News Flash

सांगली जिल्ह्य़ात मतदानासाठी चुरशीच्या लढतींमुळे उत्साह

जिल्ह्यातील मातब्बर राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरविण्यासाठी बुधवारी सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आर. आर. पाटील

| October 16, 2014 03:45 am

जिल्ह्यातील मातब्बर राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरविण्यासाठी बुधवारी सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आर. आर. पाटील यांचे राजकीय भवितव्य आणि भाजपाचे खा. संजयकाका यांची राजकीय ताकद ठरविणारी मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली. दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य काय हे ठरविण्याचा मतदारांचा अधिकार आता रविवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान पलूसमध्ये आणि सर्वात कमी सांगलीमध्ये नोंदले गेले. सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- मिरज ५४.०४, सांगली ५३.०२, इस्लामपूर ६५.८७, शिराळा ७१.९३, पलूस-कडेगाव ७३.४५, खानापूर ६७.२५, तासगाव-कवठे महांकाळ ६६.२१आणि जत ६२.९६.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला. मतदान केंद्रावर सर्वात प्रथम आलेल्या पहिल्या पाच मतदारांचे गुलाब पुष्प देऊन मतदान केंद्राध्यक्षांनी स्वागत केले. सकाळी जिल्ह्यातील बहुसंख्य मतदान केंद्रावर मतदारांची संख्या अल्प होती. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा क्वचित मतदान केंद्रावर लागल्या होत्या. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात सरासरी ८ टक्के मतदान नोंदले गेले होते.
तथापि, सकाळी ११ वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. मतदान केंद्रावर मत देण्यास मतदारांच्या लांब रांगा लागल्या. दुपारनंतर तर महिला मतदार आपआपल्या समूहाने मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. मतदानानिमित्त आज बाजार व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. नवमतदारांनीही आपला हक्क बजावत असताना एक वेगळे थ्रिल अनुभवायला मिळत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात २२ लाखापकी तरुण मतदारांची संख्या २१ टक्के असल्याने या तरुणाईकडे शासन कोणाचे हे ठरविण्याची ताकद असल्याचे मतदानातील तरुण मतदारांचा उत्साह सांगून गेला.
 एक हजारापासून ११०० मतदारांसाठी या संख्येनुसार मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली होती. आठ विधानसभा मतदार संघामध्ये २ हजार ३२८ मतदान केंद्रे होती.मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १० हजार १६५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आठ मतदार संघासाठी १०७ उमेदवार रिंगणात होते. यात सांगली व मिरज मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
मतदानानंतर मतदानाचे साहित्य व कर्मचारी संबंधित तहसील कार्यालय आणि निवडणूक मुख्य कार्यालयापर्यंत नेण्या-आणण्यासाठी ३८० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया अविरत व शांततेत पार पडते की नाही हे पाहण्यासाठी ७६ सूक्ष्म निरीक्षक तनात करण्यात आले होते. याशिवाय विभागासाठी स्वतंत्र पथक दर दोन तासांनी मतदान केंद्रास भेट देत होते. मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी व मदतीला गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी होते. तसेच पोलिसांचे फिरते गस्ती पथक देखरेखीसाठी स्वतंत्रपणे कार्यरत होते. मतदारांना निवडणूक आयोगाकडून मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले होते. तथापि, ज्यांना स्लीप मिळाली नसेल त्यांच्यासाठी मतदान केंद्राबाहेर मतदान स्लीप देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी होते.
जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसले तरीही ४२ केंद्रांवरील मतदान प्रक्रिया आयोगाच्या संकेतस्थळावर थेट पाहण्याची व्यवस्था वेब कॅमेऱ्याद्वारे करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडावे यासाठी ४ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तनात करण्यात आली होती. पंजाब, गुजरात, आंध्र, कर्नाटक, या राज्यातील पोलिसांबरोबरच सीमा सुरक्षा दल आणि इंडो तिबेटियन फोर्स, राज्य राखीव दल अशा आठ कंपन्या आठ मतदारसंघासाठी तनात करण्यात आल्या होत्या.
मतदारांना देण्यात आलेल्या मतदान स्लिपामध्ये गोंधळ झाल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले. महिलांच्या मतदान स्लीपवर पुरुषाचे आणि पुरुषाच्या मतदान स्लिपवर महिलांचे छायाचित्र होते. यामुळे मिरजेतील काही केंद्रांवर गोंधळ झाला. आयोगाने निर्देशित केलेल्या अन्य ११ पुराव्यांचा वापर करावा लागला.
मिरजेच्या समतानगर येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी व रसूल शेख यांना पोलिसांशी हुज्जत घातल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मतदान केंद्रामध्ये आणलेली मोटार एमएच ०९ डीए ९२०० जप्त करण्यात आली आहे.  पोलिसांनी त्यांना आक्षेपार्ह मजकूर असणारे पत्रक वाटण्यास मनाई करताच त्यांनी समतानगर येथील महापालिका शाळेतील मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी चौधरी यांना ताब्यात घेतले असून सायंकाळपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आले होते. पोलिसांशी हुज्जत घातली म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचे श्री. बनसोडे यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षा, जीप आणि सुमो मोटारीचा खुलेआम वापर करण्यात आला. बहुसंख्य उमेदवारांनी मतदारांना आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली असल्याने याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र पोलिसांच्या गस्ती पथकाला एकही वाहन आढळून आले नाही.
मतदारांची पळवापळवी करण्याचे प्रकार जिल्ह्यातील तासगाव, पलूस, जत आणि खानापूर मतदारसंघामध्ये घडले. या ठिकाणी तीव्र चुरस असल्याने काही मतदार केंद्रांवर उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले मात्र याबाबत पोलीस ठाण्यात कोणीही तक्रारी दाखल केलेल्या नाहीत.
मतदान शांततेत
कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. राजकीयदृष्टय़ा जागृत असणाऱ्या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे आव्हान होते. पण पोलीस कर्मचाऱ्यांच्या अविरत परिश्रमाने आपण हे काम सुरळीत पार पाडू शकलो असे त्यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांचे मतदान
माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोनसळ येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अंजनी येथे तर माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी साखराळे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 3:45 am

Web Title: enthusiasm in polling due to close game in sangli district
टॅग : Enthusiasm
Next Stories
1 शहराच्या मध्यभागात दुपारनंतर गर्दी
2 तृतीयपंथीयांनी प्रथमच केले मतदान
3 औरंगाबादमध्ये कचराकुंडीत स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
Just Now!
X