जिल्ह्यात करोना संसर्गाच्या वाढत्या साखळीस तोडण्यासाठी प्रशासनाने अखेर संपूर्ण टाळेबंदीचाच पर्याय निवडला. त्या अनुषंगाने पुसद, दिग्रस पाठोपाठ आता यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा या चार शहरांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी आज घोषित केला. या चारही शहरांसह लगतच्या परिसरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जलैपर्यंत टाळेबदी राहणार आहे.

सध्या करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आज गुरूवारी दुपारी एक आदेश काढून यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा व नेर या चार शहरांसह लगतच्या परिसरात शनिवारपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण टाळेबंदीसह संचारबंदी घोषित केली. या काळात आरोग्य सेवा व औषधी दुकाने, शेती, शेती विषयक कामे, दूध विक्री संकलन, शासकीय कार्यालये, बँका आदी क्षेत्रांना शासनाच्या निर्देशांप्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे. बँकांचे अंतर्गत कामकाज करण्यास मुभा देण्यात आली असली तरी ग्राहकांसाठी व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसह शासकीय कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी यांनाच चारचाकी व दुचाकी वापरास परवानगी असून इतर व्यक्ती वाहनांचा वापर करताना आढळल्यास वाहन जप्त करून वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व खासगी वाहनांना प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध, गर्भवती महिला व १० वर्षांतील बालकांसह कोणत्याही व्यक्तींना या काळात वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विनाकारकण पायी फिरायला घराबाहेर पडण्यास आणि सायकल घेऊन फिरल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यासह, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भादंविच्या विविध कलमान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी बाजारपेठ सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी

शनिवारपासून सात दिवसांसाठी संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा व नेर या शहरांमध्ये नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून शुक्रवारी २४ जुलै रोजी या शहरांमध्ये दुकाने अधिक वेळ उघडी ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार या चारही शहरांमध्ये शुक्रवारी दुकानं सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेच. उर्वरित जिल्ह्यात मात्र नियमाप्रमाणे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच बाजारपेठ उघडी राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.