भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विविध अस्त्रांचा वापर करणाऱ्या काँग्रेसने आता दहशतवादाचा मुद्दा पुढे केला आहे. भाजपचा दहशतवाद विरोध केवळ मतांसाठी आहे. दहशतवादाविरोधात ठोस भूमिका घेतल्याचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांविरोधात एकदाही आवाज का उठवला नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
सिब्बल म्हणाले की, संसद हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू, अजमल कसाब यांच्या विरोधात भाजपने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्यांविरोधात भाजपने कधीही कारवाईची मागणी केलेली नाही. हा सरळ-सरळ दुटप्पीपणा आहे, अशी आगपाखड सिब्बल यांनी केली. विशेष म्हणजे दहशतवादाचा मुद्दा उकरून काढल्यानंतर सिब्बल यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दय़ावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मुस्लीम आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा केली जाईल. काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर अलीकडेच जाहिरनाम्याचा नवा मसुदा टाकण्यात आला. त्यात आर्थिकदृष्टय़ा मागास मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यावर पत्रकारांनी छेडले असता सिब्बल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने हा निर्णय घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिली होती. तेव्हापासून हा मुद्दा प्रलंबित आहे. काँग्रेसची भूमिका मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे, असे संदिग्ध उत्तर देत सिब्बल यांनी वेळ मारून नेली.