पंकजा यांच्या शक्तिप्रदर्शनातून फडणवीस लक्ष्य!

वसंत मुंडे, बीड

पंकजा मुंडे यांच्या ‘स्वाभिमान दिन’ मेळाव्यानंतर भाजपमध्ये अभिजन विरुद्ध बहुजन असा संघर्ष उभा राहिला आहे. एकनाथ खडसे यांचे खडे बोल, त्याला मिळणारी पंकजा मुंडे यांची साथ, व्यासपीठावर महादेव जानकर यांची उपस्थिती यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बहुजन समाजातील नेते एकत्र करण्याचा प्रयत्न म्हणून गोपीनाथगडावरील मेळाव्याकडे पाहिले जात आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी चाळीस वर्षे कष्ट करून पक्ष उभा केल्याने भाजप माझ्या बापाचा पक्ष, मी का सोडू? मी सोडणार नाही, पक्षाने निर्णय घ्यावा. मी नाराज कोणावर होऊ, असा प्रश्न स्वाभिमान मेळाव्यातून उपस्थित करून पंकजा मुंडे यांनी राज्यातील अंतर्गत धुसफुस राष्ट्रीय नेतृत्वाकडे पोहचावी, अशी व्यूहरचना केल्याचाही अर्थ काढला जात आहे.

एका मुलीने मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले तर काय बिघडले, यामुळेच माझ्या विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नाराज नेत्यांसह पंकजा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पक्षाला सूचक इशारा दिला. त्यामुळे पक्षनेतृत्व नेमकी काय भूमिका घेते, यावरच पंकजा यांचा पुढील राजकीय मार्ग ठरणार आहे.

स्थानिक राजकारणात पंकजा व आमदार विनायक मेटे यांच्यातील वाद टोकाला असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. विधानसभा निवडणुकीत पंकजा वगळता वंजारी समाजाच्या एकाही नेत्याला उमेदवारी मिळाली नाही. यामुळे पंकजा यांचे प्रदेश नेतृत्वाकडून खच्चीकरण होत असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला जनाधार मिळवण्यासाठी भगवानगडावरून ‘माधवं’ (माळी, धनगर, वंजारी)चा प्रयोग यशस्वी केला. त्यात पुढे मराठा समाजाची जोड देऊन पक्ष सर्वव्यापी केला. भाजपचा मूळ जनाधार ‘ओबीसी’; मात्र पाच वर्षांत ओबीसी नेत्यांना कायम दुर्लक्षितपणाची वागणूक मिळाल्याची भावना आता तीव्रपणे व्यक्त होऊ लागली आहे.

खडसेंसह इतर नाराजांचे बळ

पंकजा यांच्या मेळाव्याला एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, महादेव जानकर यांनी हजेरी लावून पंकजाला बळ दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील मोहीम उघडपणे तीव्र झाल्याचे दिसून आले. पंकजा यांच्या या पक्षांतर्गत बंडाकडे राष्ट्रीय नेतृत्व कसे पाहते, याकडे आता लक्ष लागले आहे. राज्यभर मशाल यात्रेतून पंकजा क्षमता सिद्ध करेल, त्या वेळी भाजपतून त्यांना कसे समर्थन मिळते, यावर त्यांचे पक्षातील स्थान निश्चित होणार आहे. मराठवाडय़ातील किती नेते त्यांना प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विदर्भातून देवेंद्र फडणवीस यांना समर्थन मिळत असताना मराठवाडय़ातील भाजपचे १५ आमदार नक्की कोणती भूमिका घेतील, हे २७ जानेवारी रोजीच्या उपोषणाच्या वेळी समजणार आहे. सध्या भाजपतील अभिजन आणि बहुजन असा संघर्षांचा भडका म्हणून या मेळाव्याकडे पाहिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही लोकांची ठरवून उपेक्षा झाली असेल कदाचित, पण या निमित्ताने व्यक्तींची उपेक्षा मनात न आणता प्रदेशाची उपेक्षा जर पुढे येणार असेल, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी कोणी घेत असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. आम्ही जनता विकास परिषद म्हणून पंकजा मुंडे यांनी मराठवाडय़ातील प्रश्नांचे नेतृत्व करावे, असे म्हटले होते. कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनाही तशी गळ घातली होती. तेव्हा पंकजा मुंडे यांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. आता या उपेक्षेच्या निमित्ताने त्या पुढे येणार असतील तर त्याचे स्वागत आहे.

– अ‍ॅड. प्रदीप देशमुख