२६ जूनच्या ‘लोकरंग’मधील गिरीश कुबेर यांचा ‘फक्त पासवर्ड बदललाय!’ हा लेख अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या पाऊण दशकात आपल्या राजकारणात नक्की काय बदल झालाय, याबद्दल या लेखातील निष्कर्ष अगदी चपखल असाच आहे. मात्र, राजकारणावर परिणाम करणारा हा नवा पासवर्ड संपूर्ण विरुद्ध अर्धाचा आहे. पुरोगामित्व आणि हिंदूत्व हे विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणता येतील. अशा कोणत्याही ‘पासवर्ड’ला फसणे हा भारतीय मतदारांचा गुणधर्म (अवगुण) लोकशाहीसाठी घातकच आहे. पण या पासवर्डची निवड आमूलाग्र बदलली आहे. हा बदल लक्षणीय नाही काय? जनमानसाची ही उलट दिशेने चाललेली वाटचाल आपल्या धर्मनिरपेक्ष घटनेच्या विरोधात आहे. जनमानसाची ही प्रगती नसून अधोगती म्हणावी लागेल.

प्रमोद तावडे, डोंबिवली

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

प्रभावी भाष्य

गिरीश कुबेर यांच्या ‘फक्त पासवर्ड बदललाय!’ या लेखात पक्षांतर या विषयावर मार्मिक दाखले देऊन अतिशय प्रभावी भाष्य केले आहे. सत्य प्रस्तुत करताना लेखकाने अतिशय नि:पक्ष भूमिका घेतली आहे.

मनीष बाबारावजी कळमकर, अमरावती

देशाची सद्य:परिस्थिती भीषण

‘फक्त पासवर्ड बदललाय!’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. नोटाबंदी, जीएसटी अंमलबजावणी, शेती कायदे अशा केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयांनी राज्यकारभाराचा बोजवारा उडालेला आहे. वर्षभराच्या शेतकरी आंदोलनानंतर निवडणुकीच्या तोंडावर नाक मुठीत धरून नवे शेती कायदे रद्द करावे लागले. निवडणूक प्रचारात धार्मिक तेढ आणि ध्रुवीकरण घडवणाऱ्या प्रवक्त्यांना मोकाट सोडून मतपेटी जिंकली खरी; परंतु आखाती देशांनी मानगूट धरल्यानंतर त्यांच्या नाकदुऱ्या काढीत भाजपने आपल्या प्रवक्त्यांवरच खापर फोडलं. या प्रकरणी देशाची मात्र जगभर नाहक छी: थू! झाली. करोनाची पहिली लाट ओसरताना ‘जितम् मया’ असा जयघोष करीत कुंभमेळा आणि लाखांच्या निवडणूक प्रचारसभा आयोजित करून करोनाची विनाशकारी दुसरी लाट ओढवून घेतली गेली. बेकारी, महागाई आणि आयात-निर्यातीतील तूट नवनवीन विक्रम करीत आहे, तर रुपया आणि शेअर बाजार निर्देशांक सर्वकालीन तळाला पोहोचले आहेत. या समस्यांवर उपाय करण्याऐवजी प्रधानसेवक विरोधकांमागे आर्थिक चौकश्यांचं शुक्लकाष्ठ लावण्यात आणि त्यांची सरकारे पाडण्यात व्यग्र आहेत. निवडणूक जवळ येताच दहा लाख सरकारी नोकऱ्या, अग्निपथ अशा दिखाऊ आणि बाष्कळ घोषणांचा पाऊस पाडत आहेत. राज्याराज्यांत चिपळ्या वाजवीत मनोहारी कीर्तन करीत आहेत. भक्तगण अर्थातच त्यांच्या अपूर्व कलाविष्काराची तोंड फाटेस्तोवर तारीफ करीत आहेत. इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणायची ही. रोम जळत असताना फिडल वाजवण्यात मग्न असलेल्या नीरोच्या खूशमस्कऱ्यांनी त्या वादनाची अशीच वाहवा केली होती. या लंगडय़ा कारभाराची संभावना समर्थाची क्षमा मागून पुढीलप्रमाणे करता येईल :

‘लंब्याचौडय़ा बाता, कृती शून्य आहे

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे..’

उत्तम विचारे, दादर, मुंबई

निरपेक्ष मांडणी

गिरीश कुबेर यांचा ‘फक्त पासवर्ड बदललाय!’ हा लेख वाचला. लेख वाचून माझ्या अगदी शालेय वयापासून घडत असलेल्या राजकीय घटना लेखकाने या लेखात मुद्देसूद मांडल्या आहेत. कोणत्याही पक्षाला/ विचारसरणीला कुठेही समर्थन मिळेल असे कुठलेही विधान न करता निरपेक्षपणे एक-एक शब्द या लेखात वापरला. असे लिखाण वाचूनच वाचकांची/ समाजाची राजकीय विचारसरणी अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होते.

राजेश सूर्यवंशी, जळगाव

न पटणारा लेख

‘लोकरंग’ (२६ जून) मध्ये ‘जातिवंत दु:खाचे तांडे’ हा प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेला लेख वाचला. वारीला येणाऱ्या जवळपास पाच ते सहा लाख लोकांपैकी कुठल्या तरी दोन ते तीन लोकांची मतं घेऊन त्याच्या आधारे लेखकाने मत बनवायचा प्रयत्न केला आहे. वारीच्या मागची तात्त्विक पार्श्वभूमी, त्याला असलेले आध्यात्मिक अधिष्ठान समजून घ्यायला हवे. संतांची शिकवण रोजच्या व्यवहारात परावर्तित करण्यासाठी संतांनी केलेला सामाजिक आविष्कार म्हणजे वारी होय. वारीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ‘व्यक्तीला दु:ख झाल्यानंतर तो देवाकडे वळतो’ या गृहितकावर आधारित लिहिलेला हा लेख मनाला न पटणारा आहे. वारकरी संप्रदायाची सामाजिक फलश्रुती म्हणजे वारी होय.

डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारीठाणे