लॉकडाउनच्या चारही टप्प्यांमध्ये करोनाला रोखण्यासाठी अंमलात आणले गेलेले सर्व उपाय कुचकामी ठरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता नवा उपाय शोधून काढला आहे. सलग दोन दिवस सतराहून अधिक बाधित रुग्ण आढळून आल्याने आता दुचाकींना प्रतिबंध करण्याची शक्कल आजमावली जाणार आहे. उमरगा आणि उस्मानाबाद शहरात सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वांनाच दुचाकींचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणारांविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशाराच देण्यात आला आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या ४६६ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ४५२ जणांचे अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. यात तब्बल १३२ जण करोनाबाधित आढळले आहेत. सर्वाधिक संख्या उस्मानाबाद तालुक्यात ६७, उमरगा ३२, वाशी ७, तुळजापूर १६, कळंब ३, लोहार १, वाशी ९, भूम २ तर परंडा तालुक्यात ३ रुग्ण आढळले आहेत.

उस्मानाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने करोनाचा संसर्ग वाढला आहे. बुधवारी शहरातील विविध भागातील ३० जणांना नव्याने करोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यात ३० जुलैच्या दुपारपर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ९९१ वर पोहचली असून ४८२ जणांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर एकूण ४६१ जणांवर उचार सुरू असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

उमरगा आणि उस्मानाबाद शहरात जिल्हा प्रशासनाच्या चार महिन्यांच्या निरीक्षणानंतर १ ऑगस्टपासून उस्मानाबाद नगरपरिषद हद्दीत अखेर अनावश्यक दुचाकीस्वारांना बंदी करण्यात आली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनाच केवळ ओळखपत्र दाखवून दुचाकीवरुन प्रवास करता येणार आहे. त्याखेरीज अत्यावश्यक सेवेतील डॉक्टरांना परवानगी असेल. यापूर्वी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना सातत्याने दंडात्मक कारवाई करुन रोखण्याचा प्रयत्न केला, शिवाय इंधन देण्यावर देखील बंधन घातले होते तरीही रस्त्यावरील दुचाकीस्वारांची संख्या कमी झाली नव्हती. मात्र, या निर्णयाचा फटका मोलमजुरी करणारे बांधकाम व्यवसायिक, शेतमजूर, शेतकरी आणि खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार आहे.