परदेश प्रवासाच्या एखाद्या अनुभवावर आपण स्वत:ला खूप अनुभवी आणि शहाणे समजायला लागतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अनुभवांची शिदोरी तोकडी पडते आणि होणारी फटफजिती काही टळत नाही. त्याचेच हे काही अनुभव

देशाटन वगैरे वगैरे केल्याने मनुजाला चातुर्य येते अशा अर्थाची एक आर्या घडाघडा तोंडपाठ म्हणून दाखविल्याबद्दल मला लहानपणी कुणा दिलदार पाव्हण्याने वट्ट एक पावलीचे नाणे बक्षीस दिल्याचे आठवते. पुढच्या आयुष्यात देशाटन व परदेशाटनाचे अनेक योग आले. प्रत्येक वेळी मला वाटायचे, आता आपण अगदी चतुर बिरबल होणार. पण काय सांगू, चातुर्याचा बॅरोमीटर वर जाण्याऐवजी अनेक प्रवासांत हा चातुर्य-पारा नको तितका खाली येऊन अशी फजितीची पाळी आली की बाल बाल बचावण्यातच धन्यता मानण्याचे प्रसंग अधिक आले.
मंडळी, जरा नमुना देख लो, हाऽऽऽय!
पहिल्याच परदेश प्रवासाचा पहिलाच दिवस. भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याची चुणूक दाखविणारा! वीस-बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा परदेशवारी ही जरा दुर्मीळ चीज होती. अचानक हेडहाफिसातून सांगावा आला. इंग्लंडमधल्या मॅनेजमेंट प्रोगॅ्रमसाठी माझी निवड झाल्याचा. मी इतका हुरळलो, इतका हुरळलो, की हा प्रोगॅ्रम डिसेंबरमध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आहे आणि आपल्याला तयारीसाठी दोन-तीन आठवडेच आहेत याची फिकीरच वाटली नाही. व्हिसा वगैरे भानगडीत इतका वेळ गेला की ना कुणा जाणत्याचे मार्गदर्शन घेता आले ना ती मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट नक्की कुठे आहे याचा नीट पत्ता लावता आला. आजकाल अगदी शाळकरी पोरटय़ाला विचारा, तो लगेच त्याच्या स्मार्टफोनवर ‘गुगलेल’ आणि क्षणार्धात ती इन्स्टिटय़ूट कुठल्या शहराच्या कोणत्या गल्लीबोळात आहे, हे शहर या पृथ्वीतलावर नक्की कोठे आहे, तेथे सध्या हिमवर्षांव होतोय की कडकडीत उन्हे पडली आहेत तेथपासून तेथल्या किती रहिवाशांना सहावे बोट आहे इथपर्यंत इत्थंभूत माहिती तो तुम्हाला देईल. पण त्या वेळी आपल्याकडे मोबाइल आणि इंटरनेट हे दोन्ही शब्द फक्त ऐकूनच माहिती होते. आमची पिढी तशी अडाणीच होती हो.
माझी फ्लाइट हिथ्रो-लंडनला संध्याकाळी पाच वाजता उतरणार होती. म्हणजे दोनेक तासांत हॉटेलवर पोहोचून नंतर जरा पाय मोकळे करायला बाहेर पडता येईल असा माझा साधाभोळा अंदाज. प्रत्यक्षात ती इन्स्टिटय़ूट सरे काऊंटीतल्या ‘सटन’ या छोटय़ा शहरात होती आणि त्याच्या मुख्य चौकात मला उतरवून बस पुढे गेली तेव्हा रात्रीचे आठ-साडेआठच वाजले होते, पण चक्क मध्यरात्रीचा माहौल भासत होता. दाट धुके, मिट्ट काळोख, निर्मनुष्य रस्ते, एकूण एक दुकाने, मॉल, हॉटेले, फूड जॉइंटस् बंद. थंडी व बोचऱ्या वाऱ्यांचा तडाखा असा की अंगावर मणभर वुलन्स असूनही आपण उघडेबंब आहोत असेच वाटत होते. या स्थितीत, एवढय़ा जड बॅगा संभाळत माझे हॉटेल शोधायचे तरी कसे? मुंबईत खरोखरच्या मध्यरात्रीपण परक्या माणसाला मदतीचा हात पुढे करायला दहाजण सापडतील, येथे रात्रीच्या फक्त नऊच्या सुमाराला अशी स्मशानशांतता? मतीच गुंग झाली. आशेने आजूबाजूला न्याहाळताना पंधरा-वीस मिनिटेच गेली असतील, पण प्रत्येक मिनिट प्रहरासारखे वाटेल.
तेवढय़ात चौकाच्या एका कोपऱ्यातून तीन-चार जणांचा एक ग्रुप माझ्याच दिशेने येताना दिसला. म्हटले, देव पावला. तो जवळ आल्यानंतर मात्र छातीत धस्स झाले. ते एक आफ्रिकन तरुणांचे टोळके होते. चालीवरूनच चिक्कार प्याल्याचे कळत होते, त्यांच्याकडे मदत मागणे म्हणजे खुद्द सैतानालाच ‘स्वर्गाचा रस्ता दाखव’ असे विनविण्यासारखे होते.
पोरे जवळ आली आणि त्यांच्या ‘तशा’ अवस्थेतही मी सामानासह एकटाच, असहाय उभा आहे हे लक्षात आल्याने एकाने एका मोठय़ा सुटकेसला लाथाडून मला घाबरविले तर दुसऱ्याने माझी हँडबॅग खेचत ‘‘गीव्ह मी, गिव्ह मी’’चा पुकारा केला.
मला कसे सुचले देव जाणे- पण मी बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडलो. इंग्रजीत की हिंदी-मराठीत, ‘‘हेल्प, हेल्प’’ की ‘‘बचाओ, बचाओ’’ की चक्क ‘‘चोर, चोर’’- हे पण तो उप्परवालाच जाणे, मला काहीही नंतर आठवले नाही. पण नशीब माझे, बाजूच्याच बििल्डगच्या पहिल्या मजल्यावरची खिडकी उघडून काही माणसे डोकावली. दुसऱ्याच क्षणी जिन्यावर दाणदाण पावले वाजली आणि त्या आफ्रिकन पोरांनी लगेच पोबारा केला.
तेथे एक छोटे पब होते आणि तेथूनच माझे साहाय्यकर्ते अवतरले होते. त्यांची खरीखुरी मदत झाली. त्यांनी पबमधून फोन करून टॅक्सी मागवली, हॉटेलला कळविले व माझी पाठवणूक करताना, ‘‘डोन्ट वरी, असे क्वचितच येथे घडते’’ असा दिलासादेखील दिला. ते आले नसते आणि माझी फक्त हँडबॅग जरी लांबवली गेली असती तरी पासपोर्ट, ट्रॅव्हलर्स चेक्स, कॅश, इत्यादींना पारखा झाल्यावर बहुधा रिटर्न फ्लाइटने मला भारतात डिपोर्टच केले गेले असते.
इसापनीतीतल्या गोष्टीअखेर असते तसे मीदेखील माझ्या फजिती प्रसंगाचे तात्पर्य शोधण्याइतके चातुर्य पैदा केले आहे. या प्रसंगाचे तात्पर्य:
१) बॅग खेचणाऱ्यांचा हात म्हणजेच बहुधा इंदिरा गांधींनी पॉप्युलर केलेला ‘परकीय हात’ असावा.
२) केवळ पहिला परदेश प्रवास, ‘एक्सायटिंग’ व्हावा म्हणून हे रामायण घडले.
३) फक्त पबची मजा चाखणारे फिरंगीच हिवाळय़ात उशिरापर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतात.
मागील अनुभवाने शहाणा झाल्याने लगेचच काही महिन्यांनी कामासाठी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे जाताना दिवसाउजेडी पोचणारी फ्लाइट घेतली. हॉटेल पंचतारांकित असल्याने शोधण्याचा व्याप नव्हता. मात्र आपल्याकडच्या मेमधल्या कडकडीत उन्हाळय़ातून मी आता दक्षिण गोलार्धातला हिवाळा अनुभवत होतो. लहान दिवस आणि कामाचा रेटा यामुळे सिडनी हे छान शहर वाटतेय यापलीकडे शहराचा अजिबात अंदाज आला नव्हता. म्हणून काम संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळीच ‘सिडनी एक्सप्लोअरर’ बसची दिवसभराची टूर घेतली. बसला शहरभर अनेक स्टॉप. कुठेही उतरा, हवे तितके थांबा आणि सतत पाठोपाठ येणाऱ्या तशाच बसमध्ये पुन्हा चढा. म्हटले चला, भटकू या दिवसभर.
बस सुरू झाल्यावर थोडय़ाच वेळात ती जगविख्यात ‘सिडनी हार्बर ब्रिज’ खालच्या छोटय़ा रस्त्यावर थांबली आणि ड्रायव्हरने ‘‘येथे फक्त दोन मिनिटांचा फोटो स्टॉप’’ असे बजावले. मी कॅमेरा तयार ठेवला होताच. ‘‘फोटो काढून लगेच परत येतो, ओके?’’ असे सांगताच ड्रायव्हरकाकांनी अगदी तोंडभर हसून मान डोलावली. मी धावत जरा बाजूला जाऊन छानपैकी अँगल शोधला, फटाफट दोन-चार फोटो काढले आणि मागे वळून पाहतो तो बसने वेग घेतलेला. मिल्खासिंग लाजेल अशा वेगात मी स्िंपट्र मारला पण पाठलाग असफल. एक वळण घेऊन बसबाई अदृश्य झालीदेखील. बाई भारीच वाकडय़ा वळणाची.
मी मटकन खालीच बसलो. ड्रायव्हरला बहुधा माझे तर्खडकरी विंग्रजी कळले नव्हते किंवा दोन मिनिटे म्हणजे दोनच अशी त्यांची शिस्त असावी.
मी मात्र त्याची संमती गृहीत धरून बिनधास्तपणे माझी हँडबॅग सीटवरच ठेवून उतरलो होतो. त्यात पासपोर्ट, कॅश वगैरे नेहमीचाच महत्त्वाचा मामला. आता बसमध्ये बारा गावचे, नव्हे बारा देशांतले प्रवासी, कुणी चटकन बॅग घेऊन उतरला तर कोण, कसा पत्ता लावणार? आफतच आली.
अशा आपत्तीत अक्षरश: आकाशातून देवदूत यावा तसा एक प्रायवेट टूरचा गाइड माझी आरडाओरडा ऐकून माझ्या मदतीला धावला. प्रॉब्लेम कळल्याबरोबर प्रथम माझ्या तिकिटावरचा बस नंबर व त्यांच्या कंट्रोलरूमचा टेलिफोन नंबर पाहून त्याने त्याच्या मोबाइलवरून लगेच कंट्रोलरूमला कॉन्टॅक्ट केले.
नंतरच्या पाच-सात मिनिटातल्या घटना खरोखरच अविश्वसनीय होत्या. कंट्रोलरूमने ड्रायवरला फोन करून माझी बॅग जवळच्याच ‘सक्र्युलर क्वे’ या सिडनीच्या सेंट्रल बस-बोट टर्मिनलमधील बसच्या स्पेशल काऊंटरला देण्यास सांगून, लगेच गाइडच्या फोनवर बॅग कशी परत ताब्यात घ्यायची, याच्या सूचना दिल्या.
मंडळी, लक्षात घ्या, हा प्रसंग वीस वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाही तेथे मोबाइल फोन असल्याने इतक्या चटकन निरोपांची देवाणघेवाण होऊ शकली हे मान्य, पण आपल्याकडे अशी तत्परता आजमितीला सर्व सोयी असूनही टुरिझमवाले दाखवतील आणि एखादा गाइड आपला ग्रुप तिष्ठत ठेवून परक्या व्यक्तीसाठी असा वेळ देईल अशी आशा आपण करू शकतो का?
आणखी अध्र्या तासातच माझी पळपुटी हँडबॅग माझ्याकडे परत आली. माझा सुटकेचा नि:श्वास बहुधा साऱ्या सिडनीला ऐकू गेला असेल.
तर तात्पर्य काय?
१) ऑस्ट्रेलियनांना आपले चांगले, शुद्ध तुपातले विंग्रजी समजत नाही.
२) माझी हँडबॅगच चवचाल आहे. काळे-गोरे भेदभाव न करता ती पुन: पुन्हा दुसऱ्याच्या गळय़ात पडायला बघते.
३) माझा पाठीराखा देवदूत कधी पबमध्ये असतो, तर कधी देव आनंदसारखा ‘गाइड’!
कुठल्याही गोंधळातून आपण सहीसलामत बाहेर येऊ शकतो या आत्मविश्वासाने पुढची सपत्निक ‘अमेरिका देखो’ मोहीम मी स्वत:च आखली. एकदम सिंपल प्लॅन- वॉशिंग्टनला भाचीकडे सर्व बॅग-बॅगेज टाकून आठवडाभर अगदी जरुरीपुरते छोटे बोचके घेऊन भटकायचे आणि वीक-एंडला तिच्याचकडे आराम करून पुन्हा सोमवारी, नव्या बोचक्यानिशी, नव्या उमेदीने नव्या वाटा धुंडाळायला सज्ज.
पहिले तीन आठवडे प्लॅन अगदी यशस्वी झाला. सर्वानी आमचे कौतुक केले आणि आता आपण खरोखरच चतुर झालो आहोत अशी माझी पक्की खात्री झाली असतानाच माशी शिंकली.
वेस्ट कोस्टसाठी अमेरिकन भाचीच्याच सल्ल्याने तेथील एका नामांकित कंपनीची दहा दिवसांची लॉस एंजल्स (एल.ए.)हून राऊंड ट्रिप घेतली. टुर छानच होती. सर्व ठिकाणी पंचतारांकित हॉटेले, लास वेगास, गँड्र कॅन्यॉन, डेथ वॅली, येसोमाइट नॅशनल पार्कसारखी आगळीवेगळी स्थळे. प्रॉब्लेम वेगळाच होता. त्या नामांकित टुरवाल्यांनी मला चांगलीच नामांकित टोपी घातली होती. रोज अर्धा दिवसच टूर आणि उरलेल्या वेळात ‘ऑप्शनल’ नावाखाली भरपूर डॉलर्स उकळून मगच जादा साइट-सीइंग. शिवाय लंच-डिनर अपने आप. अध्र्या टुरमध्येच जवळची कॅश भुस्सकन उडाली. तेव्हा आजच्यासारखी इंटरनॅशनल क्रेडिट वा फॉरेक्स कार्ड्स नसल्याने ट्रॅवलर्स चेक्स (टीसीज) हा एकमेव पर्याय असायचा.
‘सांता मारिया’ला आलो आणि खरेदीसाठी टीसीज मोडायला गेलो तर सर्व बॅगची पुन: पुन्हा उलथापालथ करूनही ते सापडेचनात. याचा अर्थ नव्याने बॅग भरताना ते पाकीट वॉशिंग्टनलाच राहिले.
ओ गॉड! अजून टुरचे चार दिवस व नंतर एल.ए.ला हॉलीवूड, डिस्ने लँड वगैरेसाठी दोन दिवस हॉटेल बुकिंग असा सहा दिवसांचा कार्यक्रम बाकी. कितीही हात आखडता घेतला असता तरी जवळची उरलेली कॅश अपुरीच पडली असती. आला का वांधा? विचार करकरून डोस्के आऊट झाले, पण एल.ए.पर्यंत कळ काढून, फ्लाइट अ‍ॅडवान्स करून दोन दिवस आधीच परतायचे यापेक्षा दुसरा पर्याय सुचेना. अगदीच फजितीची पाळी आली.
पुढचा स्टॉप होता सॅनफ्रॉन्सिस्को. तेथे रात्री पोचलो आणि पुढले दोन्ही दिवसांचे साइट-सीइंग ‘ऑप्शनल’ म्हणजे जादा डॉलर ओतून होते. आता हे दिवस हॉटेलमध्येच बसून काढावे लागणार की काय?
पुन्हा तो अज्ञान पाठराखा देवदूत अचानक वेगळय़ा रूपात अवतरला. माझा एक शाळासोबती गेली अनेक वर्षे एस.एफ.ला स्थायिक झाला होता आणि बऱ्याच वर्षांत गाठभेट नसूनही उगाचच त्याचा नंबर माझ्या डायरीत होता. केवळ ‘बुडत्याला काडीचा आधार’ म्हणीचा आधार घेत, ‘‘कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवायची नाही बरं का’’ असे स्वत:लाच बजावीत मी त्याला फोन लावला. मी चक्क त्याच्या शहरातूनच बोलतो आहे. यावर त्याचा प्रथम विश्वास बसेना. वेळ न दवडता तो हॉटेलवर आला.
‘‘अरे हे टुरवाले काय कप्पाळ दाखविणार तुला एस.एफ.!’’ असे सूतोवाच करीत त्याने नेहमीच्या टुरिस्ट स्पॉट्सबरोबर जेथे टुरवाले कधीच नेणार नाहीत अशा त्याच्या खास आवडीच्या पॉइंट्सना आम्हाला भटकावून आणलेच, वरती जवळच्या जगविख्यात ‘रेडवूड फॉरेस्ट’ची पण सैर घडवून आमचे दोन्ही दिवस गोड केले व शेवटी भरपूर डॉलर्सची सोय पण केली.
तात्पर्य-
१) ‘देव तारी त्याला..’, ‘खुदा देता है तो छप्पर..’ वगैरे वगैरे.
२) तो अज्ञात देवदूत असा माझ्या पाठीमागे, पाठीमागे फिरणार असेल तर मंगळावर जाण्यासाठीदेखील ‘इस्रो’कडे बुकिंग करण्याची माझी तयारी आहे.
३) कोणीतरी कुडबुडय़ा ज्योतिषी शोधायला हवा. माझी बॅग मला अशी डायरेक्टली वा इनडायरेक्टली का छळतेय ते जाणून घ्यायला.

मी पॅरिसचे काय वाकडे केले आहे ते तो एक नेपोलियन वा द गॉल जाणे, पण या शहराने माझ्या चालण्याच्या स्टॅमिनाचा अंत पाहण्याचाच विडा उचलला आहे. मी पहिल्यांदा तेथे कामासाठी गेलो तेव्हा तेथे मेट्रो, बस, टॅक्सी थोडक्यात तिथल्या सगळय़ा सुविधांचा सार्वत्रिक संप ऐन भरात आला असल्याने तेथल्या अपॉइंटमेंटस्साठी रोज वेगवेगळय़ा दिशेने जाण्या-येण्यापायी चौदा-पंधरा कि.मी.ची तंगडतोड करावी लागली होती. तीही फॉर्मल सुटाचे ओझे व चेहऱ्यावरचे हास्य ढळू न देता आणि वरती भारतात परतल्यावर ‘‘वा! अकरा नंबरचा टांगा तेथेही आहे का?’’ अशी सहकाऱ्यांची कुत्सित बोलणी ऐकून घ्यावी लागली होती.
काही वर्षांनी सपत्नीक टूरिस्ट म्हणून गेलो त्या या आठवणी घेऊन. पण तेथे ‘अच्छे दिन’ आले होते. जूनच्या छान हवामानात रोज दहा-बारा तास मनसोक्त भटकताना पॅरिसने पुन्हा इंगा दाखविला, असे स्वप्नांतही वाटले नाही. त्याचे असे झाले.
एका सकाळी ‘नॉटरडेम’ कॅथ्रेडल पाहून नंतर सीन नदीच्या काठाकाठाने लुव्र म्युझियमपर्यंत जाणाऱ्या अतिसुंदर रस्त्याने (जो मला पहिल्या तंगडतोड भेटीतच फार भावला होता) पायी सहल व म्युझियम भेटीनंतर पॅरिसचा सर्वात सुंदर भाग, म्हणजे कॉनकॉर्ड चौक, टूलिरी गार्डन्स, शांज लिजे रस्ता ते थेट आर्क-द-ट्रायम्फ अशा वॉकिंग टूरचे प्लॅनिंग होते. पण काय दुर्बुद्धी झाली. एकदम दमछाक नको म्हणून मोठय़ा चतुरपणे लुव्रसाठी नॉटरडेमहून मेट्रो घेतली. मध्ये दोन-तीनच स्टेशने पण ‘श्ॉटले’ (ूँं३’ी३) येथे ट्रेन बदलावी लागणार होती.
श्ॉटलेला उतरल्यावर बोध झाला. हा एक अगडबंब अंडरग्राऊंड भूलभुलैया आहे. हे पॅरिसचे सेंट्रल मेट्रो स्टेशन. येथे सर्व दिशांनी येणाऱ्या मेट्रो लायनी एकमेकांना छेदून पुढे जातात. स्टेशनचा ले-आऊटच चक्रावून टाकणारा. मधोमध एक प्रशस्त लांबलचक बोगदा, त्याला जागोजागी विमानतळावर असतात तसे सरकते रस्ते (कन्वेयर बॉक्स). त्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळय़ा प्लॅटफॉम्र्सकडे जाणारे असंख्य लहान बोगदे, त्यातील काहींना उपबोगदे आणि सर्व बोगद्यांत प्लॅटफॉम्र्सना खोलवर उतरणारे एस्केलेटर्स. वाचून गरगरले ना? मग पाहताना आम्ही किती गोंधळलो असू, कल्पना करा. आता लंडनमध्ये किंग्ज-क्रॉससारखी भव्य स्टेशने अनुभवली होती, पण श्ॉटलेचा असा पसारा पाहून छातीच दडपली.
हातात स्टेशनचा नकाशा घेऊन हवी असलेली लाइन व प्लॅटफॉर्म नक्की कोठे आहे याची खात्री करून मुसंडी मारली खरी, पण इच्छित प्लॅटफॉर्म काही केल्या सापडेना. अनेकांना विचारले नकाशावर बोट ठेवून ‘येथे जा’ असा सल्ला मिळायचा पण तेथे पोचल्यावर प्लॅटफॉर्म इल्ले! किती वेळा सरकत्या रस्त्यांवरदेखील धावलो, किती बोगद्यांतून किती वेळा एस्केलेटर्सनी खाली जाऊन शोध घेतला, गणतीच नाही. त्याच त्याच चार-पाच बोगद्यांत पुन:पुन्हा रपेट करून पाय थकले, तासभर वेळ पाण्यात गेला, आता ‘इनफ इज इनफ’ बाहेर पडणेच इष्ट असे ठरवून वळलो तोच एका हसतमुख जोडप्याने (बहुधा ‘हिच्या’ साडीमुळे असेल) आम्हाला अभिवादन केले आणि शेवटचा चान्स म्हणून आम्ही आमची रडकथा त्यांना ऐकवली.
त्यांनीसुद्धा नकाशावर बोट ठेवून ‘‘हा इथे तुमचा प्लॅटफॉर्म’’ असे सांगितल्यावर अणुयुद्धात पॅरिस नष्ट झाल्याचे वृत्त बीबीसी किंवा सी.एन.एन. जितक्या गंभीरपणे देईल त्याच टोनमध्ये मी त्यांना सांगितले- ‘‘तो प्लॅटफॉर्म या पृथ्वीतलावरून अदृश्य झाला आहे.’’ ते पण चक्रावले व आमच्याबरोबर शोधार्थ निघाले.
पुन्हा आमच्या स्वाऱ्या आता त्या ओळखीच्या झालेल्या बोगद्यात शिरल्या आणि आमचे गाईडपण गोंधळले. नकाशाप्रमाणे जेथे असायला हवा होता तेथे त्या प्लॅटफॉर्मची खरोखरच काहीही खूण नव्हती. त्यांनी कुठे तरी फोन लावला. फ्रेंचमधून बरेच ‘‘आऽऽई, वुऽऽई’’ असे हेल काढत व ऐकणारा समोरच असल्यासारखे हातवारे करीत ते कुणाशी काय बोलले, देव जाणे, पण फोन संपवून त्यांनी हसत हसत समोरच्या बोगद्याच्या एका छोटय़ा फाटय़ाकडे निर्देश करून ‘‘अहो, हाच त्या प्लॅटफॉर्मचा एन्ट्रन्स- फक्त इथली निऑनसाइन आज सकाळीच पडल्याने तुम्हाला उगाचच त्रास झाला.’’ असे म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला. त्यांचे पुन:पुन्हा आभार मानून आम्ही घाईघाईने प्लॅटफॉर्मवर उतरलो. समोरच्या त्या लाइन्सच्या नकाशात लुव्र स्टेशन असल्याची खात्री करेपर्यंत ट्रेन आलीसुद्धा. पटकन सीट पकडून हुश्श करताना पुढले स्टेशन आले आणि बायको दरवाजावरच्या इंडिकेटरकडे बोट दाखवून इंगळी डसल्यागत किंचाळली.
आम्ही चक्क उलटय़ा दिशेने लुव्रपासून दूर चाललो होते. मग काय, नंतरच्या स्टेशनला धडाधड उतरून पुन्हा योग्य दिशेने प्रवास. या सगळय़ा गोंधळात आमचा इतका वेळ वाया गेला होता की एव्हाना ओरिजिनल प्लॉनप्रमाणे लुव्रच काय, पुढे आर्कपर्यंतदेखील आम्ही पायी पायी आरामात पोचू शकलो असतो.
तेव्हापासून आमच्या घरात जरूर नसताना कुणाची निष्कारण तंगडतोड झाली तर ‘‘त्याचे श्ॉटले झाले’’ ही नवीन म्हण प्रचलित झाली आहे.
तात्पर्य:
१) या वेळी तो अज्ञात देवदूत सपत्नीक (किंवा पॅरिस आहे म्हणून समैत्रीण) मदतीला आला.
२) हवी तेथे पाटी नसणे हा काही आपलाच कॉपीराइट नाही.
३) नेपोलियन कुठलीशी लढाई म्हणे पाच मिनिटे उशिरा पोचल्यामुळे हरला होता. तो नक्की श्ॉटलेंत अडकला असणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पश्चिमी देशातल्या फजित्या (‘फजिती’चे बहुवचन बहुधा हेच असावे) कमी पडल्या म्हणून की काय, अतिपूर्वेच्या टोक्योमध्ये पण माझ्यामागचे शुक्लकाष्ठ काही टळले नाही. कामानिमित्त आठवडाभर मुक्काम होता. बिजनेस सेंटरपासून हॉटेल बरेच दूर, म्हणून टोक्योच्या मेट्रोचा अनुभव भीत-भीत चाखला. येथे मुंबईपेक्षाही जास्त गर्दी असते, गाडीत प्रवासी कोंबण्यासाठी स्पेशल स्टाफ असतो वगैरे वगैरे ऐकले होते, पण तसा काही प्रकार आढळला नाही. हॉटेलच्या अगदी जवळचे एक सबर्बन स्टेशन ते टोक्यो सेंट्रल आणि रिटर्न असा प्रवास इतका सोप्पा वाटला की, दुसऱ्या दिवशीच माझी कॉन्फिडन्स लेव्हल एकदम टॉपला पोचली. बस्स, आता रोज संध्याकाळी मेट्रोने टोक्यो भटकून नंतरच हॉटेलला परतायचे. लगेच तिथल्या नव्यानेच ओळख झालेल्या जपानी मित्राचा सल्ला घेतला.
‘‘वेली गुद आयदिया’’ त्याने अनुमोदन देत सल्ला दिला. पहिल्याच प्रयत्नासाठी ‘गिंझा’ विभाग ओके, कारण तेथून परतीचा प्रवास पंधरा-वीस मिनिटांचाच असेल. तेथे जाण्यासाठी व परतीच्या मेट्रो लाइन्सची नावे/नंबर व स्टेशनांची नावे एका कागदी चिटोऱ्यावर लिहून देऊन त्याने मला ‘बेस्ट लक’ दिले.
गिंझा म्हणजे टोक्योचा अतिगर्दीचा एरिया. टूरिस्ट, विशेषत: अमेरिकन टूरिस्टना आकर्षित करण्यासाठी जे जे लागते त्या सर्व प्रकाराच्या शॉप्सनी (त्यात अगदी ‘सर्व’ प्रकार आले) खच्चून भरलेला. मॉल्स, रेस्टॉरन्टस्, नाइट क्लबस्, रस्ते- सगळीकडे टूरिस्टच टूरिस्ट. सर्व उंच इमारतींवर अखंड वरपासून खालपर्यंत, लांबलचक, भडक रंगाच्या, दृष्टी गरगरवणाऱ्या निऑन जाहिराती. तासाभरातच सहनशक्ती संपुष्टात येऊन परतीच्या मेट्रोसाठी ते जपानी चिटोरे मी शोधू लागलो. पाकिटात नव्हते, मग शर्ट, पँट, कोट-सगळे खिसे धुंडाळूनही कुठेच नाही. तेथे मेट्रोची वेगवेगळय़ा लाइन्सची दोन-तीन स्टेशन्स होती. पण कोणतेच नाव ओळखीचे वाटेना. आता परत जायचे कसे?
मी चतुरपणे निर्णय घेतला. टोक्यो सेंट्रलला कसे जायचे हे कुणीही सांगेल, तेथून नेहमीची लाइन घ्यायची म्हणजे नो प्रॉब्लेम! तेथे पोचलो खरा, पण त्या अतिप्रचंड स्टेशनच्या भलत्याच अनोळखी कोपऱ्यात उतरल्यामुळे जेथून परतीच्या प्लॅटफॉर्मला जाता येईल ते कालच ओळखीचे झालेले गेट सापडेचना. सगळीच गेट सारखी दिसायला लागली. अगदी ‘श्ॉटले’ झाले. या संशोधनात बराच वेळ वाया. एकंदरीत काय, आधी कंटाळवाणे साइटसिइंग आणि हा असा परतीचा वेळखाऊ प्रवास.
हॉटेलरूममध्ये शिरल्या क्षणी प्रथम सकाळपासून चढवलेल्या कोटाचे ओझे अक्षरश: ओरबाडून काढले आणि नेहमीप्रमाणे कोटाच्या अगदी आतल्या खिशात हात गेला. ही माझी प्रवासातली जुनी सवय.. त्या छोटय़ा खिशात इमर्जन्सी तरतूद म्हणून एक शंभर डॉलर नोट ठेवायची आणि रोज दिवसाअखेरीस ती जागेवर आहे ना ते चाचपायचे. आज नोटेबरोबर हाताला आणखी काय लागतेय म्हणून काढून पाहिले तर ते ऐतिहासिक जपानी चिटोरे. याचा अर्थ, ‘हा फार महत्त्वाचा कागद आहे.’ असे माझ्या मनाने माझ्याही नकळत ठरवून तो अंगावरच्या सर्वात सुरक्षित जागी ठेवला आणि ‘तेथे तो नसणारच’ असे माझ्या कळत मनाने ठरविल्याने फक्त तोच खिसा धुंडाळण्याची तसदी मी घेतली नाही. तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी- दुसरे काय?
अशी ही साठा उत्तराची फजित कहाणी सुफळ.. नक्की संपूर्ण? की पुढल्या टूरमध्ये आणखी काही? वेट अ‍ॅण्ड सी!
आता फायनल तात्पर्य :
१) तो अज्ञात देवदूत प्रत्येक वेळी येईलच असे नाही. मंगळभेट कॅन्सऽऽल!
२) देशाटनाने मी खरोखरच चतुर झालो आहे. तीच चूक पुन्हा न करता फजितीची नवी नवी आयुधे शोधून काढण्याचे चातुर्य मी पैदा केले आहे.
३) त्यात पण मजा असते यार! मिळमिळीत प्रवास काय कामाचा. तुम्हीपण एकवार अनुभव घेऊन खात्री करा.
नरेंद्र चित्रे – response.lokprabha@expressindia.com