शिवाजी विद्यापीठाच्या गैरकारभाराचा आणखी एक फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे. डीएड(स्पेशल) सत्र-सेव्हन या प्रश्नपत्रिकेतील दुसरा भाग तब्बल दीड तास उशिराने देण्याचा पराक्रम विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केला आहे. परिणामी परीक्षेला बसलेल्या ५५० विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. शिवाजी विद्यापीठाचा गलथान कारभार थांबणार कधी आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या गलथानपणाचे अनेक किस्से चच्रेत आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना वारंवार बसूनही सुधारणा होताना दिसत नाही. बीएड स्पेशलच्या विद्यार्थ्यांना असाच त्रास डेव्हलपमेंट टिचिंग अ‍ॅण्ड लìनग प्रोसेस या विषयाच्या पेपरवेळी झाला. या प्रश्नपत्रिकेचे दोन भागामध्ये विभाजन झाले आहे. भाग १ व भाग २ अशा स्वरूपाच्या पेपरचे सेट तयार करण्यात आले होते. तथापि परीक्षा विभागातून एकाच लिफाफ्यात भाग १ ची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली ती जेव्हा तीन जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रांतील ५५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा एकच हलकल्लोळ माजला.
विद्यार्थ्यांना भाग २ ची प्रश्नपत्रिका मिळालेली नव्हती. ही बाब विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधला त्यावर सुस्त विद्यापीठ प्रशासनाला जाग आली. विद्यापीठाने भाग २ ची हस्तलिखित प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारा संबंधित महाविद्यालयांना पाठविली. यामध्ये तब्बल दीड तासाचा कालावधी निघून गेल्याने विद्यार्थ्यांना कमालिचा मानसिक त्रास सहन करावा लागला. इतका सारा गलथानपणा करूनही विद्यार्थ्यांचे नुकसान न झाल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे.