19 January 2021

News Flash

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

एकाचा मृत्यू, ८० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

संग्रहित छायाचित्र

महाड येथील काजळपुरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आठ जणांना बाहेर काढण्यात आले. एकाचा मृत्यू झाला असून, ८० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यात ४५ कुटुंबे राहात होती. दुपारनंतर इमारत खचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २५ कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. संध्याकाळी सातच्या सुमारास इमारत कोसळली. इमारतीचे वरचे तीन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

दुर्घटनेनंतर नगरपालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या साह्यने मदतकार्य सुरू करण्यात आले. आठ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना महाड येथील ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकडय़ा तात्काळ पुण्याहून महाडकडे रवाना झाल्या आहेत.

इमारतीत नेमके किती लोक अडकले असतील, हे आताच सांगता येणार नाही. माणगाव, श्रीवर्धन येथून अतिरिक्त पोलीस कुमक महाडला रवाना केली, असे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर माणगाव, रोहा, अलिबाग येथून डॉक्टरांची पथके आणि रुग्णवाहिका महाडला रवाना झाल्या. घटनास्थळावर पाच डॉक्टरांचे पथक तनात ठेवण्यात आले आहे. जखमींना रक्ताची गरज लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेसा रक्तसाठा महाड, माणगाव रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून रुग्णवाहिका महाडला पाठविण्यात आल्या आहेत.

साधारणपणे पाच वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बांधकाम व्यावयायिकांनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले होते. गेल्या काही महिन्यांपासून इमारतीला तडे जात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

इमारत दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी चर्चा केली. जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मदतकार्य वेगाने सुरू आहे. इमारत दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई करू.

– आदिती तटकरे, पालकमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:31 am

Web Title: five storey building collapsed in mahad abn 97
Next Stories
1 कांद्याचे दर वाढविण्याची व्यापाऱ्यांची खेळी?
2 सातपुडय़ात दुर्मीळ वनस्पतींचा खजिना
3 रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट
Just Now!
X