महाराष्ट्राच्या जडणघडणीचा एक साक्षीदार… ५५ वर्ष सांगोला मतदारसंघातील चार पिढ्यांचं प्रेम मिळालेले सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अर्थात सांगोलाकरांचे आबासाहेब यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधानानं सांगोलावासीयांबरोबरच महाराष्ट्राच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या. १९६२ पासून राजकारणात असलेल्या गणपतराव देशमुखांनी कधीच आमदारकीचा रुबाब मिरवला नाही. शेवटपर्यंत त्यांचं राहणीमान जनसामान्यांशी नातं सांगणारं राहिलं. आबासाहेबांच्या निधनानतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ आबासाहेबांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वचन दिलं होतं. ते शेवटचं वचन ऐकून सांगोलावासीयांना दुःख अनावर होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडणारे आणि राजकीय विचारधारेशी शेवटपर्यंत निष्ठा राखणारे शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त सांगोल्यात धडकताच मतदारसंघातील लोकांच्या अश्रुंचा बांध फुटला. त्यांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांचा ऊर भरून आला.

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी सांगोल्यातून निवडणूक लढवण्यास आबासाहेबांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांनीच निवडणूक लढवावी असं सगळे म्हणत होते. मात्र, त्यांनी भूमिका घेतली. ५५ वर्षांपासून आपल्या पाठिंशी एकनिष्ठपणे उभं राहिलेल्या कार्यकर्त्यांची समजूत आबासाहेबांनी काढली. या व्हिडीओत ते म्हणत आहेत,”गैरसमज करून घेतला आहे. निवडणुकीला उभं राहत नाही म्हणून राजकारण सोडलं असं समजू नका. शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेची सेवा करत राहणार आहे, मग आमदार असू द्या नाहीतर नसूद्या. पिढी तयार करण्याचं काम करणारच आहे”, अशी ग्वाही गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिली. हे वचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं. करोना काळातही ते लोकांना काळजी घेण्याबद्दल ते आवाहन करत राहिले.

चार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात. मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpatrao deshmukh death news ganpatrao deshmukh video ganpatrao deshmukh speech bmh
First published on: 31-07-2021 at 13:17 IST