News Flash

मोकळे आकाश… : बटर आणि सुरी

शाळा सुरू झाली की त्याच्या कल्पनाविश्वाला धुमारे फुटतात.

|| डॉ. संजय ओक

‘मुँह में राम, बगल में छुरी’ हा वाक्प्रचार ऐकत आपण शाळेतून कॉलेजात येतो. माणसाच्या पाचवीला काही षड्रिपूही पुजले जाण्याचा शाप फसवणुकीचं बीज रोवण्यात यशस्वी होतो.  फसवणूक दुसऱ्याची, आई-वडिलांची, सग्यासोयऱ्यांची आणि पर्यायाने स्वत:ची! ‘आप बहुत अच्छे लग रहे हो!’ या ऑफिसमधल्या शेऱ्यामागे ‘आप के पीछे कुछ लगाना पडेगा…’ हा र्गिभतार्थ दडलेला आहे हे लक्षात यायला थोडीफार सीनिऑरिटी यावीच लागते. काय गंमत आहे बघा- spoken word आणि meant word यांतला हा फरक म्हणजे Reading in between the lines. लहान मूल आधी अक्षरओळख शिकते… मग शब्द… मग वाक्य. सुरुवातीला आपला प्रत्येक शब्द फक्त Repeat मारणारा आपला नातू हळूच स्वत:ची वाक्ये बोलू लागतो आणि अनेकदा मनात असलेल्या विचाराच्या आणि हाताने करत असलेल्या कृतीच्या बरोबर उलटे तोंडाने बोलतो तेव्हाच उक्ती, आसक्ती, कृती आणि पर्यायाने विकृतीची त्याच्याशी नव्याने ओळख होते. घरातील वडीलधारी माणसं त्याचा खोट्याशी परिचय करून देतात. आणि हे काहीतरी वेगळं आहे, हे समजण्याइतकी उपजत बुद्धी त्याला असतेच असते.

शाळा सुरू झाली की त्याच्या कल्पनाविश्वाला धुमारे फुटतात. प्रगतिपुस्तकावर आर्ई किंवा वडिलांची आद्याक्षरे गिरवण्यापासून उसने पालर्क किंवा पालकची जुडी आणण्यापर्यंतचे प्रसंग घडतात. आणि हे खोटं केवळ दामटूनच नेता येत नाही, तर त्याच्यापासून अनेकदा फायदाही होतो याचा अनुभव त्याला येऊ लागतो. फसवणूक ही अशी आतून सुरू होते, स्वीकारली जाते आणि मग तिचा सर्रास वापर होऊ लागतो. ‘शेजारचे काका असले तर सांग- बाबा घरात नाहीत म्हणून…’ असे सांगणारे बाबा आणि काही रुपये वाचविण्यासाठी अर्ध्या तिकिटाचा दुराग्रह धरणारी आई नेमका कोणता संस्कार मुलावर करते आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

कॉलेजचे विश्व बहुतांशी बेगडी असते. तिथे आजकाल फसवणुकीला फसवणूक समजत नाहीत. Chill  yaar!’ म्हणणारी ही संस्कृती शब्द फिरविणे, शब्द आणि कृती यांतील फरकाला Order of the day समजणे यावरच पोसली जाते. आजकाल जेव्हा commitments  तकलादू आणि काही दिवसांचे self life घेऊन येतात, तेव्हा फसवणूक ही नित्यनेमाचा व्यवहार होऊ लागते.

या अंधारलेल्या पार्श्वभूमीवर काल व्हॉट्स-अ‍ॅपवर कोणीतरी लिहिले“Beware… the hand that buttered your bread… holds a knife.” कार्यालयात तुम्ही जसजसे वरच्या पदावर जाता, तसतसे तुम्ही एकाकी होऊ लागता.  खुशमस्करे अनेक जमतात. काही हक्काने भाऊ-बहिणीचं नातंही जोडतात. पण हे सारे ‘खुर्चीचे भाऊ-बहीण’!  खुर्ची तुमच्याखालून कधी जाईल, किंवा खरं तर कशी जाईल याचा विचार करणारे. हा फरक कळायला अधिकाऱ्याला लोणच्यासारखे मुरावे लागते. स्तुती कोणाला नको असते? ‘मृदुंगोडपि मुखलेपेन करोति मधुरं ध्वनिम्’ या नियमानुसार आपणही स्तुतीने हुरळून जातो आणि फसवणूक नेमकी येथेच होते. ‘ब्रूटस् यू टू?’ म्हणत कोसळणाऱ्या सीझरला मी कधी विसरू शकत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आजचा व्हॉट्स-अ‍ॅपचा निरोप खूप काही सांगता झाला. लोणी लागतेय म्हणून अदृश्य कट्यारीकडे काणाडोळा करू नये, हेच त्रिवार सत्य आहे. मुद्दा असा आहे की, ही अदृश्य कट्यार पाहायची कशी? या गोष्टी कुठल्या मॅनेजमेंटच्या, एमबीएच्या कोर्समध्ये शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी तुम्हाला खुर्ची  शिकवते. तुमचा जॉब तुम्हाला याच ऑनलाइनच्या जमान्यात ऑनसाइड ट्रेनिंग देतो.

पहिला धडा म्हणजे खुर्ची तुम्हाला चिकटता कामा नये. ‘इदं न मम्’ या भरताच्या भावनेतून राज्य चालवले की तुम्ही वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाता. तुमचे अस्तित्व खुर्चीत बंदिस्त होऊ शकत नाही. आणि मग गारद्यांचे वार बोथट होऊ लागतार्त. निंदानालस्ती आणि टीका ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यकुशलतेचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही सदासर्वदा सगळ्यांना समाधान देऊच शकत नाही. मग अतृप्त आत्म्यांची भुतावळ जन्माला येते. ती तोंडाने गुणगान करते, पण निनावी टीकेची झोड उठवणारी पत्रे लिहिते. आणि लेखणी उचलणारे हे स्तुतिभाटच पुढे कट्यार उचलते होतात.

याची खंत बाळगायचे कारण नाही. हा केवळ तुमच्याच बाबतीत होणारा प्रकार नाही, तर हे एक पौराणिक, वैश्विक, सार्वकालीन सत्य आहे.  खरेपणा हा दुधासारखा नितळ, निरसा, शुभ्र असतो आणि घुसळण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारे लोणीही शेवटी सत्याचाच फारकतलेला अंश असतो. आपण एक करायचे… ना दुधाने हुरळून जायचे, ना तापलेल्या  लोण्याने होरपळायचे. फक्त लक्षात ठेवायचे… hand that butters usually holds a knife!

sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:03 am

Web Title: spoken word world of college whatsapp call akp 94
Next Stories
1 अंतर्नाद : राम निरंजन न्यारा रे
2 पडसाद : आता ‘निकम्मे’ कोण?
3 सत्यजित राय यांचे बालकलाकार
Just Now!
X