वाचकहो, वृत्तपत्रे सोळा दुणे छत्तीस पानी झाली आणि च्यानेले ४८ बाय १४ अशा प्रकारे वृत्तरतीब घालू लागली, तरी झाडून सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत कशा पोचणार? अखेर माध्यमांच्या पण काही मर्यादा असतात ना! जाहिराती असतात, पेड न्यूज असतात. झालेच तर दबाव असतात. त्यामुळे काही झाकावयाचे, काही मोठ्ठे करून दाखवायचे ऐसे संपादकीय संस्कार तर माध्यमांस करावेच लागतात. त्यामुळे होते काय, की पाच मिन्टांत सतराशे शहरांच्या दीड हजार बातम्या द्यायच्या म्हटले तरी काही महत्त्वाच्या घटना तुमच्यापर्यंत यायच्या राहूनच जातात.
उदाहरणार्थ, आमचे परमलाडके नेते व महाराष्ट्राचे जाणते राजे शरदराव पवार ऊर्फ साहेब लवकरच ‘कॉमेडी नाइट विथ कपिल शर्मा’मध्ये येणार आहेत, हे वृत्त आले तुमच्या कानी? नसणारच!
पण तुमच्या ज्ञानवृद्धीकरिता सांगतो, परवाच्या आयरोलीतील सभेनंतर साहेबांकडे दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांचे प्रस्ताव आले होते. मागेच लागले हो लोक! आता साहेब का मोकळे आहेत? निवडणूक आहे, प्रचारसभा आहेत, झालेच तर मंत्रिपद आहे. रात्र थोडी सोंगे फार, अशी अवघी गत! पण मंडळी ऐकतच नव्हती. आमीर खान तर डोळे पुसतच आला होता. म्हणत होता, ‘‘पवारसाब, गोपीनाथ मुंडेजींनंतर लोकशाहीतील सत्ये सांगणारे तुम्हीच! मुंडेजींनी नोट का सच बताया. आपने व्होट का! कितनी बडी बात! तुम्ही आलात तर पता है अपना शो कौन देखेगा?..’’ पण साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, ते सत्य नव्हते. खुसखुशीत विनोद होता. ते सत्य ऐकून एवढा मोठा स्टार आमीर; पण अगदी भारावला. डोळे पुसत म्हणाला, ‘पता है, इन्हे देश की फिक्र है!’ पण कपिल शर्मा असा द्वाड. पिच्छाच सोडेना. म्हणाला, ‘तुम्ही तर आमचे गुरू!’ साहेबांनी त्यास किती समजावले, की बाबा रे, िशदेंना विचार. पण कपिलने अशी काही बोलंदाजी केली, की अखेर साहेबांना होकारच द्यावा लागला. येत्या मंगळवारी साहेबांचा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
तुम्हांस मग बहुधा ही बातमीही समजली नसेल, की यंदाचा मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार साक्षात भाजपभाग्यविधाते नमोजी यांना देण्यात येणार आहे!
नमोजी हे तसे राजकारणी. पण ते जसे इतिहासतज्ज्ञ आहेत, तसेच कवीहृदयाचेही आहेत. त्यांनी काही कविता लिहिल्या आहेत. (पद्मश्री पद्मजाबाई, लक्ष कुठंय तुमचं?) मात्र एवढय़ावरच नमोजींची सुसंस्कृतता थांबत नाही. ते चक्क गातातसुद्धा! भाजपच्या प्रचारफितीमध्ये त्यांनी काही ओळी गायल्या आहेत, त्यावरून त्यांची या क्षेत्रातील गती कोणाच्याही लक्षात येईल. किराणा घराण्याचे (शुद्ध खुदरा! एफडीआयमिश्र!!) संस्कार त्यांच्या कंठावर असल्याचे सांगण्यात येते. तर येत्या मंगळवारी भारतबाला प्रॉडक्शन त्यांच्या गाण्यांची नवी ध्वनिफीत बाजारात आणत आहे. खुद्द लालजी अडवाणींची प्रस्तावना असलेल्या या ध्ननिफितीचे शीर्षक आहे- ‘मिले सूर मेरा तुम्हारा!’ त्यात नमोजी भीमसेनजींच्या भूमिकेत असतील!!
आणि तुम्हांस हे तरी समजले आहे का? बालगोिवदांवर बंदी घालण्याच्या बातमीने काँग्रेसच्या वर्तुळात केवढी तरी अस्वस्थता पसरली आहे. खुद्द म्याडम सोनिया गांधी यांनी त्याची दखल घेतली आहे. आता एखादा अध्यादेश काढून ही बंदी मागे घेता येईल काय, याची चाचपणी १० जनपथवरून सुरू आहे.
यात समस्या आहे ती राहुल गांधी यांची. अध्यादेश फाडण्याच्या त्यांच्या सवयीचा पंतप्रधानांनी अगदीच धसका घेतला असल्याने ते त्यास तयार नाहीत. तेव्हा एकतर हा अध्यादेश ताम्रपटावरच कोरून घ्यावा किंवा मग सरळ जाऊन राहुल यांनाच सांगावे, की राहुलजी, ही बंदी म्हणजे बालगोिवदांना वरच्या थरावर जाता येऊ नये यासाठी रचण्यात आलेले षड्यंत्र आहे. ती लागू झाली, तर तुमचाच प्रॉब्लेम होईल!
अशा अनेक बातम्या वाचकहो, तुमच्यापर्यंत पोचतच नाहीत.
म्हणजे राज ठाकरे यांची ब्लू िपट्र तयार झाली आहे. आता ती कधी जाहीर करायची, याची ब्लू िपट्र तयार करण्याचे काम सुरू आहे, हे तुम्हांस समजले आहे?
आपले लाडके नेते अरिवदभाऊ केजरीवाल येत्या मंगळवारी दूरचित्रवाणीवरून एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते मुकेश आणि अनिल अंबानी यांचे शाईच्या कारखान्यांमध्ये शेअर्स असल्याचा गौप्यस्फोट करणार आहेत, हे तरी तुम्हाला माहीत आहे?
वाचकहो, वाचकांच्या माहितीच्या अधिकाराचे हे उल्लंघनच नव्हे, तर हनन आहे. या विरोधात खुद्द आम्ही एकटे साखळी उपोषण करणार आहोत. मेणबत्त्या घेऊन या आणि पाहा. स्थळ आहे- आझाद मदान. आणि तारीख –  १ एप्रिल.