मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे. या आंदोलनाचा औरंगाबादमध्ये भडका उडाला. वाळूज एमआयडीसीमध्ये आंदोलनकर्त्यांनी कंटेनर पेटवला. तसेच तीन-चार कंपन्यांमध्ये तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. वाळूजमध्ये पोलिसांनी कुमक मागवली.

औरंगाबादप्रमाणेच पुण्यातही बंदला हिंसक वळण लागले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक आणि कोथरूड परिसरात पोलिसांना आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. चांदणी चौकात पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठी चार्जही करावा लागला. हा लाठीचार्ज झाल्यावर आंदोलकांनी काही काळ पुणे बेंगळुरू महामार्गही रोखून धरला होता. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडीही फोडण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. नांदेडमधील आय.टी. आय. परिसरात सत्यप्रभा या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. हे वृत्तपत्र अशोक चव्हाण यांच्या मालकीचे आहे. या ठिकाणी मोठा जमाव आला त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक झाली. याच भागात असलेल्या दै. पुढारी कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली.

तर हिंगोलीतही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. सेनगाव या ठिकामी शाळेच्या प्रांगणात असलेली मिनी स्कूल बस आणि एक खासगी वाहन जाळण्यात आले. हिंगोलीतली बाजारपेठ दिवसभर बंद होती.