धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याने राज्यात भाजपाचे सरकार आले. आता आचारसंहितेपूर्वी तातडीने आरक्षण द्यावे, अन्यथा पुढील निवडणुकीत तुमच्या सरकारचे पानिपत करु, असा इशारा धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.

प्रकाश शेंडगे यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमचे सरकार आल्यास धनगर समाजाला आरक्षणाचे देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, आता तेच मुख्यमंत्री यासंदर्भात केंद्रीय आयोगाकडे शिफारस करु असे सांगत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग केला, अशा शब्दात शेंडगे यांनी सरकारवर टीका केली.

सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात कोणतीही पावले उचलली नाही. धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सचा (टीस) जो अहवाल आला तो देखील सरकारने लपवून ठेवल्याचा आरोप शेंडगे यांनी केला.

आगामी निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे दिसते. मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर धनगर समाजासही न्यायालयात टिकेल अशा ठोस तरतुदींसह आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातच दिली होती. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्रीय आयोगाकडे शिफारस करण्याचे आश्वासन रविवारी त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शेंडगे यांनी ही टीका केली.