28 September 2020

News Flash

ब्रॅण्डिंगविषयी सर्व काही..

इंग्रजी भाषेत या आणि अशा प्रकारच्या विषयांवरची अनेक सकस प्रकाशने आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

स्वाती घारपुरे – दिवेकर

‘बोलका कॅमेरा’, ‘जाहिरातीचे जग’ आणि ‘ग्राफिक डिझाइनचं गारुड’ या तीन नावाजलेल्या, पारितोषिक प्राप्त पुस्तकांच्या लेखिका यशोदा भागवत यांचे आणखी एक पुस्तक ‘ब्रॅण्डिंगचे कधीही न बदलणारे २२ नियम’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. अल् राइस आणि लॉरा राइस यांच्या ‘२२ इम्म्युटेबल लॉज् ऑफ ब्रॅण्डिंग’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. बायबलमधल्या ‘१० कमान्डमेंटस्’सारखे मांडलेले हे ब्रॅण्डिंगचे २२ नियम मराठी भाषेतून विपणनाचा (मार्केटिंग) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतील. हे पुस्तक मराठी व्यावसायिकांनाही उपयोगाचे वाटेल.

इंग्रजी भाषेत या आणि अशा प्रकारच्या विषयांवरची अनेक सकस प्रकाशने आहेत. परंतु मराठीत त्याची कमतरता आहे. अनेक वर्षे स्वत:ची जाहिरात एजन्सी चालवली असल्यामुळे ‘ब्रॅण्डिंग’ या विषयावरील सामान्य माणसांचे किंवा मराठी विद्यार्थ्यांमधील कुतूहलाचे आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी लेखिकेने हा विषय निवडला असावा. पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटलेय की, ‘विक्रीऐवजी खरेदीचा कल इतका झपाटय़ानं वाढतो आहे की, एखादा भूकंप व्हावा तशी बरीच उलथापालथ सध्या उद्योगविश्वात होते आहे; आणि ब्रॅण्डचा उदय हेच त्यामागचं कारण आहे!’

हे ब्रॅण्डिंग प्रकरण नेमके आहे तरी काय? तर वस्तुविक्रीकलेतला एक महत्त्वाचा गाभा! ब्रॅण्डिंगचे नियम अनुसरून कोणत्याही प्रकारचा ब्रॅण्ड निर्माण करता येऊ  शकतो.. अगदी दूध, ब्रेडपासून संगणक किंवा गाडय़ांपर्यंत, कशाचाही! ब्रॅण्ड म्हणजे एखाद्या वस्तूची, कंपनीची, किंबहुना एखाद्या व्यक्तीचीही वैशिष्टय़पूर्ण ओळख. अर्थातच ग्राहकांच्या मनात ब्रॅण्डविषयी असलेल्या या प्रतिमेवरच त्या ब्रॅण्डचे भविष्य अवलंबून असते. बाजारात एखादा ब्रॅण्ड घडताना किंवा बिघडत असताना त्यामागे केला गेलेला विचार हे पुस्तक वाचकाला साध्या, सोप्या भाषेत सांगते. लेखिकेच्या याआधीच्या सर्व पुस्तकांप्रमाणेच लेखनशैली हे याही पुस्तकाचे बलस्थान आहे. क्लिष्ट मराठी शब्दांचा अट्टहास न करता प्रचिलत इंग्रजी शब्दांचा केलेला वापरही स्वागतार्ह आहे.

विपणनाची तंत्रे विशद करताना पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. किंबहुना आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंबाबत एक ब्रॅण्ड म्हणून वाचताना गंमत वाटते. ‘मर्सेडिज’, ‘स्टारबक्स’, ‘झेरॉक्स’, ‘रोलेक्स’, ‘फेडेक्स’ यांसारख्या अनेक प्रथितयश ब्रॅण्ड्सच्या निर्मितीच्या कहाण्या एकेका नियमाच्या संदर्भाने थोडक्यात, पण रंजकतेने समोर येतात. कुठलाही ब्रॅण्ड मनुष्यासारखाच अजरामर नसतो, हे ‘कोडॅक’च्या उदाहरणाने लक्षात येते. त्याचप्रमाणे ‘ब्रॅण्ड जन्माला आला की, त्याला निरोगी ठेवण्यासाठी गरज असते ती जाहिरातीची’ हे ‘झेरॉक्स’ कंपनीच्या जाहिरात धोरणातून दिसून येतं. ‘ब्रॅण्ड्स जन्म घेतात, मोठे होतात, प्रौढ होतात आणि सरतेशेवटी मरतात’ यासारखी वाक्ये पुस्तकाला निव्वळ भाषांतराच्या परिघातून बाहेर ठेवतात.

‘ब्रॅण्ड’ या शब्दाची व्याख्या काय? आपला ब्रॅण्ड दुसऱ्याच्या ब्रॅण्ड्सपेक्षा वेगळा आहे, अधिक सरस आहे हे ग्राहकाच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी कोणती नीती वापरली? ब्रॅण्डचा अधिक प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून काय विचार केला जातो? अशा प्रश्नांचा ऊहापोह या पुस्तकात केला गेला आहे. ‘लवकरच अशी एक वेळ येईल की, मार्केटिंग ही संकल्पना पूणर्पणे लुप्त झालेली असेल आणि तिच्या जागी येणाऱ्या नव्या संकल्पनेचं नाव ‘ब्रॅण्िंडग’ हेच असेल’ या वाक्यातून या विषयाच्या कॉर्पोरेट जगतातील भविष्यातील स्थानाविषयीचे भाकीत करण्यात आले आहे.

सध्याचा सर्वात वापरात येणारा ‘ऑनलाइन ब्रॅण्डिंग’ किंवा ‘इंटरनेट ब्रॅण्डिंग’ हा मुद्दा उदाहरणे देऊन पुस्तकात मांडलेला नसला, तरी या पुस्तकातील २२ नियम ऑनलाइन ब्रॅण्डिंगलाही चपखलपणे लागू होतील. थोडक्यात, ब्रॅण्डिंग या विषयाबाबत अथपासून इतिपर्यंत ज्ञान मराठीतून हवे असेल, तर हे पुस्तक आवजूर्न वाचायला हवे. अमेरिकेत जाहिरात क्षेत्रात कायर्रत असलेल्या अल् आणि लॉरा राइस या बापलेकीच्या प्रख्यात जोडीचे हे पुस्तक असल्याने मुख्यत्वेकरून अमेरिकी ब्रॅण्ड्सचीच उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात. या २२ नियमांच्या २२ प्रकरणांच्या जोडीला भारतीय ब्रॅण्ड्सच्या कथांचे २३ वे प्रकरण पुढील आवृत्तीत जोडता आले, तर वाचकांसाठी नक्कीच अधिक वाचनीय आणि माहितीपूर्ण होईल.

‘ब्रॅण्डिंगचे कधीही न बदलणारे २२ नियम’

– अल् राइस/ लॉरा राइस,

अनुवाद – यशोदा भागवत,

मौज प्रकाशन गृह,

पृष्ठे – १६२, मूल्य – ३०० रुपये.

divekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 1:02 am

Web Title: article about everything about branding book review
Next Stories
1 मानवी कल्पकतेच्या दृश्यखुणा..
2 उद्योगविश्वावर क्ष-किरण
3 मंदावता सगळी उन्हे..
Just Now!
X