शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन जर रिफायनरीचं समर्थन करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं जायचं व मिळेल ते हाती घेऊन त्या सगळ्यांची थोबाडं रंगवण्याचं काम शिवसैनिकांनी करायचं आहे. अशा शब्दात नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे आज पाहायला मिळाले.

नाणार रिफायनरीच्या विरोधात कात्रादेवीवाडी येथील एका मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, अशोक वालम आदींची उपस्थिती होती.

खासदार राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा याअगोदरच केलेली आहे. गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत व ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, नाणार रिफायनरी प्रकल्प गाडलेला आहे, तो परत कोणी उकरुन काढण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, काहीही झालं तरी नाणार होणार नाहीच, अशी भूमिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज स्पष्ट केली.