सोमवारी सातारा येथील दारूचे दुकान बंद करण्यावरून झालेल्या वादावादी प्रकरणावरून सातारा पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सह ७५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत . तर दुकान मालकानेही उदयनराजे भोसले व सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सोमवारी सातारा येथे शिवेंद्रसिंहराजे समर्थक नगरसेवकाचे जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात झालेल्या वादावादीवरून  दोनही राजेंसह ७० ते ७५ कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर नगरसेवक रवी ढोणे यांच्या फिर्यादीवरून उदयनराजेंसह ५ ते ६ समर्थकांवर दुकान तोडण्याची धमकी देणे, दमदाटी करणे, गर्दी, हाणामारी अशा आरोपाखाली उदयनराजे भोसले, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, केदार राजेशिर्के, महेश शिंदे, मयुर चिकणे, पद्माकर खुटाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

काय होतं प्रकरण…

शहरातील एक देशी दारूचे दुकान काढण्यासाठी नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक आले होते. हे दुकान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. पालिकेत सत्ता असल्याने पथकामागे खासदार उदयनराजे भोसलेही तिथे पोहोचले. दुकान हटवण्याच्या भूमिकेवर उदयनराजे ठाम होते. मतदारसंघात असलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ही माहिती मिळताच तेही या ठिकाणी कार्यकर्त्यांसह हजर झाले. तो पर्यंत या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व बघ्यांनी गर्दी केली. दोन्ही राजांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. हे दुकान पाडण्याचा आदेश आहे का, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी नगरपालिकेच्या पथकाला विचारला. तर उदयनराजे यांनी हे दुकान पाडाच अशी भूमिका घेतली. दोन्ही राजांच्या भूमिकेने तणाव वाढत असतानाच दोन्ही गटांचे कार्यकर्ते दाखल झाल्यामुळे तणावात भर पडली.

दरम्यान या ठिकाणी पोलीसही दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी कायदा हातात घेऊ नका आणि मला कारवाई करण्यास भाग पडू नका, असे सांगितल्यावर दोन्ही गटांनी माघार घेतली. मात्र शिवेंद्रसिंहराजे अगोदर उदयनराजेना जायला सांगा, मग मी जातो, या भूमिकेवर ठाम राहिले. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी दोघांशी चर्चा केली आणि शेवटी दोन्हीही राजे दोन बाजूला निघून गेले. त्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना व बघ्यांना किरकोळ लाठीमार करत पिटाळून लावले.