15 August 2020

News Flash

भाजपची वाराणसीत निदर्शने

हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी होण्याची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.

| May 9, 2014 12:34 pm

हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी होण्याची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. वाराणसीचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांनी जाणीवपूर्वक गंगा आरती व बेनियाबाग मैदानावर परवानगी नाकारल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केला. चाळिशीच्या वर तापमान असताना मोदींच्या समर्थनार्थ विद्यापीठाच्या लंका प्रवेशद्वारासमोर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रांजल यादव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जेटली यांच्यासमवेत उत्तर प्रदेशचे प्रभारी अतुल शहा, ज्येष्ठ नेते अनंत कुमार, श्याम जाजू उपस्थित होते.
जेटली म्हणाले की, प्रांजल यादव कुणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांना कोणत्या गुप्तहेर संस्थेच्या माहितीच्या आधारावर रोड शो, गंगा आरतीची परवानगी नाकरण्यात आली? श्याम जाजू म्हणाले की, निवडणुकीत प्रचार करणे हा उमेदवाराचा अधिकार आहे. त्या अधिकारावरच गदा आणली गेली. गंगा आरतीची परवानगी दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर जाजू म्हणाले की, रात्री उशिरा परवानगी देण्यात आली. त्यातही संख्या मर्यादित ठेवण्याची सूचना करण्यात आली. उशिरा परवानगी मिळाल्याने व्यवस्थापनावर ताण आला. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर दहा वाजेपासूनच कार्यकर्ते जमू लागले होते. त्यात युवकांची संख्या लक्षणीय होती. दुपारी शहा, जेटली व अनंत कुमार निदर्शनस्थळी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर तीन रस्ते एकत्र येत असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. परंतु भाजपच्या निदर्शनांमुळे वृद्ध, रिक्षाचालक, शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. भाजपच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या रस्त्यावर जाणाऱ्या मालवाहू रिक्षावर असलेले आम आदमी पक्षाचे पोस्टर फाडले

निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भाजपचा मोर्चा
नवी दिल्ली: वाराणसीत भाजप नेत्यांचे आंदोलन सुरू असताना दिल्लीतही निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भाजप नेत्यांनी मोर्चा नेला. मात्र पोलिसांनी या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. वेंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नक्वी आणि रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. नायडू यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांची भेट घेऊन वाराणसीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली. हे पक्षपाती वर्तन करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. यातून आयोगाचीच प्रतिमा खालावल्याचा आरोप या नेत्यांनी केला. वाराणसीच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बदली केल्याखेरीज खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात निवडणूक होणे अशक्य असल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. आम्ही आयोगाच्या विरोधात नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.

जेटली आले  तरीही ‘हर हर मोदी’
जेटली व शाह यांचे निदर्शनस्थळी आगमन झाल्यानंतरही केवळ मोदीनामाचा गजर सुरू होता. हर हर मोदी ते चप्पा-चप्पा भाजपा.. अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. तेव्हा कुणा एका ज्येष्ठ  कार्यकर्त्यांने जेटलींचा जयजयकार केला. परंतु, युवा कार्यकर्त्यांना त्यास फारसा प्रतिसाद न देता पुन्हा ‘अब की बार..’चा नारा दिला. अखेरच्या टप्प्यात १२ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वाराणसीत दाखल झाले आहेत. आझमगढची सभा आटोपून मोदी रोहणिया येथे नागरिकांना संबोधित करणार होते. वाराणसीहून साधारण अध्र्या तासाच्या अंतरावर असलेल्या रोहणियातून मोदी वाराणसीत हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. त्यानंतर ‘रोड शो’द्वारे वाराणसी शहरात शक्तिप्रदर्शन करण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखली होती. प्रशासनाने त्याची परवानगी नाकारली. परंतु, प्रांजल यादव यांनी बुधवारी रात्री उशिरा गंगा आरतीला परवानगी दिली. त्याचा राग मानून भाजप नेत्यांनी गंगा आरतीचा कार्यक्रम रद्द केला.

निवडणूक आयोगाने भाजपचे आरोप फेटाळले
नवी दिल्ली: वाराणसीत मोदींच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर भाजप आक्रमक झालेला असतानाच, निवडणूक आयोगाने मात्र आपण काम करताना कुठल्याही राजकीय पक्षाला घाबरत नसल्याचे स्पष्ट करत सडेतोड उत्तर दिले. तसेच कोणताही पक्षपातीपणा केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.भाजपने मोदींच्या कार्यक्रमाच्या परवानगीवरून थयथयाट केल्याने निवडणूक आयोगाने तातडीने पत्रकार परिषद बोलावून मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत वाराणसीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांजल यादव यांचे समर्थन केले. तसेच भाजपच्या मागणीनुसार त्यांना बदलण्याची मागणी धुडकावून लावली. भाजपने केलेल्या टीकेबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. आयोगावर टीका करताना प्रगल्भता दाखवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निवडणूक अधिकाऱ्यांना जो सल्ला देण्यात आला त्या आधारेच त्यांनी परवानगी नाकारली. ज्या वेळी सुरक्षा आणि व्यवहार्यता या गोष्टींचा प्रश्न निर्माण होते त्या वेळी जिल्हा पातळीवर घेतलेल्या निर्णयाच्या आधारे आयोग शिक्कामोर्तब करते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याचे मुख्य संपत यांनी सांगितले. मोदींची सुरक्षितेचा प्रश्न इथे होता. त्यामुळे जिल्हा पातळीवर घेतलेल्या निर्णयापासून हटण्याचा प्रश्नच नाही असे संपत यांनी स्पष्ट केले.

मन से है मुलायम..
निवडणूक म्हटली की धार्मिक प्रतीकांचा वापर केला जाणारच. त्यात गंगा मैय्या म्हटल्यावर सारंच संपलं. वाराणसीतील प्रत्येक उमेदवार स्वत:ला गंगेचा पुत्र म्हणवून घेतो. ‘अब की बार मोदी सरकार..’ या नमो मंत्रावर काँग्रेसने ‘वाराणसी की एक ही राय, अब की बार अजय राय..’ या घोषणेचा उतारा दिला आहे. वो बाहर से आये.. हम घर के है.. असं सांगून अजय राय यांनी ‘घरचे व बाहेरचे’ असा भेद दाखवून दिला. तिकडे मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाबद्दल काय बोलावे? समाजवादी पक्षाने प्रचारादरम्यान गंगेचा फारसा वापर केला नाही. फक्त मन से है मुलायम, इरादे से लोहा.. असं सांगून मुलायमसिंह यादव कित्ती दयाळू, प्रेमळ वगैरे आहेत, हे सांगण्याची धडपड सुरू आहे. पोस्टर वॉरमध्ये तर नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अजय राय यांच्यात जुंपली आहे. भल्या मोठ्ठय़ा पोस्टरवर गंगा नदीच्या तटावर एक ‘पंडित’ गंगेला अध्र्य देतोय नि नरेंद्र मोदी त्याभोवती नतमस्तक होतात! हे पोस्टर पाहून अन्य काही सांगावेच लागत नाही. तिकडे अजय राय गंगेच्या विस्तीर्ण पात्रात नावेत बसलेले असल्याचे पोस्टर झळकते. त्यावर ठळक शब्दांत लिहिलेले असते, वाराणसी का नारा है, अजय राय हमारा है.!   पोस्टर्सच्या गर्दीत आम आदमी पक्ष काहीसा हरवलेला वाटतो. पण रणरणत्या उन्हात, चौकाचौकात आम आदमी पक्षाचा एखाददुसरा स्वयंसेवक हातात झाडू, आम आदमी पक्षाचे टी-शर्ट घालून कुणाशीही न बोलता उभा असतो, पोस्टरसारखा!
लाट जिथे लुप्त होते..
अंत्यसंस्कारांस हिंदू धर्मात असाधारण महत्त्व आहे. त्यात गंगेच्या तीरावर जिथे स्वयं भगवान शिव विराजमान आहे, तिथे अंत्यसंस्कार झाले तर थेट मोक्ष मिळतो ही श्रद्धा. त्यामुळे वाराणसीच्या साडेतीनशे घाटांपैकी मनकर्णिका घाटावर अंत्यसंस्कारांसाठी अक्षरश: रांग लागलेली असते. अंत्यसंस्कारांसाठी सर्व साहित्य देणारे व्यावसायिक इथे आहेत. मृताच्या नातेवाईकांची आर्थिक क्षमता बघून पैशांची मागणी केली जाते. धर्माधारित हा व्यवसाय आहे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. रात्रीतूनदेखील कितीतरी चिता जळत असतात. या मनकर्णिका घाटावर चांडाळ असतो. भोजपुरीत त्याला चंडाल म्हणतात. राजा हरिश्चंद्राच्या कथेत ज्याचा उल्लेख आहे त्याच चांडाळाचे हे वंशज ! यांचे एकच काम. अंत्यसंस्कारासाठी अग्नी देणे. मृतास जो अग्नी देणार असतो त्याला चांडाळाकडून अग्नी विकत घ्यावा लागतो. यथाशक्ती व यजमानाच्या इच्छेवर ही रक्कम ठरते. वर्षांनुवर्षे हे ‘चंडाल’ हेच काम करतात. त्यांच्या घरात ना शिक्षण ना प्रगती! हे धार्मिक कार्य आपल्याला स्वयं परमेश्वराने दिले. तेच करीत राहायचे हा या चंडालांचा श्रद्धाभाव! त्यांना ना निवडणुकीची पर्वा ना अन्य कशाची. त्यामुळे वडोदरा ते वाराणसी आलेली ‘लाट’ मनकर्णिका घाटावर लुप्त होते.
भांग का रंग जमाय लो भैय्या..
बाबा काशी विश्वनाथाच्या भूमीत आल्यावर त्याचा ‘प्रसाद’ घेतलाच पाहिजे, हा वाराणसीकरांचा आग्रह. वेगवेगळ्या ‘फ्लेवर’च्या दुधापासून बनवलेल्या थंडाईत थोडीशी भांग घालून ‘जय भोले बाबा..’ म्हणून हा प्रसाद ग्रहण करायचा. त्यानंतर पुढचे किमान पाच तास तरी अपूर्व शांतीचा अनुभव! दशाश्वमेध घाटाकडे जाणाऱ्या चौकात थंडाईची अनेक दुकाने आहेत. तिथे हा प्रसाद विकत घेण्यासाठी रांग लागते. आम आदमी, नमो सैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, मुलायम भक्त.. असे कित्येक हौशे-नवशे भारतभरातून वारणीस दाखल झाले आहेत. वाराणसी पाहण्याचा त्यांचा उत्साह अवर्णनीय. चाळिशीच्या वर तापमान गेल्यावर थंडाई पिण्याचा मोह होतो. काही अतिउत्साही कार्यकर्ते भांगेचा मोठा गोळा टाकण्याचा आग्रह करतात. अस्सल वाराणसीकर म्हणतो, सवय नसेल तर घेऊ नका. पण ‘आम आदमी’ कुणाचे ऐकण्याचा मन:स्थितीत नसतो. ग्लासभर थंडाई घेतल्यावर पुढचे किमान दोन दिवस तरी या कार्यकर्त्यांसाठी अरविंद केजरीवाल पंतप्रधान झालेले असतात! नवख्या कार्यकर्त्यांचे असे थंडाईचे अनेक किस्से गंगेच्या किनाऱ्यावर पसरले आहेत.
— बनारसी बाबू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2014 12:34 pm

Web Title: bjp expresses disappointment over election commissions decision
Next Stories
1 ‘गंगा आरतीला परवानगी असताना मोदींचा कांगावा’
2 ‘मोदींची आयोगाबाबत भूमिका अवमानकारक’
3 मोदींकडून हीन दर्जाचे राजकारण ; सोनिया गांधी यांचा आरोप
Just Now!
X