मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसात याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या समितीला दिले.

ट्विट करुन याबाबत माहिती देताना राऊत म्हणाले, “मुंबई आणि परिसरातील वीजपुरवठा खंडीत घटनेची चौकशी तसेच तांत्रिक लेखापरीक्षण करुन उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक, लेखापरीक्षण समिती नेमण्यात येणार असून याबाबत शासन निर्णयही जाहीर झाला आहे. तसेच सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं होतं. त्यामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं होतं. मात्र, यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.