करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील सर्वात मोठी व्यवस्था मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अल्पकाळात उभारली गेली आहे. राज्यात दौरे करत फिरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम एकदा डोळ्याखालून घालावे. हे भव्य काम पाहून त्यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये लगावला.

साधारण महिन्याभरापूर्वीही हसन मुश्रीफ यांनी अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर सरकारने केलेली मदत तोकडी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ज्यावर देवेंद्र फडणवीस यांन अध्यात्मिक पुस्तकं वाचावीत म्हणजे त्यांना मनःशांती मिळेल असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा ठाकरे सरकार ज्या प्रकारे काम करतं आहे ते पाहून माजी मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होतील असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी करोना निवरणाबाबत चर्चा केली असता त्यांनीऑगस्ट पर्यंत लस संशोधन होइपर्यंत मुंबईतील संसर्ग आटोक्यात आणण्याची ग्वाही दिली आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. राज्यात ४० हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीची मुदत संपलेल्या गावांमध्ये प्रशासक नेमणार असून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.