02 March 2021

News Flash

मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकणे

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला आम्ही तयार होतो.

(संग्रहित छायाचित्र)

उद्धव ठाकरे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : वाट पाहा, उद्धव ठाकरे यांना योग्यवेळी आणि योग्य उत्तर देणार आहे. शिवसेनेच्या विधानांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ती थुंकी कुठे जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी लगावला.

सत्तेत भागीदार असूनही उद्धव ठाकरे ‘पहारेकरी चोर आहे’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करतात, याबाबत विचारले असता, ‘‘मोदी काय आहेत, हे देशवासीय जाणून आहेत. घरादाराची चिंता नसलेला माणूस पंतप्रधान म्हणून आपल्याला लाभला आहे. त्यामुळे कोण चुकीचे बोलत असेल तर सूर्यावर थुंकले तर काय होते, ती थुंकी कुठे जाते हे लक्षात घ्यावे’’, असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला आम्ही तयार होतो. प्रस्ताव आला की त्यास पाठिंबा द्या, अशी सूचना संबंधित नेत्यांना केली होती. मात्र, निवडणूक तीन दिवसांवर आल्यानंतरही शिवसेनेतर्फे आमच्याशी कोणीच बोलले नाही. नंतर अचानक गिरीश महाजन यांना शिवसेनेच्या नेत्यांचा दूरध्वनी आला की त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी बोलून युती करावी. पाठिंबा त्यांना हवा होता आणि ते प्रस्ताव आमच्याकडे मागत होते. त्यामुळे शेवटच्या दिवशी मी महाजन यांना सर्वाधिकार देऊन टाकले. त्यानंतर भाजपची सत्ता आली, असे स्पष्ट करत, शिवसेनेच्या उदासीनतेमुळेच अहमदनगरची सत्ता त्यांच्या हातून गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. त्याचबरोबर भाजप राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढवणार आहे, असे नमूद  करत शिवसेनेशी युतीची इच्छा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नेतृत्व केंद्रात आणण्याची मागणी भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांने केलेली नाही. गडकरींनी नेतृत्वाच्या जबाबदारीबद्दल केलेले भाष्य हे बॅंकेच्या कार्यक्रमातील बॅंक चालवण्याबाबतचे होते. पण त्यावरून काही माध्यमांनी गडकरींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि गडकरी यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून आमचे नेतृत्व समंजस असल्याने असे प्रयत्न निष्पळ ठरतील, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.

लोकांना भीमा-कोरेगाव येथील स्तंभाचे दर्शन घेता यावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याबरोबरच सर्व सोयी-सुविधाही दिल्या आहेत. शांततेत होणाऱ्या पाच सभांनाही परवानगी दिली आहे. मात्र, कोणी गडबड करणार असेल तर सभेची परवानगी मिळणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

२०१९ मध्ये दुष्काळ हा राज्य सरकारपुढील सर्वात मोठा प्रश्न असेल. मार्च ते जून या काळात पाणीप्रश्न गंभीर होईल. त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय निवडणुकाही मोठा विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

धारावी क्रीडा संकुलाबाबत माहिती घेणार

क्रीडा आयुक्तांचा विरोध डावलून धारावी क्रीडा संकुलाचे खासगीकरण होणार असल्याबाबत विचारले असता, या विषयाची माहिती घेऊन उत्तर देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले..

*मोदींवर टीका करणाऱ्यांनी सूर्यावर थुंकले तर काय होते, हे लक्षात घ्या

*उद्धव ठाकरेंना योग्य वेळी, योग्य उत्तर देणार

*शिवसेनेच्या विधानांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही

*काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेशी युतीची इच्छा कायम

*शिवसेनेची उदासीनतेमुळेच अहमदनगरची सत्ता गेली

*भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि गडकरींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काहींचे प्रयत्न

*२०१९मध्ये दुष्काळ हाच सरकारसमोरील मोठा प्रश्न

विखेंना मानहानीची नोटीस!

मुंबई महापालिकेच्या विकास आराखडय़ात मुख्यमंत्री कार्यालयाने भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. जाहीर माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा, असे आपण त्यात म्हटले आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. विकास आराखडा कसा तयार होतो, याची प्राथमिक माहितीही विखे यांनी घेतली असती तर असे आरोप केले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 10:02 pm

Web Title: cm devendra fadnavis criticized uddhav thackeray for targeting narendra modi
Next Stories
1 परिवहन निरीक्षकासोबत आरटीओ एजंटची हमरीतुमरी
2 मालवाहतूक वाहने ओव्हरलोड झाल्यास होणार गुन्हा दाखल – रावते
3 सावधान! दारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित
Just Now!
X