चौदाही तालुक्यांतील प्रकल्प पंधरा दिवसांत कार्यान्वित होणार

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, सुमारे दीड-दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात वैद्यकीय प्राणवायूची प्रचंड कमतरता जाणवत होती. राज्यभर शोधाशोध करून, गुजरातमधूनही प्राणवायू आणण्याचे नियोजन करावे लागले. मात्र आता जिल्ह्यात तब्बल ३३ प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहेत. यातील १६ प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उभारले जात आहेत. यातील काही खासगी प्रकल्प सुरूही झाले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारले जात असलेले १४ प्रकल्प येत्या पंधरा दिवसांत कार्यान्वित होतील.

काही दिवसांपूर्वी वैद्यकीय प्राणवायूच्या उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह खासगी रुग्णालयांच्या यंत्रणेला प्रचंड धावाधाव करावी लागली. आता मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देताना जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्णतेकडे चालला आहे. दीड-दोन महिन्यातील हा बदल आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पाठपुराव्यातून हा बदल घडला आहे.

शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाची वैद्यकीय प्राणवायूची दैनंदिन गरज १० ते ११ मे. टन आहे. यासह खासगी रुग्णालयांची गरज पाहता सुमारे ३० ते ३५ मेट्रिक टन आवश्यकता भासते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची दैनंदिन गरज ६० मे. टनावर पोचली होती. अनेकदा प्राणवायू ऐनवेळी उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जिवावर बेतण्याचा प्रसंगही निर्माण झाला होता. परंतु जिल्हा प्रशासन व खासगी रुग्णालयांनी त्यावर मात केली.

प्राणवायूच्या निर्मितीसाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४९ कोटी ८४ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १४ ठिकाणी (पैकी एक राहुरी तालुक्यात वांबोरी येथे) हवेतून प्राणवायू निर्मिती करणारे प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे सर्व प्रकल्प ग्रामीण रुग्णालयात, कर्जत व पाथर्डी येथे ते उपजिल्हा रुग्णालयात उभारले जात आहेत. सर्व ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले आहे, त्याचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत हे प्रकल्प कार्यान्वित होतील व त्या माध्यमातून १३.६ मे. टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी दिली.

सर्व ठिकाणी निर्मितीबरोबरच तेथे प्राणवायू सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी विजेची कायम व्यवस्था असावी यासाठी आमदारांच्या सहकार्यातून जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे. प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने सर्व ग्रामीण रुग्णालयातील खाटांची क्षमता क्षमता २५ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.

याशिवाय यापूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयात केंद्र सरकारच्या माध्यमातून ४०० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या २० मे. टन साठा करण्याची सुविधाही उभारली आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक १२०० एलपीएमचा प्रकल्प जिल्हा रुग्णालयात उभारला जाणार आहे. शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात रिलायन्स कंपनीच्या सहकार्यातून ६०० एलपीएमचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आणखी १८०० एलपीएम क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका व सन फार्मा कंपनीच्या माध्यमातून आयुर्वेद महाविद्यालयात एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तसेच शनी शिंगणापूर देवस्थानही दोन प्रकल्प सुरू करणार आहे. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच विखे, थोरात व काळे साखर कारखान्यांचीही हवेतून प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे लोचनभाई इंडस्ट्रीजने ८६ क्षमतेचा प्रकल्प सुरू केला आहे. अहमदनगर मेडिकल गॅस कंपनीने एमआयडीसीमध्ये तर खासगी उद्योजकाने काष्टी (श्रीगोंदा) प्रकल्प सुरू केला आहे. याशिवाय मोठय़ा क्षमतेचा आणखी एक प्रकल्प नेवासेमध्ये पूर्वीपासून सुरू आहे.