक असणं, गुन्हेगार स्त्रियांच्या अभ्यास प्रकल्पात संशोधन अधिकारी म्हणून काम करणं अशा विविध क्षेत्रांतला विविध स्तरांवरचा अभ्यास त्यांच्यातल्या सामाजिक जाणिवेच्या कक्षा वाढवत गेला. तसेच त्यापूर्वी दिल्ली आकाशवाणीवर रुजू असताना (नीला उमराणी बातम्या देत आहे, हे वाक्य आजही अनेकांना आठवतं) आणि त्यासाठी दिल्लीत एकटीने राहत असताना भरपूर चित्रपट पाहणं त्यांच्या पथ्यावर पडलं आणि त्यातूनच त्यांची चित्रपटाविषयीची एक समजूतदार जाण तयार झाली.

अगदी सुरुवातीचे ‘बाई’, आणि ‘पाणी’ हे त्यांचे लघुपट त्यातूनच निर्माण झाले. स्त्री- पुरुष समानता दाखवणं असो की पाण्यासाठी बायकांनी एकत्रितपणे येऊन घेतलेली मेहनत असो. सुमित्रामावशी शक्य तो कुणा प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्रीला न आणता प्रत्यक्ष तिथल्या व्यक्तींकडून कामं करून घेत. त्यामुळे ते चित्रपट अधिक जिवंत होत. विशेषत: ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब त्यात पडून त्यांचे चित्रपट वास्तवदर्शी ठरतं. पण त्याहीपलीकडची गोष्ट म्हणजे लघुपट वा माहितीपट निर्मितीनंतर काम संपलं ही त्यांची भूमिका कधीच नव्हती. उलट त्या आणि त्यांची टीम (यात त्यांच्याबरोबर दिग्दर्शनाची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुनील सुकथनकरांपासून अनेक जण आले. आणि पुढे तर अनेक जण त्यात जोडले गेले. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, महेश टाकळकर, सोनाली कुलकर्णी, ज्योती सुभाष, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार. उमराणी, दफ्तरदार कुटुंबीय तर कायम त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा भाग होते.)   ते ते चित्रपट गावोगावी जाऊन दाखवत. तिथल्या ग्रामीण लोकांशी त्याविषयी गप्पा मारत. त्याचं महत्त्व पटवून देत. साहजिकच तिथल्या लोकांना त्याचा फायदा होत असे. त्यांचा ‘पाणी’ हा चित्रपट तर थेट पाकिस्तानमधल्या विविध खेडेगावांतही दाखवला गेला तेव्हा तिथल्या बायकांनी श्रमदानाने त्यांच्या गावातही पाणी आणलं. हे खरं योगदान. विषय सामान्यतेकडून वैश्विक स्तरावर आपला वाटणं हे सुमित्रामावशीच्या द्रष्टेपणाचं वैशिष्टय़.

सुमित्रामावशींच्या चित्रपटांचं मला वाटणारं सर्वात मोठं योगदान म्हणजे माणसांच्या आजाराला, रोगाला कथेच्या रूपातून, चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं. निराश करणारे, वेदना देणारे, दु:ख-अश्रू देणारे आजार कुणालाच आवडत नाहीत. माणसं त्यापासून पळ काढतात. पण पळून जाण्याने प्रश्न सुटत नसतात. उलट त्याच्याशी भिडलं तर प्रश्न सुटण्याची, निदान मार्ग मिळण्याची शक्यता तरी निर्माण होते, हे पक्कं माहीत असल्यानेच अनेक आजारांना त्यांच्या चित्रपटात स्थान मिळालं. देवराई (छिन्नमनस्कता— स्किझोफ्रेनिया), नितळ (कोड), जिंदगी जिंदाबाद (एचआयव्ही- एड्स), अस्तु (विस्मरण—डिमेन्शिया), कासव (नैराश्य) या चित्रपटांच्या तरल हाताळणीतून त्या त्या आजाराचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचलंच, पण त्याहीपलीकडे माणसांमाणसांतील निखळ तर कधी गुंतागुंतीच्या नात्यांचा, जगण्यातील आशा-निराशेच्या खेळाचा तर कधी माणूसपणाचा साक्षात्कार होत जातो आणि मग हे चित्रपट निव्वळ माहितीपट न राहता समाजमनाचा आरसा होतात.

आत्तापर्यंत १५ फीचर फिल्म्स, ५० ते ६० लघुपट, पाच दूरदर्शन मालिका त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या नावावर आहेत. त्यांचे सारे चित्रपट हे समाजातल्या विविध घटकांविषयी बोलत राहतात. म्हणूनच अंध, मतिमंद, मूकबधिर, बालकामगार, बालसुधारगृह, रात्रशाळा, बाललैंगिक अत्याचार हे सारे त्यांच्या कथेचे विषय झाले आहेत. विद्यार्थी हा आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक. पण प्रत्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य सहज सोपं नसतं. अनेकांच्या आयुष्यात लहानपणापासूनच कडवटपणा आलेला असतो कारण त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार. ‘दहावी फ’सारखा चित्रपट अशाच मुलांविषयी बोलतो. आपल्यावर शाळेने अन्याय केला आहे या विचारातून कडवट झालेली मुलं हिंसेकडे वळतात, मात्र शेवटी शिक्षण हाच परिवर्तनाचा मार्ग आहे, हे त्यांना पटतं आणि ही मुलं मार्गावर येतात. आपल्या आयुष्याची संहिता आपली आपल्याला लिहिता यायला हवी, हे सांगणारा ‘संहिता’, मृत्यूच्या गर्भातच उगवणाऱ्या नवचैतन्याच्या कोंभाचे सृजनमाहात्म्य सांगणारा ‘दिठी’, याशिवाय ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘एक कप च्या’, ‘मन की आंखे’, ‘फिर जिंदगी’, ‘बेवक्त बारीश’ असे सारे लघुपट, चित्रपट समाजावर भाष्य करत करत माणसांतलं माणूसपण शोधत राहतात.

‘‘कॅमेऱ्याने मला माझ्या अनुभवांना चौकट द्यायला शिकवलं. कॅमेऱ्याला डोळा लावला, समोरच्या दृश्याला चौकट दिली की माझ्या अनुभवांच्या लघुकथा होतात आणि त्यातून चित्रपट साकारत जातो, ’’ असं म्हणणाऱ्या सुमित्रा भावे यांचे चित्रपट म्हणूनच त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या जीवनाचं आणि समाजाचं दर्शन घडवणारे नितळ अनुभव ठरतात.