News Flash

फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत; काँग्रेसचं आव्हान

तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय व जीवाशी खेळ

प्रातिनिधिक फोटो

पीएम केअरमधून दिलेले व्हेटिंलेटर्स तकलादूच असून त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली आहे. भाजपा नेत्यांचं खोटं उघड पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या १७ मेच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजपा नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाली आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. जनतेच्या जीवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्वाची वाटणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे व्हेंटिलेटर सुरू करुन दाखवावे, असे आव्हान सावंत यांनी दिले आहे.

औरंगाबाद मेडिकल कॉलेज ने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे सांगितले होते. त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेस ने केंद्र सरकारने पीएमकेअर्स फंडातून महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटरची चौकशी करून कारवाई करावी अशी राज्य सरकारला मागणी केली होती. यावर राष्ट्रीय स्तरावर वादळ उठल्यानंतर १४ मेला केंद्र सरकारने त्यावर उत्तर देऊन ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा व सगळा दोष औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रूग्णालयावर टाकण्याचा प्रयत्न केला. आता केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल औरंगाबाद मेडिकल कॉलेजने केंद्र सरकारला प्रत्युत्तर देऊन केली आहे व जनतेच्या पैशाचा भयानक अपव्यय झाल्याचे उघड केले आहे, असं यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले.

काय घडलं?

औरंगाबाद मेडिकल कॉलेजने दिलेल्या या उत्तरानुसार ज्योती सीएनसी कंपनीचे ५८ व्हेंटिलेटर तकलादू निघाल्याने इतर ३७ व्हेंटिलेटर उघडून पाहण्याचे या कंपनीचे धैर्यच झाले नाही. १४ मे रोजी केंद्र सरकारने केलेली सारवासारव खोटी होती. ज्योती सीएनसीचे व्हेंटिलेटर १२ एप्रिलला आले. केंद्र सरकारने १९ एप्रिलला सांगितले हे खोटं आहे. १२ एप्रिललाच जिल्हाधिकाऱ्यांना हे वापरण्यासारखे नाहीत असा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे. १८ एप्रिलला ज्योती कंपनीच्या सहदेव मुचकुंद व कल्पेश या तंत्रज्ञांनी २५ धामण-३ हे व्हेंटिलेटर इन्सटॉल केले जे २० तारखेपर्यंत गंभीर त्रुटींमुळे परत आले. २३ ला पुन्हा तंत्रज्ञांना बोलवले पण त्यांनी दुरुस्त केलेले २ व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. त्यानंतर या तंत्रज्ञांनी तोंड दाखवलेले नाही. ६ मे व १० मे रोजी या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीने तसा अहवाल दिला आहे. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने बोंबाबोंब केल्यावर १३ व १४ मे रोजी राजेश रॉय व आशुतोष गाडगीळ हे तंत्रज्ञ आले, त्यांनी दुरुस्त केलेले २ व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले आणि नंतर त्यांनी पळ काढला आहे. यातून सदर धामण-३ व्हेंटिलेटर हे सदोष आहेत हे सिद्ध होते, असा दावा काँग्रेसने केलाय.

पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला

खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालयेही ती वापरत नाहीत. भाजपाकडून मात्र नाहक बदनामी केली जात आहे. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून केंद्र सरकारच्या १४ मे रोजी केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने हे प्रकरण दाबण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने एकत्रित याचे लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची आमची मागणी पूर्णपणे योग्य आहे हेच यातून सिद्ध झाले आहे असेही सावंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:31 pm

Web Title: devendra fadnavis and charakant patil should try their hands on ventilators given under pm cares fund says sachin sawant scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाउन कायम?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर
2 आळंदी : वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपी अटकेत
3 तौक्ते चक्रीवादळामुळे भाईंदरमधील इमारतीचा भाग खचला; ७२ जणांची सुखरूप सुटका
Just Now!
X