|| मेधा पाटकर

आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लिहिताना अनेक संघर्षांच्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. डोळ्यासमोर निपचित पडलेली नर्मदा जलकुंभीची चादर ओढून पडलेली; शयनगृहात रात्र घालवणारी स्त्री अचानक बेघर होऊन गोणपाट अंगावर लेऊन पहुडावी तशी! रोजची नर्मदेची बदलती रूपे ही केवळ नदीचे रंगबेरंग नव्हेत, तर नदीमाता पुजणाऱ्यांचे जगणेही सडत, कुजत ठेवणारी. आपल्या मर्यादेत लचकत, मुरडत चालणारी ही नदी कधी उच्छृंखल तर कधी निश्चल होता होता आज सारे किनारे ओलांडून अस्ताव्यस्त अवस्थेत पसरलेली युवती जणू! तिचे अवयव आजवर जलोघानेच झाकले असले तरी तिच्याशी होणारा व्यभिचार नाही लपवता येत. त्यातच वाहताहेत कुठे आज वरून येणाऱ्या कुडाकचऱ्यात अडकून थबकलेल्या आठवणीच!

उपोषणामध्ये स्वत:ला आणि समाजालाही आवाहन करता करता आव्हान दिले जाते, हे प्रत्येक दीर्घ उपोषणाच्या निमित्ताने अधिकाधिक समजत गेले. गांधीजींच्या उपोषणाच्या अनेक कहाण्यांत- त्यांनी लवंग चघळत मेंदूवर होणारा परिणाम टाळला- अशा अनेक अनुभवांची गुंफण आम्ही सारेच दूर ठेवून पाण्यावर जगत गेलो. खरे तर साथ-समर्थनावर अधिक. मात्र गांधीजींच्या उपवासावर उतरण्याच्या निर्णयाची चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांच्या पातळीवर कसे अनेक प्रश्न उठवतच होत असत, हे वर्णनही मला फार दिलासा देणारे.. आंदोलनातही उपोषणाचा निर्णय कधी सहजासहजी होत नसेच. तरीही परिस्थितीच्या घेराव्यात आल्यावर ‘क्या कर सकते है.. कोई अन्य विकल्प हो तो बताईये,’ असे म्हणत, ‘सुचवा.. सुचवा’ म्हणताना अखेरीस यावरच उतरावे लागत असे. ही कसरत साधी सोपी नसायचीच. सोबतचे जिवाभावाचे आणि आंदोलनाचे सारे आतले-बाहेरचे जाणणारे कार्यकत्रे हा सर्वात आतला पदर. त्याबाहेरचे समर्थक, कार्यक्रमाचे कुशल आयोजक, ऊर्जावान युवांचा समूह.. विशेष रणनीतिज्ञ.. एक ना अनेक! साऱ्यांचा संपर्क, विचारविनिमय आणि त्यातून विपरीत परिस्थितीत अस होऊन टोकावर जाणे. उपोषण जमेल एकवेळ, पण मौन नाही, असे म्हणत सामना व्हायचा तो सतत चच्रेला येणाऱ्यांशी. गावागावातल्यांनाही एका स्थानी स्थिर बसले असताना आपल्या मागण्या मांडण्याचा ऊतच येत असे, आणि आपली ढासळती ताकद कमी पडत असे. मात्र, या साऱ्या ८, १८ किंवा २१वा २६ दिवसांच्या दुनियेतले अनेकानेक प्रसंग या अिहसक मार्गावरचे सारे खाचखळगे दाखवतच पुढे नेणारे..

उपोषणाच्या आधीची रॅली ही १९९३ मध्ये कुठे वाहनातून तर कुठे पायी चालत उपोषणाकडे पोहोचवणारी. यानेच तर संदेश पोहोचत असे. आक्रोश खोऱ्यातून उठून बाहेर पडलेला.. ठाण्यामध्ये साऱ्या दलित वस्तीने स्वागत केले, रॅलीतील साऱ्यांना खायला प्यायला दिले, तेही घरघरची पोळी-भाजी गोळा करून. तेव्हा मध्य प्रदेशातील शेतीभातीसह जातीपातीही जपणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या मनातील भिंती कोसळून पडल्या. आंदोलनाचे हे केवढे मोठे यश! हे मनात दाटून आले तरी वेगवेगळ्या टप्प्यांवर या आव्हानाला सामोरे जाणे चालूच.

जाति पाति भूल जा, तू धनकी शान भूल जा।

बस् जिंदा और मुर्दे में क्या फर्क है बताये जा.. या गाण्यातल्या ओळी अशातूनच स्फुरलेल्या. फेरकुवा हे मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरचे गाव. तिथेच संघर्षगाव वसवलेले शेतकरी, शेतमजुरांनी. पाच हजार स्त्री-पुरुष बाबा आमटेंसह राजघाटवरून निघतानाचा माहौल होता समर्पणाचा. समíपत दल जाहीर करून, त्यांच्या गळ्यात नर्मदेच्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्या घालून निघताना जो भाव वातावरणात भारलेला, भरलेला होता तो त्या ३६ दिवसांच्या संघर्षांत कायम टिकला कसा, हेही विसरता न येण्याजोगे. रोज नवनव्या घोषणा, गीते आणि कार्यक्रमही.. माहौल जीवन समर्पणाचाच, कारण बिहारचा मेघनाद तर शेतकऱ्यांच्या साऱ्या प्रश्नांना हात घालणारी पिपरीची शांताबाई आणि सावऱ्या दिगरचे खाज्याभाई हे सारे माझ्या अवतीभोवती. देवरामभाई तर उपोषणाच्या मार्गाचे खंदे पुरस्कत्रे. या साऱ्यांपुढे शासनाचे येणे-जाणे किती कमजोरच काय, तडजोडीचे असते ते दर खेपेस अनुभवतात आंदोलनकारी- ‘संवाद नाही, निर्णय हवा’ या स्पष्टवक्तेपणानेच जवाब देणारी ताकद समजूनच पोलिसबळाविना कुणी हिंमत करत नाहीत, भलेभले अधिकारीही! त्यातील कुणी या साऱ्या घडामोडींना ‘तमाशा’गत पाहणारे तर अनेक संवेदनेनेच पुढे येणारे.

मात्र समर्पणाचे खरे चित्र ३४ वर्षांत गमावलेल्या सहकाऱ्यांचे. त्यातही पोलीस आणि अधिकाऱ्यांचा समन्वय. पुढे तर मंत्र्या-नेत्यांचे कारस्थान पाठीशी अशी पूर्ण युद्धनीती अनुभवलेली. म्हणूनच तर उपोषणाचे ते काय?-जीव टाकेपर्यंत लढा- हेच आव्हान, हेच पटवते एकेकाचे हौताम्य. १९९५ मध्ये घडलेल्या घटनेची पाश्र्वभूमी आजच्या नर्मदेसारखीच, पण लातूरची. तिथे भूकंप झाल्याचे कानी येता, दिवाळी तिथेच हे ठरवून निघालो सारे कार्यकत्रे. प्रवीण परदेशी त्या वेळचे संवेदनशील आणि संवादास उत्सुक म्हणून मान्यता पावलेले लातूरचे कलेक्टर. आज ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त. लातूरच्या भूकंपामागे सारे जलाशय लबालब भरलेले असल्याचे त्या वेळी त्यांनाही पटलेले.

चार-आठ दिवस किल्लारीतच जातपात भोगत काम करून परततानाच खबर आली ती धुळ्याचे कलेक्टर सर्वेक्षणाची टीम धडगाव तालुक्यातील गावांमध्ये फौजफाटय़ासह पाठवणार याची. म्हणून थकलेल्या अवस्थेतही आम्ही धुळ्याकडे वळलो. चच्रेत सिताराम कुंटेंनीही काहीच जाणवू दिले नाही. आम्ही शंका पूर्ण नाही फिटल्या तरी थोडे निश्चित होऊन, बडवानी- मध्य प्रदेश येथे जाण्याचे ठरवले. तिथेही भूसंपादनाच्या पहिल्यावहिल्या नोटिशींना लोक धास्तावलेले होते, उत्तर द्यायचे होते म्हणून. मात्र त्या एका दिवसानेही फार मोठा फरक पडला तेव्हा शहादतीचा पायाच खणला गेला. घडलेली घटना काय- रेहमल वसावेचे प्रेत घेऊन महुडाच्या झाडाखाली बसलेली आई सोनीबाई, वडील पुन्याभाऊ आणि सुरुंग, डोमखेडी, भरड, निमणगवाणचे सारे गावकरीच समोर आले. पोलिसांची मोठी कुमक, अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स, व्हिडीओग्राफर्स.. साऱ्यांसह आमच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन तातडीने पोहोचलेली. गावचे लोक दुसऱ्या बाजूने पहाड चढून येणारी फौज पाहात पहाडी किनाऱ्यावर पोहोचले, तेही बायापोरांसह. त्यात रहेमल तर एक नगण्य आदिवासी युवक. कुणीही आजवर ‘एक पत्थर क्या, शंकर के रूप में देखा जानेवाला कंकर भी नही उछला,’ ही सर्वत्र पसरलेली बातमी. महाराष्ट्र शासनही अनभिज्ञ नसताना, आमच्या मध्यस्थीची गरज नव्हतीच.. तरीही शासनाची रीत त्यांच्या त्यांच्याच कॅमेऱ्यात बंदिस्त असते तेव्हा विकृतच होते. सव्‍‌र्हे दलाने चक्क गोळीबाराच्या फैरी झाडून मार्ग खुला केला. अिहसक आदिवासींना बंदुकीने घेरल्याची उदाहरणे देशात कमी नाहीतच. छत्तीसगढच्या १६, मुलतईच्या २४, जमशेदपूरच्या १३ तर अन्यत्रसुद्धा हत्या होतच राहिल्या आहेत. मात्र अशा सच्च्या आंदोलनकारींच्या नि:स्वार्थाची सीमा पाहतो तेव्हा जाणवते ते आपापल्या कार्याचे खुजेपण- उपोषणांचेही! रहेमलची आई सोनीबाईचे शब्द, छत्तीसगढच्या शहीद युवा कामगारांच्या आई-वडिलांचेच शब्द होते- ‘‘माझा मुलगा जमिनीसाठी गेला तर मीच काय, आमचे सारे कुटुंबही त्याच्या मागोमागच जाणार!’’

मात्र तो मार्ग निसरता पहाड चढण्याइतका कठीण! तो चढता चढता जाणवले ते हेच, की अखेरी विकासाचा यज्ञ कष्टकऱ्यांच्या आहुतीनेच साजरा होतो. त्यात अत्यंत दुर्मीळ अशा कार्यकर्त्यांचाही जीव ठेवला जातो वेदीवर. शोभा वाघ ही त्यातलीच एक. नासिक जिल्ह्यतल्या बोलठाणची बालविधवा. हो, या आधुनिक काळातली बालविधवाच. सायकल रिपेअिरगच्या दुकानावर जाणाऱ्या बापाची नि कष्टकरी हाडकुळ्या आईची ही मुलगी. शरीराने नाजूक, स्वभावाने शांत, परंतु मनाने कणखर. जीवनशाळांतील मुलांमध्येच नव्हे तर कार्यकर्त्यां युवकांमध्येही जीव ओतणारी. १४ दिवस आमच्यासह धुळे जेलमध्येही शाळांचे मॅन्युअल, संघर्षांवर शिबीर, महिला बंदींसह नाटय़.. अनेकानेक कार्यात सहभाग- न थकता.

शोभा एक दिवस डोमखेडीच्या पाडय़ावर बठक घेण्यासाठी आदिवासींना गोळा व्हायला सांगून आमच्या नेहमीच्याच जागी स्नानासाठी गेली काय नि गाळात धसली काय.. दोन तासानंतर शोधाशोध झाली तर सापडले ते फक्त तिचे कपडे!

शोभापेक्षा फार भिन्न, उच्चविद्याविभूषित म्हणावा असा पत्रकार मित्रही गेला. संजय संगवईने पुण्यातल्या एका मुलाखती दरम्यान नर्मदेशी जोडून घेतले, ते कायमचेच. ज्याची फुफ्फुसेच नव्हे, तर हृदयही खचलेले होते. पण त्याची ताकद कधी खचली नाही. त्याने अनेकानेक लेख, पुस्तके सारा विचारभांडार उभा केला नर्मदेवर! आजही ते आमचे धन आहेच. तो होता तेव्हा देशात मी कुठेही असो, संघर्षांत वा निर्माण कार्यात तिथली स्थिती, राजकारण, फोनवर कळवताच, व्यापक वैचारिक चौकटीसह त्याची प्रस्तुती होणे हे संजय संगवईच जाणे! अखेरीस योगा, आयुर्वेद साऱ्यांसह पर्यायी जीवनप्रणालीबद्दल केवळ लिहिणाराच नाही, तर ती जगणारा संजय निघून गेला- शांतपणे.. संजयची आईही भावुक, आध्यात्मिक आंदोलनाच्या कुटुंबातील जिव्हाळ्याची दोस्त- विजयाताई, एक सहज कवयित्रीही त्याच्या मागोमाग गेल्या.. अनेक आदिवासी मुलांचे मृत्यू सर्पदंशाने- कालपरवापर्यंत थांबण्याचे नाव नाही.

या साऱ्या हौतात्म्याला काय म्हणावे? या साऱ्याचा उल्लेखही विकासाच्या ढोलबाजीमध्ये ऐकू येत नाही. या एकेका विनाशकारी कार्यासंबंधी कुठे दाखल करावा एफआयआर  हेही सामान्यांना कळत नाही. नर्मदेच्या खोऱ्याचीच नव्हे तर प्रत्येक विकास नावाने ढकललेल्या योजनेत सामाजिक परिणामांचे अध्ययन कधी महत्त्वाचे मानले गेले नाही. आज इथे उपोषणावर बसलेल्या घाटीतल्या स्त्रियांचे तत्काळचे मागणे भले पुनर्वसनाच्या एकेका लाभाचे असो, प्रत्येकीच्या मनात घाटीच्या हत्येच्या पूर्ण चित्राची झलक उतरलेली आहे. निमाडच्या महिलांनी आपले अधिकार टिकवून धरले आहेत, ते त्यांच्या नर्मदेवरच्या भक्तीनेच नव्हे तर जीवनावरील श्रद्धेनेही! ही श्रद्धाच अिहसक शक्तीचे सारे प्रकटीकरण गेली ३४ वष्रे आंदोलनामध्ये करत आली आणि आजही तीच लागली आहे पणाला.

राजकीय तत्त्वज्ञान सोडा, विकासावरचा विवादही विसरा, जिवंत गावांना जलसमाधी देण्याइतकी अमानवीय वृत्ती सोडा.. एवढेच ताकदीचे मागणे घेऊन आज नर्मदाकिनारी चाललेला संघर्ष हा दुरून दिसतो तसा नसतो. अत्यंत भावनांचा कल्लोळ उठला असताना अशा प्रत्येक संघर्षांची खबर दुनियेस होवो, अथवा न होवो- एक विश्वच निर्माण होते युद्धस्थळी. साऱ्या युवा, महिला, वृद्धांनाही खेचून आणणारा संघर्ष- तरीही शासनकर्त्यांना अनेक दिवस सुस्तच ठेवतो. अंतर्गत अनेक प्रक्रिया या संघटनेच्या व्यक्तिगत बाबी राहत नाहीत. शासनाचे नुमाइंदेही आजकाल गावकऱ्यांच्याच वेश धारण करून सत्याग्रहींच्या मध्ये घुसवण्याचे तंत्र असो, की ‘अंतिमत: पोलिसी बळाने निपटू’, हा सत्ताधाऱ्यांचा विश्वास असो; यामुळेच स्वीकारावा लागतो, नि:शस्त्र जीवाभावाचा संघर्ष. शासनाच्या असंवेदनवृत्तीपुढे आपली वेदना व्यक्त करणारी मजूर कुटुंबातली पेगलबाई असो की थोडीशी शेती घेऊनही लढा देणारी रामूबाई असो; आजही नर्मदेची भजनं ते संघर्ष गीत- असा दर संघर्षांतला माहौल उभा करणारा इथला तामझाम जवळून पाहणाऱ्यांनाही सहज नाही उमजत थोपलेला विनाश नाकारणाऱ्यांच्या भाव – विभोर तानाबाना :

जळाशीच नाते जिवाचे जडले।

जळाच्याच काठी तडपले।

जळाचे म्हणावे काय खरे खोटे।

जीवाशीच खेळ, मन विफराटे।

जळी उतरता आभाळीचे तारे

जळ आभाळचि भुईला भोगते।

जळाच्या तळाशी ठविले मी आहे।

दूर लोटियचे जगाचे किनारे।

जीवाचे म्हणता जळाचेच झाले।

जगणे, मरणे डोळा रे बुडाले।

medha.narmada@gmail.com