महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला, हा प्रयोग एक अपघात होता असं मला मुळीच वाटत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्रात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये शिवसेनेला कायम बाजूला ठेवलं गेलं. लोकांनी त्या पाच वर्षांच्या काळात भाजपाचं सरकार काय असतं तेच अनुभवलं. निवडणूक प्रचारातही ‘मी पुन्हा येईन’च्या घोषणा दिल्या गेल्या. मात्र हा चेष्टेचा विषय झाला कारण कोणत्याही नेत्याने, राज्यकर्त्याने जनतेला गृहित धरायचं नसतं. असं म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- १०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही? शरद पवार म्हणतात…

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत तीन भागांमध्ये होणार आहे. आज या मुलाखतीचा पहिला भाग पार पडला. या भागात शरद पवार यांना संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदललं त्याकडे तुम्ही कसं पाहता? तीन पक्ष एकत्र येण्याचा प्रयोग अपघात होता की ठरवून केलेला प्रयोग? हा प्रश्न विचारला. या प्रश्नाला शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं.

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा- बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाशी सुसंगत कधी वाटलीच नाही : शरद पवार

शरद पवार म्हणतात, “भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेला कायमच गप्प कसं करता येईल? बाजूला कसं काढता येईल? याचाच विचार झाला. ही भूमिका सातत्याने घेतली गेली. त्यामुळे सरकारमध्ये असून शिवसेना अस्वस्थ होती. महाराष्ट्रातल्या जनतेने त्या काळात खऱ्या अर्थाने भाजपाचीच सत्ता पाहिली. याआधी मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाही भाजपा हा पक्ष सत्तेत होता. मात्र तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. त्याचं महत्त्वाचं कारण त्यावेळी सरकारचं नेतृत्त्व शिवसेनेकडे होतं. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी भक्कमपणे सरकारच्या पाठिशी होते. मात्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेला जवळपास बाजूला केलं गेलं. यापुढे भाजपाच्या नेतृत्त्वातच राज्य चालणार ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला रुचली नाही. मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. एक तर असं आहे की कोणत्याही राज्यकर्त्याने, नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. या घोषणेत कुठेतरी एक दर्प आहे हे जनतेला कळलं. त्यामुळे जनतेने भाजपाला धडा शिकवायचं ठरवलं” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्यानंतर पुढे काय घडलं ते महाराष्ट्राला ठाऊक आहेच.

आणखी वाचा- …तर भाजपाला महाराष्ट्रात १०५ ऐवजी ४०-५० जागाच मिळाल्या असत्या : शरद पवार

शरद पवार यांनी या मुलाखतीत विविध प्रश्नांना अत्यंत दिलखुलासपणे उत्तरं दिली आहे. आता शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जो टोला लगावला आहे त्याला फडणवीस काही उत्तर देतील का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे.