||मोहनीराज लहाडे

 

नगर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता; निवडीतून भाजपची माघार

महाविकास आघाडीची सरशी नगर जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीत पाहावयास मिळाली. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात भाजपचे आ. राधाकृष्ण विखे यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न अधिक होता आणि त्याला भाजपमधूनही अप्रत्यक्ष साथ मिळाली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा ठपका आ. विखे यांच्यावर ठेवणाऱ्या भाजपमधील माजी आमदारांनी, श्रीमती शालिनीताई राधाकृष्ण विखे इच्छुक असलेले अध्यक्षपद त्यांच्यापासून दूर ठेवत पराभवाचा वचपा काढला. त्यामुळे विखे काँग्रेसमध्ये असताना जसे जिल्ह्य़ात विखे विरुद्ध सर्व असे समीकरण रंगत असे तसेच ते आता आगामी काळातही विखे विरुद्ध सर्व असेच समीकरण राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. डॉ. सुजय विखे यांनी व नंतर विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर आ. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला.  विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या वेळी भाजपचे संख्याबळ  मात्र ५ वरून ३ वर आले.

याच परिणामातून माजी मंत्री राम शिंदे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पराभवाचा ठपका ठेवत आ. विखे यांच्याविरुद्ध तोफ डागली. नंतर या दोघांसह पराभूत आमदार वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे आदींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची आता चौकशी होणार आहे.  परंतु भाजपच्या पराभूत झालेल्या व्यक्तींनी विखे यांच्या विरोधात ही आघाडी उघडली, त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचा  निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता. जि.प.च्या अध्यक्षपदी आ. विखे यांच्या पत्नी, काँग्रेसच्या सदस्या श्रीमती शालिनीताई विखे होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षांच्या मदतीने काँग्रेस आघाडी सत्तेत होती. पूर्वी काँग्रेसमधील थोरात गटाला नमवून विखे यांनी अध्यक्षपद कधी भाजप-सेनेची साथ मिळवत तर कधी राष्ट्रवादीतील पिचड गटाची साथ मिळवत सलगपणे पाच वर्षे आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले  होते.

संख्याबळात अपयश

विखे पुन्हा अध्यक्षपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील होत्या.परंतु विखे यांच्या विरोधात भाजपमध्येच आघाडी उघडली गेल्याच्या परिणामातून त्यांना साथ देणारे काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काठावरील सदस्यही  दुरावले गेले. त्याचा पहिला परिणाम जि.प.मधील काँग्रेस गटनेत्याच्या राजीनाम्यात झाला. शिवसेनेचेही काही सदस्य विखे यांच्यासाठी अनुकूल होते. मात्र त्यांना महाविकास आघाडीसमवेतच राहण्याची तंबी  नेत्यांनी दिली. विखे यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र पिचड यांचे नेतृत्व मानणारा जि.प.मधील गटनेता बदलत्या राजकारणामुळे राष्ट्रवादीतच कायम राहिला.

रणनिती चुकली

पक्षादेशाच्या बजावणीतून अनेक बंधने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांवर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून राष्ट्रवादीचे सदस्य पक्षाबरोबरच राहतील याची काळजी घेतली होती. एकीकडे महाविकास आघाडीचे निर्माण झालेले भरभक्कम संख्याबळ व दुसरीकडे जिल्ह्य़ातील भाजप नेत्यांची विरोधी आघाडी या कोंडीत सापडलेल्या विखे यांना अध्यक्षपदासाठी सदस्य जुळवाजुळव करण्यास फारशी संधी  दिली नाही.