‘लोकरंग’ (१२ जानेवारी) मध्ये हृषिकेश जोशी यांचा ‘लोकपाल, गर्वनिर्वाण आणि गडकरी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात लेखकाने हे नाटक रंगभूमीवर येऊ शकले नाही असे म्हटले आहे. प्रत्यक्षात ‘गर्वनिर्वाण’चा प्रयोग २५ मे १९८५ रोजी सादर झालेला आहे. हा प्रयोग ‘रंगशारदा’तर्फे सादर करण्यात आला. या नाटकाचे एकूण ३७ प्रयोग झाले. भालचंद्र पेंढारकर यांनी या नाटकाचे संगीत व दिग्दर्शन केले होते, तर विद्याधर गोखले यांनी रंगावृत्ती केली होती. या नाटकात गोखले यांनी स्वरचित दोन गाण्यांचा अंतर्भाव केला होता. उर्वरित गाणी गडकऱ्यांनीच लिहिली आहेत. या प्रयोगात बकुलेश भोसले यांनी हिरण्यकश्यपू, मधुवंती दांडेकर यांनी कयाधू व त्यांच्या धाकटय़ा मुलाने प्रल्हादाची भूमिका केली होती. शुभदा दादरकर यांनीही या नाटकात भूमिका केली होती.
अरविंद पिळगावकर, मुंबई

जुन्या स्मृतींना उजाळा..
‘लोकरंग’ (५ जानेवारी) पुरवणीतील ‘सय’ या सदरातील सई परांजपे यांचा ‘उजाळा’ हा आकाशवाणी पुणे केंद्राचे  सिंहावलोकन करणारा लेख वाचला अन् जुन्या काळातील स्मृतींना उजाळा मिळाला, स्मृती जाग्या झाल्या! त्या काळी रेडिओला अनन्यसाधारण महत्त्व होते. इराण्यांच्या हॉटेलात, रेस्टॉरंटमध्ये रेडिओचे दर्शन घेता येई. ग्रामीण भागात तर घरी रेडिओ असणे म्हणजे ‘घराणे संपन्न आहे’ असे मानले जाई. रेडिओवरील कार्यक्रमही अगदी दर्जेदार, समाजप्रबोधन करणारे असे असत. भावसरगम, आपली आवड, सुगम संगीत, कामगार सभा इत्यादी मुंबई केंद्रावरील प्रदर्शित होणारे कार्यक्रम लोक अगदी आवर्जून ऐकत असत. ‘सहज सुचलं म्हणून’ अगदी खदखदून श्रोत्यांना हसवीत असे, तर दत्ता कुलकर्णीच्या बातम्या दर्जेदार असत!
१९५५-५६ साली माझीदेखील ‘गंमत जंमत’ या छोटय़ा बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमात निवड झाली होती. त्या काळातल्या नारायण देसाईंनी माझी गाण्याची परीक्षा घेतली होती. स्टुडिओत मी त्यांना दरबारी कानडय़ातले ‘रजनीनाथ हा नभी उगवला’ हे नाटय़पद गाऊन दाखविले अन् त्यांनी माझी त्वरित  निवड केली. पुढे काही वर्षे असे कार्यक्रम झाले. गमंत-जंमतची वेळ संध्या. ५.३० वा. असली तरी शाळेला दांडी मारून दुपारी बरोबर ३ वा. स्टुडिओत हजर व्हावे लागे. कामगार सभेच्या वेळी रेडिओवरून निघणाऱ्या सुरावटीवरून लोकांना संध्याकाळच्या दिवेलागणीची जाणीव होत असे. अशा रीतीने रेडिओ हा जीवनाचा अविभाज्य भाग समजला जात होता..
परांजपेताईंनी ‘निवेदिका का हासत होती’ या सांगितलेल्या किश्श्याप्रमाणेच आमच्याही ‘गंमत-जंमत’च्या कार्यक्रमातून नाटिका सादर करताना चिंधीसाठी द्रौपदीने साडीचा पदर फाडताना देसाईंनी ऐनवेळी चक्क हातातला पेपर फाडून चिंधी फाडण्याचा आवाज श्रोत्यांना ऐकवला होता, त्याची आठवण झाली..
– कीर्तीकुमार वर्तक, वसई.

पुरस्कार : पडद्याआडची स्थिती
रवींद्र पाथरे यांची नाटकांची समीक्षा वाचूनच बहुतांशी आम्ही मराठी नाटके पाहायला जातो, हे सर्वप्रथम नमूद करायला हवे. एकूणच नाटय़क्षेत्रातील घडामोडींवर त्यांनी लिहिलेले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात. मुख्य म्हणजे पडद्याआड काय चालते, हे समजायला आम्हाला त्यामुळे मदत होते. आजकाल खिरापतीप्रमाणे वाटल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर त्यांनी जे लिहिले आहे ते आवडले. टीव्हीवरील अ‍ॅवार्ड फंक्शन्समधून तर दर रविवारी पुरस्कारांचा पाऊस पडत असतो. मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की, सृजनशील कार्यासाठी दिले जाणारे  इतरही पुरस्कार (नाटय़क्षेत्राच्या व्यतिरिक्तही!) एकदा दिल्यानंतर या विजेत्यांचे पुढे काय होते? त्यातून त्यांना आणखीन चांगली सृजनशील निर्मिती करायला प्रेरणा मिळते का? या पुरस्कारांकडे ते कसे पाहतात? पुरस्काराचे त्यांना अप्रूप असते का? आदीचाही धांडोळा घेणे गरजेचे आहे.     – लता रेळे