मागील २४ तासात करोनामुळे तीन मृत्यू झाल्यानंतर कोल्हापूर  जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी शनिवारी तातडीने आढावा बैठक घेतली. रूग्णसंख्या वाढत असलेल्या गावाने कडक टाळेबंदी करण्याची सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तर, पालकमंत्री सतेज पाटील यांनी करोनाचा समूह संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासात तीन करोनाबाधित रुग्ण दगावले. यामुळे करोना संसर्ग फैलावत असल्याने मुश्रीफ व पाटील या दोन्ही मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीने बैठक घेऊन करोना स्थितीचा आढावा घेतला.

१५ ऑगस्टपर्यंत गंभीर स्थिती

दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. १५ ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशी राहील. रॅपीड ॲन्टीजेन तपासणीला सुरूवात करावी. मास्क न बांधता फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. व्यक्ती करोनाबाधित असल्याचे दिसताच संबंधितावर उपचार सुरू करावेत. त्यासाठी सर्वेक्षण माहितीचा नियोजनासाठी वापर करा, अशी सूचना पाटील यांनी केली.