scorecardresearch

विवेकाचा दीप

तो सॉलिड चिडला होता. त्याच्या २० वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिला खराखुरा नकार भेटला होता.

तो सॉलिड चिडला होता. त्याच्या २० वर्षांच्या आयुष्यात त्याला पहिला खराखुरा नकार भेटला होता. अन् तो त्याला पचवता येत नव्हता; येणारही नव्हता इतका लगेच. ‘‘आशुदा, ही पार्शलिटी आहे रे, माझा ब्लॉगच सगळ्यात चांगला होता. आणि मी नाही, माझे टीचर्सही असं बोलले. पण बक्षीस मात्र त्या दुसऱ्यालाच मिळालं. सेटिंग! इट्स ऑल सेटिंग!’’ आणि मग ‘फ’युक्त शिवीचा उसासा टाकत हा नवा बंडखोर त्वेषानं जन्मताना मी पाहिला. वाटलं, बंडखोर वळण भेटतंच कधी ना कधी आपणा साऱ्यांना. काही काळ आपणही झगडत असतो. मग जगताना भवतालाची व्यापक आणि खोल जाणीव होत जाते तसे फाटे फुटतात. गौरी देशपांडेनं लिहिलंय.. ‘‘जे कविता करणार होते ते मलमल विकायला लागले!’’ आणि तसंही होत जातं. माणसं जितक्या सहज बंडखोर होतात, तितक्याच अपरिहार्यपणे धारेला लागतात. पडतं घ्यायची कला त्यांना साधते. तडजोड करणं हा जगण्याचा स्थायीभाव होतो. पण सगळेच असे नसतात. काही सशक्त माणसं अशीही असतात, की जी तडजोड करतात; पण त्याचे अन्वयार्थ जाणून. ती झुकतात; पण झुकताना हरवू देत नाहीत स्वत्व. ती शोधतात समंजसपणाचे धागेदोरे. ओवतात स्नेहाचे नेमके गाणे. जगण्याची समजूत त्यांना क्रमाक्रमाने मिळत जाते. माझ्या पिढीला.. आत्ता तिशीत-चाळीशीच्या प्रारंभाला असलेल्या पिढीला ती हलके आता आता पोहोचते आहे की काय असं वाटून जातं. नांदेडची योगिनी सातारकर-पांडेसारखी कवयित्री मग म्हणते-

‘आजी म्हणायची

धडपडण्यात, झगडण्यात, सांधण्यात

अनुभवाने जीवन घडतं.

आजी म्हणायची,

पसाऱ्यात, गर्दीत, राबत्या घरात

आयुष्य खूपसं आकळतं’

आजीची ती जुनी शहाणी समजूत आमच्या पिढीच्या कवितेत अशी समर्थपणे उतरते आहे. मागे विशीच्या तरुण कवितेवर मी ‘अ‍ॅटिटय़ूडची कविता’ नावाचा लेख लिहिला होता. प्रणव सखदेव, ओंकार कुलकर्णी आणि पवन नालट यांच्या कवितांच्या शोधात मला दिसला तो या विशीचा अ‍ॅटिटय़ूड.. आत्मविश्वास, माफक औद्धत्य आणि खरी किंवा खोटी बंडखोरी. आणि पी. विठ्ठल, जुई कुलकर्णी, उत्पल व. बा., वैभव देशमुख विष्णू जोशी, अतुल कुलकर्णी, प्रिया जामकर इ. माझ्या पिढीच्या कवीमित्रांच्या कविता वाचताना मग जाणवतं की, विशीची जशी अ‍ॅटिटय़ूडची कविता आहे तशी ही पस्तिशी- चाळिशीची समजुतीची कविता आहे. कुणाला आपसूक मिळालेली, कुणाला बंडखोरीचा रस्ता चालून सरतेशेवटी मिळालेली. मग वाशीममध्ये राहून जगभरची कविता आपलीशी करणारा, आपल्या ‘काव्याग्रह’ या मासिकातून ती अनेकांपर्यंत पोहोचवणारा हा उमदा कवीमित्र विष्णू जोशी म्हणतोय-  ‘आणि ही एकेक वेदना मी तुमच्यापुढे ठेवतोय

कदाचित तुम्ही मला मूर्खात काढाल.

हा कसले आपलेच दु:ख उगाळत बसलाय असे सुनावाल..

किंचितशी कुजबुज तर नक्कीच कराल आपापसात

कदाचित माझ्यापासून दुरावाल किंवा जवळही येसाल..

किंवा असेही कराल- की तुम्ही यापैकी काहीच करणार नाही.

फक्त माझ्या ओल्या जखमांना स्पर्श कराल हळुवार

नि तुमच्या जादुई स्पर्शाने माझी एकेक वेदना परावर्तित होईल सुखात..’

आणि मग विष्णूची कविता वाचून त्याला चॅटवर ‘जादुई स्पर्श करणारी कुणी भेटली का रे?’ असं मजेत चिडवलं तरी माझ्या आत त्या कवितेच्या समजुतीची ताकद पोहोचलीच पोहोचली! एकतर ती समजूत आंधळी नाही. घडलं ते नुसतंच बाजूला तर कुणीही सारेल; पण ते समजून घेऊन पुढे सरकण्यात जे पौरुष आहे ते मला या कवितेत दिसतं. या कवीला ‘फॅक्टस् ऑफ लाइफ’ माहिती आहेत. लोक कुजबुजतील हे त्याचं निरीक्षणही बोलकं आहे. पण मराठीत प्रसिद्ध असलेल्या तुच्छतावादाने तो सगळ्यांना बाराच्या भावात काढत नाही! त्याच्या आतच आशेचं कोवळं अम्लान राहिलेलं बियाणं आहे. ते पावसाच्या माराला, उन्हाच्या शेकाला, मातीच्या भूकंपी आवर्ताला पुरून उरलेलं आहे. आणि म्हणूनच तो समजुतीचं गाणं पुढे गात

शेवटाला म्हणतो-

‘पण तुम्ही यापैकी कोणती गोष्ट कराल हे आत्ता तरी सांगता येणार नाहीये निश्चितपणे..’

इथे आशा आहे, पण भाबडेपण नाही. आणि मग अजून थोडं मोठं झाल्यावर तो समजुतीचा मार्ग अजून स्वच्छ दिसत असावा. जसा हा राजीव काळे यांना लख्ख दिसतोय..

‘मीच माझी आई होऊन

मीच माझ्या कुशीत शिरून

एकमेकांना समजून घेताना

एकमेकांना समजावताना

दोघांचे डोळे

मिटलेले, भरलेले..’

अगदी छोटी कविता आहे ही. पण या कवीनं त्यात उपयोजलेले ‘समजून घेताना/ समजावताना’ हे दोन शब्दबंध माझं लक्ष वेधून घेत आहेत. हीही समजुतीचीच कविता. फक्त अधिक थेट. माणसाला भिडणारं अटळ एकटेपण ओळखणारी. त्या अटळ एकाकी अवस्थेत स्वत:च स्वत:ची सोबत व्हायचं, हे सांगणारी. आणि ती सोबतही कशी? आईसारखी! आपणच आपली आई व्हायचं, आपल्याला थोपटवायचं, अंगाई गायची, शांत करायचं. किती विलक्षण, अवघड गोष्ट आहे ही! आणि हा कवी एखादी साधी गोष्ट सांगावी तशा सहज सुरात सांगतो आहे. ती सहजता पुष्कळ अनुभव घेतल्यावर व पचवल्यावर आलेली आहे. त्या सहजते मागचं वैराण वाळवंट आणि मग पडलेला धो-धो पाऊस हे दोन्ही मला तरी दिसत आहेत.

पण मग समजुतीला आई.. रॅदर बाई ही जवळची वाटत असावी का? बाया जगणं जास्त सहजतेनं समजून घेतात का? बाप्यांपेक्षा? आणि असेल तर का? की त्यांच्या आत स्नेहाचा एक न आटणारा झरा असतो? पुन्हा योगिनी सातारकर-पांडे म्हणतात..

‘माणूस कळायला लागल्यावर

गळून पडतात मीपणाचे सारे कंगोरे

आणि हातात उरतात

केवळ निखळ प्रेमाचे झरे..’

‘मी’पणा गळून पडणं ही बहुधा त्या समजुतीकडे जाण्याची महत्त्वाची वाट असावी. तो ‘मी’पणा अख्खा गळून पडत नाहीच. पण तो अख्खा उभाच्या उभा जाणून घेता आला तरी रस्ता सोपा होतो. मग अट्टहास कमी होतो, आग्रह मागे सरतात. वैभव जोशीसारखा उत्तम गुणाचा कवी मग त्याच्या लयीची, छंदाच्या मास्टरीची ताकद दाखवत म्हणतो-

‘ रे छळू नका रे त्याला

का नवे न काही स्फुरते

एखाद्या आयुष्याला

एखादी कविता पुरते!’

वैभवच्या ओळीच इतक्या सहजतेने बोलतात, की त्यांचं विश्लेषण करणं हे विच्छेदन करणं होईल. ‘एक तरी ओवी अनुभवावी’मधला सूर हा वैभवच्या या चरणापासून फारसा दूरचा नाहीच.

पण हा माझ्यासमोर माझा विशीचा खरोखर चांगला, सुस्वभावी, उत्साही मित्र शिव्यांचे उसासे सोडतो आहे आणि मला कळतंय, की हे सारं समजुतीचं गाणं त्याला समजावण्यात काही अर्थ नाही! बंडखोरीची ताकद का मला माहीत नाही? माझ्या साऱ्या लेखनात ती लपून असतेच, असं निरंजन कुलकर्णी हा माझा जाणता वाचक-मित्र सांगत असतो. रॉक संगीताचं ते बंडखोर वळण मला कधीच बिनमोलाचं वाटलेलं नाही. जेव्हा सारेच दीप विझू विझू होतात तेव्हा बंडखोर माणसं तो पलिता पुन्हा पेटवतात. (बाय द वे- ‘सारेच दीप विझू विझू झाले’ ही कवी अनिलांची ओळ आहे.) पण एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाचे माणसाच्या वाढीचे टप्पे बघितले की ध्यानात येतं- ‘आयडेंटिटी विरुद्ध रोल कन्फ्युजन’ या द्वंद्वाची ती बंडखोरी असते. पुढच्या टप्प्यांसाठी ती पुरत नाही. एरिक्सन्नं शेवटचं द्वंद्व ‘इंटेग्रिटी’ विरुद्ध ‘डिस्पेअर’ असं सांगितलं आहे. आयुष्याच्या शेवटी सारं मागे सारून मृत्यूच्या दाराशी तुम्ही ताकदीनं, सशक्त इंटेग्रिटी धरून जाता की नैराश्यानं ग्रासून जाता, हे त्या एरिक्सनला महत्त्वाचं वाटतं. मला मानसशास्त्र कळत नाही; पण मला हे कळतं, की समजुतीची वाट ही त्या इंटेग्रिटीकडे जात असावी. त्या समजुतीमध्ये पडतं घेणं, मागे सरणं, हट्ट सोडणं, झुकणं, तडजोड करणं असं सारं असलं तरी त्यापलीकडचा सर्जक अवकाशही असतो. तो झगमगता असतो. डोळ्यात पाणी येतंच ते सारं बघताना; पण नजर स्वच्छही होते. आणि मग कानात हलकेच ज्ञानदेव सांगून जातात :

‘अविवेकाची काजळी

फेडूनी विवेकदीप उजळी

त योगिया पाहे दिवाळी

निरंतर..’

माझ्या या विशीच्या मित्राला बाकी काही सांगायला नको; पण हे सांगायला हवं की, मित्रा, विवेकाचा म्हणून दीप असतो. तो गणपती मिरवणुकीच्या लेजर आणि एल. ई. डी. दिव्यांपेक्षाही ‘पॉवरफुल’ असतो. एवढं त्याला कळलं की काही चिंता नाही. देईल तो शिव्या, मारेल पंच-बॉक्स; पण माहीत असेल त्याला तो विवेकाचा, समजुतीचा दीप.. आणि मग तो

दीप नेमक्या वळणावर माझ्या मित्राचं जगणंच उजळवून टाकेल!

डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com

मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. ( Vah-mhantana ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poems about expression

ताज्या बातम्या