News Flash

अफझुलखानाच्या मृत्यूचा फार्स

पुस्तकाच्या नावापासूनच कुतूहल जागृत होणाऱ्या पुस्तकांपैकी एक म्हणजे ‘अफझुलखानाच्या मृत्यूचा फार्स’. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा फार्स या प्रकाराचा विषय होऊ शकतो,

| August 2, 2015 01:01 am

पुस्तकाच्या नावापासूनच कुतूहल जागृत होणाऱ्या पुस्तकांपैकी एक म्हणजे ‘अफझुलखानाच्या मृत्यूचा फार्स’. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा फार्स या प्रकाराचा विषय होऊ शकतो, हे सहज पटण्यासारखे नाही. मुळात फार्स- जो आपल्याला ‘प्रहसन’ या अर्थाने माहीत आहे, तो जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी होता हे ऐकून/वाचून नवल वाटणे स्वाभाविक आहे. या पुस्तकाची जी अनेक वैशिष्टय़े आहेत ती प्रथम पाहू.
* दुसऱ्या आवृत्तीवर लेखकाचा नामनिर्देश नाही. फक्त मुद्रक-प्रकाशनाचा आहे.
* बत्तीस पाने (छायाचित्रांसकट) एवढी कमी लांबी असूनही त्याची किंमत सहा आणे एवढी (त्याकाळचे राहाणीमान लक्षात घेता प्रचंड मोठी) होती.
* या नाटकात दोन डझन पात्रे, बारा प्रवेश. दहा स्थळे (जेथे नाटक घडते) आहेत.
गद्य संवादात्मक नाटक असले तरी भवानी मातेची आरती व एक स्तवन (शिवाजीच्या तोंडी) अशी दोन पद्यपुरके आहेत. दोन्ही आठव्या प्रवेशात आहेत. स्तवन ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या प्रसिद्ध नांदीच्या चालीवर आहे.
* नाटकातील पात्रांमध्ये शिवाजी, जिजाबाई, रामदास स्वामी, अफझुलखान आणि प्रत्यक्ष भवानी माता यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रवेशावर तो घडण्याचे स्थळ व त्यातील पात्रे यांचा निर्देश आहे. नाटकाला नटी-सूत्रधाराच्या प्रवेशाशी साम्य असलेल्या प्रवेशाने सुरुवात होते. मात्र, त्यात दोन कारकून नाटकाची पाश्र्वभूमी विषद करतात. कथानकात आपल्याला माहीत असलेले कथानक आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध वाघनखांनी केला. परंतु इथे शिवाजी महाराजांनी तो ठरवून केला असे म्हटले आहे. रूढ इतिहासाप्रमाणे अफझलखानाने शिवाजीला अलिंगन देण्याच्या मिशाने सुरी मारायचा प्रयत्न केला, पण चिलखतामुळे महाराज बचावले. दगा फटका होईल असा संशय महाराजांना असल्याने त्यांनी वाघनखे चढवली होती. सुरीचा वार फसल्यावर महाराजांनी खानाला वाघनखांनी ठार केले. हा आपल्याला शाळेत शिकविला/ सांगितला गेलेला इतिहास. नाटकात दाखविले आहे, की महाराजांनी पहिल्यापासूनच वाघनखांनी खानाचा वध करायचे ठरविले होते. तो बेत त्यांनी आपल्या सरदारात बोलून दाखविला होता. खानाने महाराजांना ठार करण्याचा प्रयत्न केलाच नाही. रूढ इतिहासाच्या हे अगदी विरुद्ध आहे.
केवळ ऐतिहासिक प्रतिपादनाच्या विरोधातच हे नाटक आहे असे नाही. जिजाबाई येथे आपल्याला एका प्रेमळ किंवा अति प्रेमळ मातेच्या रूपातच भेटते. ‘‘कालपासून शिवाजी माझेकडे आला नाही. अशा कोणत्या गडबडीत आहे कोण जाणे, पण जर करिता एक क्षणभर त्याला पाहिले नाही तर मला चैन पडत नाही. आता अगोदर जाऊन तो कोठे आहे याचा शोध घेऊन ये बरं’’ (दासीला सांगते). त्यावेळेस शिवाजीचे वय २९ होते आणि त्याचा तिसरा (किमान) विवाह झालेला होता.
शिवाजी ज्यावेळेस जिजाबाईस सांगतो की, अफझुलखान फौज घेऊन आला आहे. त्याच्या भेटीस जावयाचे आहे. तेव्हा ती सांगते, ‘‘बरे शिवबा, आपला काळ प्रतिकूल आहे आणि तू अशी खटपट करितोस. त्या योगाने आपल्यास व तिकडे (विजापुरास शहाजी बादशहाचे पदरी असल्या कारणाने) दु:ख मनात आणले म्हणजे काही चैन पडत नाही.’’ (असे म्हणून डोळय़ात पाणी आणते.)
म्हणजे स्वातंत्र्यप्रेमाची शिवाजीला शिकवण देणारा कणखर माता मागे राहून सामान्य स्त्री पुढे येते. जिजाबाई शिवाजीला प्रथम भवानी मातेचे दर्शन घे, मग गुरू रामदासांचा आशीर्वाद घे व मग आपल्या राणीला भेट. क्रमबदलू नको असे सांगते. शिवाची मात्र सर्वात प्रथम राणी सकवारबाई, मग भवानी माता व मग रामदास असा क्रम लावतो.
शिवाजी-सकवारबाई यांच्या प्रवेशावर सौभद्र मधल्या कृष्ण-रुक्मिणी प्रवेशाची दाट छाया आहे. शिवाजी सकवारबाईला म्हणतो, ‘सरकार आता का असेच उभे राहावयाचे आहे? माझे पाय दुखतात. इकडे येऊन शेजारी बसा. म्हणजे माझे समाधान होईल.’ यावर सकवारबाई पुढे येते आणि शिवाजीच्या अंकावर बसते (प्रवेश ७). हा साराच प्रकार प्रत्यक्ष घटनेच्या घडण्याला किमान २५०-२७५ वर्षे लोटल्यावर जो समाज होता त्यातला वाटतो.
जिजाबाई, शिवाजी दोघांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘सामान्य’त्व दाखविणाऱ्या या घटना होत. समर्थ रामदाससुद्धा- ‘सर्व संकटातून मुक्त करण्यास सीताराम समर्थ आहे.’ एवढेच शिवाजीला आश्वासनात्मक सांगतात. समर्थ रामदास यांच्या रूढ प्रतिमेला खूपच धक्का बसतो.
शिवाजीची स्वारी करण्यास/त्याचा बंदोबस्त करण्यासाठी अफझुलखानाला पाठवावे हा सल्ला अकबराला देणाऱ्या मुत्सद्याचे नाव बिरबल दाखवले आहे. खऱ्या बिरबलाप्रमाणे फार्समधल्या बिरबलालाही युद्धशास्त्राची/मराठय़ांच्या युद्ध तंत्राची माहिती नसावी. बिरबलाचे युद्धशास्त्रातले अनभिज्ञत्व अधोरेखित करण्यासाठी फार्समध्ये बिरबल हे नाव दिले असावे.
हे नाटक प्रथम रंगमंचावर आले तेव्हा ब्रिटिश विरोधी भावना अधिकाधिक तीव्र होत होती. शिवाजीसारख्या राष्ट्रपुरुषांची आठवण व गौरव करणे हा स्वातंत्र्यलढय़ाचा भाग होता. अशा वेळेस शिवाजीची रूढ प्रतिमा भंजून त्याने खानाला आपण होऊन, खानाने काहीच दगा केला/ करायचा प्रयत्न केला नसताना ठार केले हे दाखविणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाणे होते. अर्थात, थत्त्यांनी जिजाबाई, शिवाजी, रामदास या व्यक्तीही खूप वेगळ्या दाखविल्या आहेत. शिवाजीच्या तोंडी, ‘आईसाहेब काल किनै मी थोडासा गडबडीत असल्याकारणाने आपले दर्शन होण्यास चुकलो याची माफी असावी.’ (प्रवेश ६) अशी भाषा दाखविणे हे निश्चितच फार अनाकलनीय आहे.
थत्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न का केला असावा? ‘एकवार तो आपल्या सपाटय़ात आला की बच्चमजीची अगदी/चांदी करता येईल,’ असे उद्गार शिवाजीने दामाजीपंताजवळ काढले हे प्रेक्षकांनी कसे स्वीकारले असेल? खरे काय ते शोधणे फारच उद्बोधक ठरेल.
‘अफझुलखानाच्या मृत्यूचा फार्स’-
काशिनाथ महादेव थत्ते
प्रकाशक : गोविंद मोरोबा कार्लेकर, पहिली आवृत्ती : १८८६, दुसरी आवृत्ती : १८९० पृष्ठे : ३२,
 किंमत – सहा आणे.
vazemukund@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:01 am

Web Title: book review based on afzal khan death
Next Stories
1 बाजार
2 मुक्काम विद्यापीठ (भाग १)
3 मुंबई जलप्रलय.. शोध अन् बोध
Just Now!
X