सावंगी येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयास करोना चाचणी प्रयोग शाळेचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळा मानांकन संस्था तसेच वैद्यकीय संशोधन परिषदेने सावंगीच्या रूग्णालयास करोना चाचणी प्रयोगशाळेचा दर्जा आज बहाल केला.

सध्या सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्थेत करोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहे. या ठिकाणी दैनंदिन १२० ते १३० स्वॅब चाचणी होत आहेत. यापेक्षा जास्त संख्येने स्वॅब तपासणीसाठी आल्यास दोन दिवसांपेक्षा अधिक विलंब चाचणीचा अहवाल येण्यास लागतो. सध्या करोनाबाधितांची तसेच संशयित रूग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, बुलडाणा येथील संशयीत रूग्णाची तपासणी सेवाग्रामलाच होत असल्याने येथील प्रयोगशाळेवरील ताण वाढत होता.

आता सावंगीच्या रूग्णालयात चाचणीची सोय झाल्याने जलदगतीने तपासणी अहवाल मिळणे शक्य होईल. रूग्णालयातील प्रयोगशाळेला करोना चाचणी करण्याची मान्यता मिळाल्याने येथे दाखल रूग्णाची लगेच तपासणी शक्य होईल.तसेच,  शासनाने चाचणी किट पाठविल्यानंतर लगेच तपासणी शक्य होणार असल्याचेही रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी उदय मेघे यांनी सांगितले आहे. सर्व सोयींची तपासणी झाल्यानंतर हा दर्जा आमच्या रूग्णालयास मिळाला असून, ही अभिमानाची बाब असल्याचे मेघे म्हणाले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सावंगीत चाचण्या सुरू झाल्यास त्या ठिकाणीसुध्दा रूग्णावर लगेच उपचार करणे शक्य होणार असल्याचे नमूद केले.