सणासुदी, सुट्यांच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने तिकीट दर वाढवून प्रवाशांची सर्रास लूट करतात. प्रवाशांची अडवणूक करून अव्वाच्यासव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आता चाप लावला जाणार आहे. मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येईल असा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे, पण यापेक्षा जास्त भाडं आकारुन प्रवाशांची अडवणूक करणा-यांविरोधात आता प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार तातडीने योग्य चौकशी करण्यात येईल. संबंधित खासगी वाहनांनी जास्त भाडे आकारल्याचे स्पष्ट झाल्यास, कंत्राटी बस परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मुंबईकर १८००२२०११० या निशुल्क टोल फ्री क्रमांकावरही तक्रारी नोंदवू शकतात. ऑनलाइन तक्रारदेखील नोंदविता येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

गर्दीच्या हंगामात खासगी वाहतूकदार ग्राहकांकडून दुप्पट, चौपट भाडे वसूल करत असतात. या पार्श्वभूमीवर दाखल एका याचिकेत या वाहतुकीचे भाडे दर निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार या खासगी वाहनांना आता हंगामाच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे.