News Flash

सूक्ष्म नियोजनामुळेच पंढरपूरमध्ये कमळ फुलले

सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील पहिला कौल

सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील पहिला कौल

मंदार लोहोकरे, लोकसत्ता

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र राज्य सरकारने वीज बिलमाफी, वीजतोडणी, कर्जमाफी, अवकाळी पावसाची नुकसानभरपाई आदी मुद्दय़ावर भाजपाने सरकारविरोधी वातावरण तयार केले आणि मतदारांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित पहिला कौल सरकारविरोधात मतपेटीतून दिला. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सहानुभूती आणि फाजील आत्मविश्वास नडला, तर भाजपाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे या मतदार संघात पहिल्यांदा कमळ फुलून भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचाच विजय झाला.

पंढरपूर मंगळवेढय़ाचे आमदार भारत भालके  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भालके यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला उमेदवारी देणार असे जाहीर केले. यामध्ये भारत भालके यांच्या पत्नीचे नाव पुढे आले. मात्र, त्यांचे पुत्र भगीरथ याने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि भगीरथ यांच्या कार्यकर्त्यांंनी पक्षश्रेष्ठींपुढे जोर धरला.

त्याच दरम्यान, भगीरथ यांच्या नावाला पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांंचा विरोध होता. मात्र अजित पवार, जयंत पाटील यांनी पंढरपुरात येऊन कार्यकर्त्यांंची बैठक घेऊन नाराजी दूर केली. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांचे नाव जाहीर झाले. तर दुसरीकडे भाजपाने बेरजेचे राजकारण केले. गेल्या दोन निवडणुकांत परिचारक आणि समाधान आवताडे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांची मतांची बेरीज जवळपास १ लाख ३० हजार होती. त्यामुळे या दोघांना एकत्र करून भाजपाने मंगळवेढा येथील उद्योजक समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर केली.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सलग तीन वेळा विजयी झालेले भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभूती, अजित पवार, जयंत पाटील, दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे, उदय सामंत, नाना पटोले आदी नेते व मंत्र्यांचा फौजफाटा प्रचारात उतरला होता. सत्तेत आम्ही आहोत. रखडलेली विकास कामे मार्गी लावणार अशी आश्वासने प्रचारात दिली. तर दुसरीकडे भाजपाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा  पाढा जनतेसमोर मांडला. वीज बिल माफ करतो म्हणाले, अधिवेशनात वीजतोड थांबवली आणि अधिवेशन संपताच पुन्हा सुरू केली, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही असे अनेक मुद्दे मांडून सरकार विरोधी वातावरण तयार केले. फडणवीस यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांतील पाण्याच्या प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करताना याबाबत केंद्र सरकारची मदत घेऊन मार्गी लावतो असे आश्वासन दिले.गेल्या ३ निवडणुकीत या पाण्याच्या प्रश्नावरून निवडणूक लढली गेली. मात्र प्रश्न मार्गी लागला नाही.

शेवटच्या टप्प्यात चित्र बदलले

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सारे नियोजन के ले होते. प्रत्येक नेत्यावर छोटय़ा छोटय़ा गावांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. लोकांशी थेट संपर्क  साधण्यात आला. सुरुवातीला भाजप नेते फार आशावादी नव्हते, पण शेवटच्या टप्प्यात चित्र बदलले होते. राष्ट्रवादीतील बेबनाव उघडपणे दिसत होता. याचा फायदा भाजपने उचलला. समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्यात समझोता घडवून आणण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली.

रखडलेले प्रश्न मार्गी लावणार : आवताडे

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्व मतदारांचे आभार मानतो. स्व.माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांच्याबद्दलची सहानुभूती, आ. प्रशांत परिचारक यांचे पाठबळ तसेच  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे सर्व नेते कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. मंगळवेढा येथील ३५ गावांचा पाणीप्रश्न, तसेच इतर प्रश्न मार्गी लावणार आहे. मतदारसंघात विकासाला प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

प्रमुख   उमेदवारांना पडलेली मते

समाधान आवताडे      भाजपा                           १,०९,४५०

भगीरथ भालके         राष्ट्रवादी कॉंग्रेस                १,०५,७१७

शैला गोडसे              अपक्ष                                १६०७

सचिन शिंदे             स्वाभिमानी शेतकरी संघटना     १०२७

नोटा                                                               ११५

एकूण                                                          २,२७,४२१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:20 am

Web Title: bjp won in pandharpur due to proper planning zws 70
Next Stories
1 प्रयत्नांती यश-अपयश
2 रुग्णशय्येचा पेच
3 एकूण चाचण्यांत ५४ टक्के बाधित!
Just Now!
X