डॉ. कमल राजे
साहित्य संमेलनांचा तोचतोपणा टाळून, त्यापेक्षा कितीतरी निराळा ग्रंथव्यवहाराइतकेच लोकांच्या कुतूहलाला महत्त्व देणारा आणि साहित्याइतकेच संस्कृतीचेही भान ठेवणारा ‘लिटफेस्ट’ हा प्रकार सध्या रुळतो आहे. ‘लिटफेस्ट’ जगात कुठे पहिल्यांदा स्थिरावले आणि भारतातही जागोजागी कसे पसरत आहेत याच्या आढाव्यासह, ‘लिटफेस्ट’चे लोकांशी नाते का, याचाही हा वेध… त्याचबरोबर पारंपरिक संमेलने आणि ‘लिटफेस्ट’ यांची तुलना करणारे टिपण…
गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत ‘लिटफेस्ट’च्या नकाशावर कुठेच नसलेला भारत करोनानंतरच्या काळात जगातला सर्वाधिक लिटफेस्ट घडविणारा देश बनलाय. जयपूर, केरळ लिटफेस्टसह अनेक राज्यांचे शेकडो साहित्य-कला जलसे गेल्या दोन-चार वर्षांत नोंदले गेले, त्यात यावर्षी आणखी भर पडणार आहे. संपूूर्ण हिंदीभाषक पट्ट्यापासून दक्षिण भारतातील राज्ये साहित्याचा यांसारखाच उत्सव घडवत असून लिटफेस्ट येत्या दशकभरात ग्रंथासह इतर अभिजात कलांचा तारक ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
संमेलने आणि तुरळक पुस्तक महोत्सव-गप्पांची आपल्याला सवय. मात्र कथा, काव्य, नाट्य, शिल्प, लोककला-चित्रकला या सर्व कलांना कवेत घेत यंदा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ मराठी संस्कृतीच्या बहुआयामी सौंदर्याची खूण ठळक करेल. सजग माध्यमसमूह म्हणून अशा प्रकारचा पुुढाकार मराठीत पहिल्यांदाच घेतला गेला असून ग्रंथ, साहित्याच्या चर्चेसह विविध कलांचा आविष्कार मुंबईत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विविध ठिकाणी अनुभवता येईल.
इतिहास आणि वर्तमान…
जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात १९४९ पासून भरवला जाणारा पुस्तक महोत्सव हा गेल्या शतकातला आद्या लिटफेस्ट मानला जातो. यंदाचा फ्रँकफर्ट बुक फेअर’ रविवारी (१९ ऑक्टोबर) संपेल तेव्हा या महोत्सवाला गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) भेट देणाऱ्या दोन लाख ३० हजार पुस्तकप्रेमी/ पुस्तककर्मींपेक्षा यंदाची संख्या किती जास्त होती हेही कळेल. ब्रिटनचाच भाग असलेल्या वेल्समध्ये १९८८ सालानंतर हळूहळू जगाच्या पटलावर ओळखला जाऊ लागला, तो तिथे दरवर्षी मे-जून महिन्यात गवताळ मैदानात भरणाऱ्या ‘हे ऑन वे’ या लेखक-वाचकांच्या मेळ्यामुळे. मेळाव्यात ठिकठिकाणचे पुस्तकवेडे एकत्र येत. तिथल्या संपूर्ण शहरभर पसरलेल्या दुकानांच्या साखळ्यांमधून जुनी-नवी पुस्तके खरेदी करीत आणि नव्या ओळखी करीत गप्पा छाटत.
पुढे या सोहळ्यात नियोजन आले. पुस्तक गप्पांबरोबर इतर कलांचा समावेश झाला. दोन हजार सालाच्या दशकात ‘गार्डियन’, ‘टाइम्स’, ‘टेलिग्राफ’सारख्या वेगवेगळ्या माध्यम समूहांनी या महोत्सवाला बळ दिले. जर्मनीतले फ्रँकफर्ट पुढे पुस्तकप्रेमींच्या खरेदीसाठीच नाही तर, तर प्रकाशक-लेखकांच्या भेटीचेदेखील केंद्र बनले. पण २००६ साली केवळ १८ लेखक आणि १००च्या आत प्रेक्षकसंख्या असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने काही वर्षांतच तोपावेतोच्या साऱ्या लिटफेस्टला झाकोळून टाकले.
जगभरातील साहित्य वर्तुळाला आकर्षून घेतले. या वर्षी सुरुवातीला झालेल्या या महोत्सवात तीन लाखांहून अधिक दर्दींची उपस्थिती होती. पाचशेहून अधिक साहित्यिक-कलावंत आणि सादरकर्ते त्यांत जमले. २०१६ पासून समुद्रकिनाऱ्यावर भरणाऱ्या केरळ लिटरेचर फेस्टिव्हलने यावर्षी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला आकाराने आणि कार्यक्रमांनी मागे टाकत पाच लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती आणि मल्याळम-इंग्रजी पुस्तकांची कोट्यवधींची विक्री दाखवून दिली. (या राज्यात किमान अर्धा डझन लिटफेस्ट भरतात.) पण या सगळ्याच भव्य-दिव्यतेला पुणे बुक फेस्टिव्हलने लांब टाकले. आठ दिवसांत फर्गसनमध्ये भरलेल्या ग्रंथसोहळ्याला दहा लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. चाळीस कोटी रुपयांची मराठी, इंग्रजी, हिंदी पुस्तके या मांडवात विकली गेली.
तुलनेने अखिल भारतीय संमेलनाच्या नावाने होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे विद्यामान स्वरूप किती केविलवाणे असते, हे दाखवून देणारा हा सोहळा होता. त्याचबरोबर जमवले, तर अशा प्रकारच्या लिटफेस्ट स्वरूपाच्या जत्रेत मराठी समुदायाची ग्रंथखरेदी क्षमता किती असू शकते, हेही उमजून आले होते.
लोकप्रियतेचे कारण?
भारतात जयपूर लिटफेस्टच्या आगमनाआधी कोलकाता शहरातील वार्षिक पुस्तक महोत्सव (बोईमेला) हा सर्वात मोठा मानला जात होता. आजही तो भरतो आणि घरटी पुस्तक खरेदीची झुंबड तेथे असते. पण करोनाच्या कालावधीत अडीच वर्षे घरी कोंडलेल्या लोकांना त्या पुढल्या काळात पर्यटनसोस लागला. तसा दोन वर्षे थांबलेला सांस्कृतिक माहोल ‘कल्चरल फेस्टिव्हल्स’ गाजवणारा ठरला. त्यात २०२२-२३ पासून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला झालेली गर्दी, त्यांचे अनुकरण करून दक्षिणेतील काही राज्यांत झालेल्या लिटफेस्टलाही मिळणारा उदंड प्रतिसाद डोळ्यांत भरणारा होता.
उत्तरेकडील पाच ते सात राज्यांमध्ये हिंदी साहित्य व्यवहार जोमात चालतो. त्या बळावर हंस-कथादेश- तद्भव यांसारखी मासिके लाखांच्या खपात विकली जातात. गीतांजली श्री यांना इंटरनॅशनल बुकर मिळण्याआधी या संपूर्ण प्रदेशात हिंदी लिटफेस्ट होण्याचे प्रकार झाले नव्हते. आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही लिटफेस्टची आखणी होते. त्याचबरोबर साहित्य, राज्यातील संगीत, नाटक, लोककला यांना एकत्र व्यासपीठावर आणून लिटफेस्टचा पैस विस्तारतो.
बिहारच्या पटणा या शहरात तीन आठवड्यांपूर्वी साहित्य अकादमी आणि राज्याच्या सांस्कृतिक विभागाने ‘उन्मेष’ हा लिटफेस्ट घडवून आणला. महोत्सवाच्या या तिसऱ्या वर्षाचे आकर्षण म्हणजे सोळा देशांतील साडेपाचशेहून अधिक साहित्यिक-कलावंत सहभागी होते. जपानी लेखकांच्या ताफ्यापासून अनेक आंग्ल लेखकांची यात उपस्थिती होती. मराठी लेखकही यात होते. तीन वर्षांपूर्वी साहित्य महोत्सवांच्या कक्षेतही नसलेला हा ‘उन्मेष’ लिटफेस्ट हळूहळू आशियातल्या महत्त्वाच्या साहित्यिक जलशांमध्ये परावर्तित होतो आहे. याचे स्वरूपदेखील लेखक-वाचक भेट, गप्पा, नव्या पुस्तकाच्या अनुषंगाने विविध चर्चासत्रे, संध्याकाळी संगीत-काव्य-नाटक यांचा अंतर्भाव असे असते.
बनारसमध्ये गंगाकिनारी हिंदी लेखक-साहित्यिक आणि प्रकाशकांनी लिटफेस्ट घडवला. या आठवड्यात हिमाचल प्रदेशमध्ये लिटफेस्ट सुरू होतो आहे. स्वतंत्ररीत्या गेली १४ वर्षे तिथे ‘खुशवंतसिंग लिटरेचर फेस्टिव्हल’देखील होतो. ज्यातील मुलाखती राष्ट्रीय बातमीपत्रांचा विषय होतात. पुढल्या महिन्याच्या मध्यावर डेहराडून येथे गाजावाजा करीत लिटफेस्ट भरवला जाणार आहे. जी राज्ये लिटफेस्टसाठी यापूर्वी बिलकूल परिचित नव्हती, त्यांची सांस्कृतिक ओळख हे महोत्सव तयार करून देत आहेत.
लोकांना बदल हवाय…
ओटीटी फलाट, रील्स, माध्यमांचे भाषिक दळण-वळण यांच्यामध्ये लोकांची अभिरुची गेल्या दशकभरात बदलत चालली आहे. सिंगलस्क्रीन थिएटरमधून मल्टिप्लेक्समध्ये खरेदीसह मनोरंजन हा आता केवळ शहरी मध्यमवर्गाचा जगण्याचा भाग झालेला नाही, तर निमशहरांचे जगणेदेखील अत्याधुनिक होत चालले आहे. पुस्तक वाचनाचा, बेस्टसेलर पुस्तकांचा प्रसार आणि प्रचार रेल्वेस्थानकांवरील पूर्वी असणाऱ्या व्हीलर बुकस्टॉल्सपेक्षाही वेगात स्थानकांनजीक पायरसीने फोफावलेली रस्तापुस्तक दालने करीत आहेत. या सगळ्यात पारंपरिक आणि रूक्ष पद्धतीने चालणाऱ्या ग्रंथव्यवहारात ऑनलाइन पुस्तकखरेदी-विक्रीच्याही संस्था तयार झाल्यात. त्यांची उलाढाल डोळ्यात भरू शकते इतकी व्यापक आहे. असे असताना पारंपरिक पुस्तकगप्पा आणि संमेलनांचे रूक्ष स्वरूप टाळून ‘लिटफेस्ट’ ही संकल्पना आकर्षणाच्या अनेक गोष्टी सादर करते.
नॅशनल बुक ट्रस्टच्या पुण्यातील ‘बुक फेस्टिव्हल’ने दोन वर्षे महाराष्ट्रातील वाचकांची परमोच्च गर्दी आपल्या व्यासपीठावर करून दाखवली. आपल्या भाषिक पुस्तकांसह नव्या इंग्रजी -हिंदी ग्रंथांची खरेदी तिकडे मराठी वाचकच उत्साहाने करत होते. शेजारीच असलेल्या तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत, खाद्या महोत्सवांत डोकावूनच घरी परतत होते. ना राजकीय नेत्यांची, वक्त्यांची लुडबड, ना त्यांच्या आगे-मागे फिरणाऱ्या हौशा-गवशांचा हस्तक्षेप, ना व्यासपीठावर प्राध्यापक कवींचे कंटाळवाणे सवतेसुभे. ना रटाळवाणी कवी संमेलने.
लेखकांना भेट, त्यांच्या पुस्तकांना भेट, त्यांचे कार्यक्रम ऐकून त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह पुस्तकांची प्रत, जमलेच तर लेखकासमवेत पुस्तकासह सेल्फीक्षण मोबाइलच्या कॅमेरात कैद करण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा, वाचनातील आवडलेले सांगण्याचा प्रकार पूर्वी कितीतरी मर्यादित प्रमाणात होता. तो या लिटफेस्टने सहज घडवून आणला. लेखकाचा जनसंपर्क वाढत चालला, तितकाच जनांचा लेखकसहवास सहज होत चालला आहे. या लिटफेस्टचा आणखी एक विशेष म्हणजे तरुणाईचा त्यातला सळसळता वावर. जी पिढी वाचण्याऐवजी मोबाइलमध्ये बुडालेली असते, असा दावा केला जातो, त्या पिढीतील वाचक प्रतिनिधी येथे पाहायला आणि लेखक-कलावंतांशी चर्चा करताना दिसतात.
योग्य नियोजन, ग्रंथव्यवहार आणि त्यांच्याशी निगडित कार्यक्रम आखणी, नाटक-काव्य-संगीत आणि पुस्तकपूरक वैचारिक व्यासपीठांचा अंतर्भाव यांमुळे पुढल्या काळात पूर्वीची संमेलने-चर्चासत्रे यांचे रूक्ष स्वरूप लवकरच बाद होईल. ‘लिटफेस्ट’ हा सर्व प्रकारच्या कलांसाठी तारक ठरून त्यांची जागा घेईल. भवतालाचे वातावरण तरी तेच सांगते.
उत्तर आणि दक्षिण…
इंदूर लिटरेचर फेस्टिव्हल किंवा ‘इंदौर साहित्य महोत्सव’ गेली ११ वर्षे भरवला जातोय. यंदा १४ ते १६ नोव्हेंबर तो हिंदीतील मान्यवर लेखकांच्या साक्षीने घडेल. मध्य भारतातील हा सर्वात मोठा साहित्यिक उत्सव म्हणून ओळखला जातो. यंदा इंदूरमध्ये डिसेंबर महिन्यात लिट चौक फेस्टिवल असा आणखी एक उत्सवदेखील होईल. याशिवाय जानेवारीत बनारस साहित्य उत्सव होईल. दिल्लीत ताज लिस्ट फेस्टिव्हलदेखील गाजतो. मुंबई लिटफेस्ट ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होईल. केरळ लिटरेचर फेस्टिव्हल २२ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. जयपूर महोत्सवानंतर देखील देशात उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत लिटफेस्टची संख्या भरपूर आहे.
जयपूर लिटफेस्ट…
यंदा एकोणिसाव्या वर्षी विविध ३५० लेखककलावंतांना सहभागी करून १५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत जयपूर लिट फेस्ट भरेल. गेल्याच आठवड्यात त्यांच्या नियोजित लेखकांची यादी जाहीर झाली असून लेखकपुस्तक आणि चर्चासत्रांचे विषय कथाकादंबरी इतिहासकला विज्ञानगणित, औषधशास्त्र, मानसिक आरोग्य, पर्यावरणीय बदलांना सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना व्यवसाय भौगोलिक राजकारण आणि संघर्षअनुवादसिनेमा वंशवाद असे विविधांगी आहेत. बानू मुश्ताक, भावना सोमय्या, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, अनुराधा रॉय, अभिनेत्री केट मॉस, जॉन ली अॅण्डरसन, मनू जोसेफ आदी तारांकित व्यक्ती या महोत्सवाचे आकर्षण आहेत. गेल्या दोन वर्षांतील विक्रमी गर्दीचा आकडा या वर्षी मोडला जाण्याची चिन्हे आहेत.
पुणे बुक फेस्टिव्हल…
पुण्यात २०१३ पासून ‘पुणे लिटफेस्ट’ आयोजित केला जातो. तो स्वतंत्रपणे यंदाही असेल. पण दोन वर्षांपासून एनबीटीच्या या शहरातील महोत्सवालादेखील लिटफेस्टचाच दर्जा प्राप्त झालाय. पुस्तक विक्रीचा देशातील विक्रम महाराष्ट्रात होऊ शकतो, तितकी ग्रंथखरेदीची वाचकक्षमता राज्यात आहे, हे या महोत्सवाने दुसऱ्या वर्षीच दाखवून दिले. तिसऱ्या वर्षी ‘जॉॅय ऑफ रीडिंग’ ही संकल्पना घेऊन हा महोत्सव सादर होईल.
यंदा या महोत्सवात, पत्रकारिता आणि छायाचित्र पत्रकारिता पुरस्कार दिले जाणार आहेत. पुण्यासाठी विशेष फिरत्या बसद्वारे वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्याचा उद्देश आयोजकांनी ठेवला आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांचे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेखकवाचक संवाद यांच्यात यंदा आणखी भर असेल. त्यामुळे फर्गसन कॉलेजच्या भव्य पटांगणात होणाऱ्या या महोत्सवाकडे लक्ष लागले आहे. अशाच प्रकारचा महोत्सव नागपूर आणि इतर काही शहरांतदेखील अपेक्षित आहे.
डेहराडून लिटफेस्ट…
भारत वगळता जगासाठी असलेल्या ट्रॅव्हल गाइड्समध्येदेखील आता लिटफेस्टचा समावेश होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर होत असलेले डेहराडून लिटफेस्ट हे ताजे उदाहरण. २०१७ पासून हा महोत्सव होतोय. गेल्या दोन वर्षांत या महोत्सवाची व्याप्ती वाढलीय. माजी सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड, रुजुता दिवेकर, उषा उथप, नंदिता दास, नारायणी बसू यांच्यासह लेखक, कलावंत यांचा प्रचंड मोठा ताफा यंदा डेहराडून लिटफेस्टमध्ये दिसणार आहे. या महोत्सवात ‘रस्किन बॉण्ड लिटररी अॅवार्ड’सह काही नवी साहित्यिक पारितोषेकेदेखील देण्यात येणार आहेत.
डॉ. कमल राजे | lokrang@expressindia.com