लेख खूप आवडले. लेखकाचे इराण-इस्रायल युद्ध आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीवरील लेख अत्यंत माहितीपूर्ण व उद्बोधक असतात. वरील लेखात पश्चिम आशियातील परिस्थितीची पूर्वपीठिका देऊन इस्रायल व अमेरिका यांचा कांगावा उघड केला आहे. सुजाण आणि समंजस नागरिकांच्या मनातील खळबळ आणि उद्विग्नता अत्यंत समर्पक शब्दात व्यक्त झाली आहे. मनोहर पर्रिकर यांच्यावरील ‘ते मौन मनोहर असेल’ हा लेखही रोखठोक आणि वैशिष्ट्यपूर्ण. – आल्हाद धनेश्वर.

शांतीचा मंत्र जपणे योग्यच

इराणचा अणुऊर्जा हक्क मान्य आहे, पण इराण-इस्रायल दोघेही सध्या तरी मित्र आहेत. आपण कोणा एकाची बाजू घेऊ शकत नाही. इस्रायल अण्वस्त्र असलेला देश आहे, मग इराण का नसावा हेही खरे आहे- तेही इराणने सर्व अटी मान्य केल्या असताना. मात्र इराण हमास, हैती यांसारख्या दहशतवादी संघटनांना इस्रायलच्या विरुद्ध का मदत करतो? एके काळी इस्रायल आणि इराण यांच्यात घनिष्ठ मैत्रीसंबंध होते. नंतरच्या काळात उलथापालथ झाल्यावर त्यांच्यात कट्टर शत्रुत्व आले. या सर्व घडामोडींनंतर इस्रायल बिथरला. कारण इराणने उघडपणे मत व्यक्त केले की, इस्रायलचे अस्तित्वच नको. हे म्हणजे युक्रेनने नाटोला रशियाच्या दारातच आमंत्रण दिले आणि युद्ध ओढवले असे झाले. अमेरिका आणि पाश्चात्त्य देश युक्रेनला युद्धासाठी उकसवतात, आपले उखळ पांढरे करतात, शस्त्रपुरवठा करतात. युद्धात त्यांच्या शस्त्रांचीही कसोटी लागते. भारताची भूमिका उघडपणे कोणाचीही बाजू न घेता शांतीचा मंत्र जपणे हे बरोबरच आहे. मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचा लेखही माहितीपूर्ण होता. – विनय रेगे, माहीम, मुंबई.

संक्रमण अवस्थेतच बरे होतो का?

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक देश म्हणून आपली एक भूमिका मांडण्यात कमकुवत ठरत आहोत, हेच यातून दिसून येते. कधी कधी वाटते, आपण नव्वदच्या दशकातील संक्रमण अवस्थेतील भारतातच मस्त असतो… खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेखन.. – नीलेश रामभाऊ मोरे, वाशीम.

अर्थकारणाशी सांगड

लेखकाने या लेखात अत्यंत चपखल शब्दप्रयोग करत थोडक्यात सर्व इतिहासच मांडला आहे. इराणला एकटे पाडण्यासाठीच ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सौदी अरेबियाचा दौरा केला होता. अर्थकारण हेच या सर्व राजकीय घडामोडींमागील प्रमुख कारण दिसत आहे. गमतीचा भाग म्हणजे रशिया, चीन आणि युरोपीय देश यात कुठेच दिसत नाहीत. इराणचा इराक होणार आणि पुन्हा मध्य पूर्वेत दहशतवाद आणि बेबंदशाही सुरू राहणार. खनिज तेलाला समर्थ पर्याय मिळाला की अरब लोक पुन्हा उंटावर बसून फिरणार. हा लेख केवळ माहितीपूर्णच नाही तर विचार करायला लावणारा आहे. – संजय मोहिते.

ऐतिहासिक बारकावे समजले

इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरील हा अभ्यासू लेख आहे. या लेखातून ऐतिहासिक बारकावे समजून घेता आले. सर्वच राष्ट्रांशी संबंध चांगले राहावेत या उद्देशातून घेतलेल्या भूमिका नैतिकतेच्या आधारावर नक्कीच मान्य करता येण्यासारख्या नाहीत. जगभर सुरू असणारी युद्धे व त्यातून होणारे नैतिक अध:पतन सर्वच थरांवर विचार करायला लावणारे आहे. एकाधिकारशाही या एकाच भोवती फिरणारी युद्धे भविष्यात पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरतील अशी भीती वाटते. – अमोल चरणकर, कोल्हापूर.

बोटचेप्या धोरणाचा स्पष्ट उल्लेख

या लेखात युरोप, अमेरिका, इराण व त्यांचे व्यापार, तेल उद्याोग व राजकारण याविषयी लिहिताना अर्ध्या-पाऊण शतकात घडून गेलेल्या किती तरी घटनांचा ऐतिहासिक संदर्भ देऊन आपल्या देशाच्या बोटचेप्या धोरणाविषयी स्पष्टपणे लिहिले आहे हे खूप महत्त्वाचे!

‘ते मौन मनोहर असेल’ हा मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचा लेख वाचून आपल्या खरेपणाचा प्रत्यय आला. पर्रिकर यांचा व माझा थोडाफार परिचय होता. त्या वेळी लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मलाही त्यांच्या स्वभावाचा काहीसा अनुभव आला होता. मी मडगावातील चौगुले कॉलेजचा प्राचार्य असताना त्यांनी बोलाविलेल्या काही सभांमधूनही त्यांचा असा स्वभाव जाणवत होता. अर्थात चौगुले कॉलेजच्या व्यवस्थापनात अशोक चौगुले असल्यामुळे कदाचित आमचे फारसे वाद झाले नाहीत, पण काही वेळा मतभेद जरूर झाले. मुद्दाम सांगण्याची गोष्ट अशी की, असे मतभेद ते कधीच विसरत नसत. – विनायक शिरगुरकर.

भावणारी स्नेहचित्रे

मनोहर पर्रिकर यांच्यावरील लेख खूप आवडला. लेखकाच्या संपर्कात आणि सहवासात आलेल्या वैचारिक, व्यावसायिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची चितारलेली ही स्नेहचित्रे फारच भावणारी असतात! मोजक्या शब्दांत कारकीर्दीचं केलेलं मोजमाप, बारीकमोठी वेचक (आणि खोचकही) स्वभावनिरीक्षणं सुंदर उतरतात. एक श्रीमंती लिखाण वाचण्याचा आणि त्यातून ती व्यक्ती उलगडण्याचा, समजण्याचा अनुभव वाचक म्हणून आम्हाला असाच मिळत राहो. – श्रीकांत कुलकर्णी.

आपली वेगळी भूमिका हवी

सध्याच्या परिस्थितीत इराणबाबत भारताने घेतलेली भूमिका यावर लेखकाने जे भाष्य केले आहे त्याबाबत मी सहमत आहे. गाझामध्ये हजारो मुले आणि बायकांची निर्दयपणे हत्या केली जात आहे. त्यावर आपले सर्वोच्च नेते गप्प आहेत. अमेरिकेला शंभर अण्वस्त्रं बाळगण्याचा हक्क आहे, दहशतवाद पोसणारा पाकिस्तान अण्वस्त्रं बाळगू शकतो, पण इराणला ती परवानगी नाही. प्रत्येकासाठी वेगळा कायदा का? भारतीयांना जसे वाटते तशीच भारतानेही जिथे अन्याय होत असेल तिथे बोलले पाहिजे. आपण अमेरिकन लोकांसारखे फक्त फायद्यासाठी ओरडणारे नाही. रशिया हा आपला मित्रदेश असतानाही तो चुकत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. जगाला युद्धापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. सर्व जगालाच युद्धापासून परावृत्त केले पाहिजे. खरं तर पाकिस्तानवर हल्ला करण्याऐवजी आपण आपली सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करायला हवी. कारण पाकिस्तानवर हल्ला करूनही त्यातून काहीच साध्य झाले नाही. ते दहशतवादी अजूनही आपल्याला सापडलेले नाहीत. इस्रायल आणि अमेरिका ही दुष्ट राष्ट्रे आहेत. शस्त्रास्त्रांच्या विक्रीचा फायदा घेत देशांना एकमेकांविरोधात लढायला उद्याुक्त करीत आहेत. – डॉ. अभिजित बगाडे, पुणे.

इथेच आपल्या धोरणांचा कस

इराण-इस्रायल मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत हे समजत नाही. अमेरिकन प्रशासन नेहमीच स्वत:चे आणि त्यांच्या लॉबी गटांचे हितसंबंध जपण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे संधिसाधू भूमिका घेते. अमेरिका जगात कुठेही लोकशाही रुजवू शकली नाही. त्यांनी मुक्त बाजार भांडवलशाही स्थापित केलेली नाही. ज्याच्याशी त्यांचे हितसंबंध आहेत त्यांचीच ते नेहमी बाजू घेतात. अध्यक्ष ट्रम्प पूर्णपणे उघडे पडले आहेत. आपण अन्य राष्ट्रांशी असलेले हितसंबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना वर्चस्व गाजवण्याची मुभा दिली, तर आपल्याला आपल्या विचार आणि कृती स्वातंत्र्याला मुकावे लागेल. इ्स्रायल आपल्या जवळचा नाही किंवा लांबचाही नाही. पाकिस्तानविरोधात ते आपल्या पाठीशी होते, परंतु इराणबाबत त्यांची भूमिका चुकीची आहे. आपली दोन्ही मित्र राष्ट्रे जेव्हा युद्ध करतात तेव्हा हुशारीने भूमिका घेणे गरजेचे असते. तिथेच आपला धोरणांचा कस लागतो. – प्रशांत भागवत.

बौद्धिक खुराक

‘इब्सेन बरोबरच होता… !’ हा लेख वाचून बौद्धिक आनंद झाला. वैयक्तिक पातळीवर या लेखाने मला जागतिक पातळीवरील खूप काही माहिती दिली. तसंच या लेखाने इब्सेनच्या ऐतिहासिक संदर्भाचा शोध घेण्याची उत्सुकता निर्माण केली. या लेखात इराण- इस्रायल युद्धाचे अचूक विश्लेषण केले आहे. हा लेख म्हणजे माझ्यासारख्या वाचकांसाठी बौद्धिक खुराक आहे. – राहुल आफळे, सातारा.

उद्बोधक लेख

इराणच्या लेखात मोहम्मद मोसादेघ संदर्भातील माहिती नवीन होती. अमेरिका, इराण आणि मध्यपूर्वेतील राजकारणासंदर्भातील घटना आणि माहितीची गुंफण आणि त्याचा अन्वयार्थ विचारास प्रवृत्त करणारा आणि उद्बोधक असाच आहे. मनोहर पर्रिकरांविषयीचा लेखही आवडला. फेब्रुवारी २००५ मध्ये गोव्यात राजकीय संकट निर्माण झालेलं असताना पणजीत जाऊन एका वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करण्याचा योग आला, त्यावेळी पर्रिकरांसोबत मुख्यमंत्री निवासस्थानी, नव्या विधान भवनात अनेकदा भेटी, चर्चा झालेल्या. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सुहास फडके यांच्याकडून त्यांच्याविषयीचे अनेक किस्से ऐकले होते. पर्रिकर गेल्यानंतर नितीन गोखले याच्या ब्लॉग लिखाणातून दिल्लीतील पर्रिकर बरेचसे कळले. राफेल प्रकरण आणि त्यांच्या मुलाला डावलण्याविषयी लिहिले हे फार बरे झाले. – हारीस शेख, मुंबई.

मनातील गुंता सुटला

वाचक या नात्याने रोजच इराण- इस्त्रायल यांच्या युद्धाच्या बातम्या आणि यामध्ये मध्यस्थी कोणी करावी या अनुषंगाने चर्चा ऐकल्यानंतर असे वाटायचे की, नेमके दोन्ही देशांचे वाद काय असावे. परंतु हा लेख वाचून माझ्या मनातील गुंता सुटला. माझे वडील १९८० ते ९० च्या दरम्यान ग्रामीण भागात जालन्यातील रोहिलागड येथे सहशिक्षक असताना माझे माध्यमिक शिक्षण सुरू होते. यावेळी ग. वा. बेहरे यांचे ‘सोबत’ हे साप्ताहिक व वृत्तपत्रे खेड्यापाड्यात दोनतीन दिवस पोस्टाने उशिराने येत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी फक्त रेडिओच्या माध्यमातून प्रादेशिक राष्ट्रीय-आंतर राष्ट्रीय घडामोडींची माहिती बातम्यांद्वारे कळत होती. त्यावेळी छोटासा इस्रायल हा ज्यू लोकांचा देश असून तो अवतीभोवती असलेल्या मुस्लीम राष्ट्रांच्या नाकात दम आणून स्वत:चे सार्वभौमत्व टिकून ठेवत आहे, तसेच त्यांचे विमान अपहरण केल्यानंतर त्यांनी त्यांचे ज्यू नागरिक कशा पद्धतीने सोडवून आणले याच्या चर्चा रंगायच्या. तर इराण आणि इराक यांच्याकडे तेलांच्या खाणी असून त्यांचे कच्च्या तेलाचे रूपांतर शुद्ध तेलात करण्याचे तंत्रज्ञान युरोपियन देशांनी त्यांना दिल्याने त्यांच्यावर अनंत उपकार असल्याचे तत्कालीन परिस्थितीत सांगितले जात होते. या लेखामुळे सध्याच्या इराण-इस्रायल युद्धाबाबत इत्थंभूत माहिती मिळाली. – अॅड. अरविंद एस. मुरमे, जालना.