मोहन अटाळकर, अमरावती

यंदा उन्हाळ्यात ४५-४६ अंश सेल्सिअसवर गेलेले तापमान, खालावलेली भूजल पातळी, उपाययोजनांचा अभाव यामुळे विदर्भातील सुमारे तीस हजार हेक्टरवरील संत्र्याच्या बागा वाळल्या आहेत. मोठय़ा मेहनतीने तयार केलेली संत्र्याची झाडे एकाएकी वाळल्याने कष्ट आणि पैसाही वाया गेला आहे. नुकसानभरपाईविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. फळपीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल, याचा अंदाज आलेला नाही. शेतकऱ्यांसमोर या बागांच्या पुनुरज्जीवनाचे आव्हान उभे ठाकले आहे.

अमरावती जिल्ह्य़ातील १४ हजार हेक्टर आणि नागपूर जिल्ह्य़ातील ५ हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे वाळल्याचे सरकारी आकडेवारीतूनच स्पष्ट झाले आहे, पण झालेले नुकसान यापेक्षाही अधिक आहे.

विदर्भात यंदा भीषण पाणीटंचाई आहे. तापमान आणि पाण्याअभावी यंदा अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी, वरुड, तिवसा व अन्य तालुक्यांतील बहुतांश संत्रा बागा जागेवरच वाळल्या. यापूर्वी कधीही पाण्याअभावी इतक्या मोठय़ा प्रमाणात बागा सुकल्या नाहीत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात १४ हजार हेक्टर मधील संत्रा बागा पाण्याअभावी सुकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विदर्भातील संत्रा पट्टय़ात असमाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी कोरडय़ा पडल्या. अनेक शेतकऱ्यांनी विंधन विहिरी तयार केल्या. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक भागामत पाचशे ते सहाशे फूट खोल असलेल्या विंधन विहिरींनाही पाणी नव्हते त्यामुळे संत्रा बागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांजवळ असलेला शेवटचा पर्यायसुद्धा संपला. अनेक शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणूनही बागा वाचवण्याचा प्रयत्न केला. सर्वच उपाय संपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर १० ते २० वर्षांची झाडे जागेवरच वाळली. लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या संत्रा झाडांचे महिना-दोन महिन्यांत सरपण झाल्याचे विदर्भात सर्वदूर चित्र आहे.

दर्जेदार संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मोर्शी, वरुड भागात यंदा पाण्याच्या दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचली. याशिवाय तिवसा, चांदूर बाजार, नागपूर जिल्ह्य़ातील काटोल, कळमेश्वर व अन्य भागातही संत्रा बागा अक्षरश: भाजल्या गेल्या आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी पाच ते सात वर्षांपासून संगोपन केलेल्या संत्रा बागाच आता उरल्या नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे झाले आहे.

अर्थकारणाला फटका

अमरावती जिल्ह्य़ातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा बागा आहेत. एकटय़ा वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. मोर्शी, वरूड भागात हजारो हातांना काम देणारी संत्र्याची बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. या भागात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू मध्यम सिंचन प्रकल्पांमधून सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली. तथापि, यंदा संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटल्या, बोअर कोरडे पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ दोन ते पाच टक्केच जलसाठा शिल्लक आहे. वाढलेले तापमान आणि प्रचंड पाणी उपशाने खालावलेली भूजलपातळी यामुळे संत्रा बागा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले. कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आता कुठे कृषी सहाऱ्यांकडून संत्र्याखालील क्षेत्राच्या नुकसानीच्या नोंदी घेणे सुरू केले आहे.

संत्राबागा जगविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यास शेतकऱ्यांना अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी आता शेतकरीच करू लागले आहेत. संत्राबागा जगविण्याच्या धडपडीतून शेतकऱ्यांना बंदी असतानाही विंधन विहिरी खोदण्यास उद्युक्त करणाऱ्या यंत्रणेवर जरब बसविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने अद्यापही या भागातील पाणीटंचाईचे भय संपलेले नाही. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जीव कासाविस झाला आहे. गेल्या दोन वर्षांत पुरेसा पाऊस झालेला नसल्याने जमिनीत पाणीच मुरले नाही. त्यामुळे भूजल पातळी घटून पाण्यासाठी धावाधाव जनतेला करावी लागत आहे. लाखो रुपये झाडांच्या मशागती, देखभाल, दुरुस्तीवर खर्चून अपेक्षित उत्पन्न पदरात पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर वाळलेली झाडे हताशपणे पाहण्याची वेळ आली. आता नव्याने संत्रा लागवड केल्यानंतरही उत्पादनासाठी पाच ते सहा वर्षे शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे.

संत्रा बागांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे. त्यात कोणत्याही सलग तीन दिवसांत ३९.५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास प्रतिहेक्टरी १९ हजार २५० रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण कालवधीत महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसानभरपाई अंतिम केली जाते. याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल, याची उत्सुकता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताकाळात संत्रा उत्पादकांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आतादेखील मदत मिळावी, अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

संत्रा बागा वाचवण्यासाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. गाव तिथे तलाव ही योजना राबविल्यास शेतकऱ्यांची पाण्यासाठी होणारी तगमग थांबेल. संत्र्याच्या झाडांना पाण्याचा ताण आवश्यक असतो, तसेच योग्यवेळी पाणीही अत्यावश्यक असते. यंदा अतिउष्णतामानाने संत्रा बागा अक्षरश: होरपळून गेल्या. शेतकऱ्यांना बागांच्या विम्याविषयी कोणत्याही प्रकारची माहितीच पुरवली जात नाही. संत्र्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे सर्वंकष विमा योजना हवी. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा आहे.

– अमिताभ पावडे, कृषीतज्ज्ञ, नागपूर.