साधना
वैचारिक मेजवानीसाठी ‘साधना’च्या दिवाळी अंकाची आवर्जून वाट बघितली जाते. यंदाच्या दिवाळी अंकात वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती असा एक वेगळा विभाग अंकात आहे. त्यात ज्येष्ठ संपादक दिलीप पाडगावकर यांची आनंद आगाशे यांनी घेतलेली मुलाखत वाचनीय आहे. गेल्या तीसेक वर्षांतील राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या क्षेत्रांची अभ्यासपूर्ण सफर या मुलाखतीतून घडते. अभय टिळक यांनी घेतलेली अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांची मुलाखत आर्थिक क्षेत्रातल्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारी आहे. संध्या टांकसाळे यांनी घेतलेल्या ‘प्रथम’चे संस्थापक, संचालक माधव चव्हाण यांच्या मुलाखतीतून ‘प्रथम’च्या कामाची व्याप्ती तर कळतेच, शिवाय सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवरही झोत टाकलेला आहे. विनोद शिरसाठ यांनी घेतलेल्या जब्बार पटेल यांच्या मुलाखतीतून ‘सामना’ सिनेमाविषयी विविधांगी चर्चा आहे. िरगण नाटय़कर्ते अतुल पेठे यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली मुलाखत िरगणचा प्रवास उलगडून दाखवते. हेरंब कुलकर्णी यांनी ‘वीटभट्टय़ांचं आणि ऊसतोडीच्या थळातलं जग’ या लेखात वीटभट्टी तसंच ऊसतोड कामगारांच्या वास्तव जगण्याचा वेध घेतला आहे. ‘अनवट गुरुजी- जयंत वैद्य’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख लातूरमधल्या एका आगळ्यावेगळ्या माणसाचं दर्शन घडवतो. राज्यसभा टीव्हीवर ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ‘संविधान’ नावाची एक अत्यंत अभ्यासपूर्ण मालिका अलीकडेच प्रदर्शित झाली. चित्रनगरीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक या नात्याने लक्ष्मीकांत देशमुख त्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. त्यांनी त्याविषयी एका कलावंताच्या नजरेतून भारतीय राज्यघटना हा लेख लिहिला आहे. संध्या गोखले यांनी ‘बहुधार्मिकतेचा कायदेशीर पेच’ या लेखात जगभरातील वाढत्या कट्टरवादाच्या वास्तवाचा परामर्श घेतला आहे. ‘राजकारण आणि लोकशाही’ हा सुरेश द्वादशीवार यांचा लेखही वाचनीय आहे.
संपादक : विनोद शिरसाठ.
पृष्ठे १९४, किंमत १०० रुपये.

साहित्यआभा
अंकाच्या सुरुवातीलाच ‘कृषिप्रधानाला शोभणारा पंतप्रधान’ हा लालबहादूर शास्त्री यांच्यावर संजीव पाध्ये यांनी लिहिलेला लेख आहे. एरवीचे तुकाराम महाराज आपल्याला माहीत असतात, पण ‘शेतकरी कुटुंबातील संत तुकाराम’ हा वि. शं. चौगुले यांनी लिहिला आहे. स्वामिनी रुद्रभाटे यांनी सामूहिक कौटुंबिक शेती ही काळाची गरज कशी आहे याबद्दल लिहिले आहे. डॉ. तारा भवाळकर यांचा ‘पाऊस, पाणी आणि बाई’ हा लेख वाचनीय आहे. डॉ. विजया वाड यांनी विश्वकोशाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. ‘माझे जीवनगाणे’ या विभागात देवकी पंडित, श्रुती सडोलीकर, पंडित संजीव अभ्यंकर, बेला शेंडे, उत्तरा केळकर यांचे लेख आहेत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी पाकिस्तान आणि चीन आपल्याशी पारंपरिक युद्ध कसे करत आहेत यावर प्रकाश टाकला आहे. आरती साठे यांनी पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक डॉ. ए. क्यू. खान यांचा परिचय करून दिला आहे. सुधीर पुराणिक यांनी स्फटिकशास्त्रातील भारताच्या योगदानाचा आढावा घेतला आहे. विनिता ऐनापुरे, बाळ राणे, शशिकांत काळे यांच्या कथा आहेत. पत्रकारांचा ससेमिरा, आठवणीतील निवडणुका, मोदीनॉमिक्स प्रत्यक्षात येणार का, तसेच कविता असा भरगच्च मजकूर अंकात आहे.
संपादक : शारदा जयंत धुळप.
पृष्ठे २१६, किंमत १५० रुपये.

जडण-घडण
‘जडण-घडण’ मासिकाच्या दिवाळी अंकाची शौर्य विशेषांक ही थीम आहे. पहिल्या महायुद्धाला सुरुवात होऊन नुकतीच शंभर वर्षे झाली. त्यानिमित्त या महायुद्धाचे विश्लेषण अंकात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला साडेतीनशे वर्षे झाली त्यानिमित्त ‘सिंधुदुर्गच्या अस्तित्वाची लढाई’ हा लेख आहे. दादरा-नगर-हवेली रणसंग्रामाला साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने या रणसंग्रामातील हिरो आणि पुढे गोव्याचे पोलीस प्रमुख झालेले प्रभाकर सिनारी, फिल्डमार्शल माणेकशॉ, लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, लेफ्टनंट जनरल एस. पी. थोरात यांच्यावर लिहिलेले लेख या अंकात आहेत. मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी नागपुरातील ‘प्रहार’ ही संस्था, पुण्यातील लष्करी संस्था, कारगिल युद्धातील हिरो, आपल्या सैन्यदलांविषयीची माहिती, त्यातील करिअरविषयक मार्गदर्शन, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची माहिती, मराठा लाइट इन्फन्ट्रीची माहिती, शिवरायांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची लष्करी पंरपरा, व्हिक्टोरिया क्रॉस विजेते यशवंत घाडगे, नामदेव जाधव आणि परमवीरचक्रप्राप्त रामा राघोबा राणे यांच्या पराक्रमाची गाथा अशा सगळ्या माहितीने हा अंक सजलेला आहे. लष्कराविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाला हा अंक वाचनानंद देणारा आहे.
संपादक : डॉ. सागर देशपांडे
पृष्ठे २१२, किंमत १३० रुपये.