राज्याची आर्थिक स्थितीबद्दल बोलताना सरकार हातावर हात धरुन गप्प बसलेलं नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना “त्यामुळेच सगळं काही संपलं आहे असा विचार करण्याची गरज नसल्याचे सांगत राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी राज्याची आर्थिक घडी पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे बसवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत हे सांगितलं. याचवेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या एका सल्ल्याबद्दलही खुलासा केला.

“राज्याची अर्थव्यवस्था तितकीशी चांगली नाहीय. मात्र अर्थव्यवस्थेचं संकट केवळ आपल्या राज्यापुरतं नाहीय. हे देशावरच आणि जगावरील आर्थिक संकट आहे. अनेक देश तर असे आहेत जिथे भूकबळी जातील अशी अवस्था निर्माण झाली आहे. महाराष्ट्र कायमच आर्थिक बाबतीत देशामध्ये पुढं राहिलेलं राज्य आहे. कोट्यावधी लोकांना रोजगार देणारं राज्य आहे हे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली तर देशाची आर्थिक परिस्थिती डळमळीत होईल यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

नक्की वाचा >> “त्यांनी त्यांचा महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला असल्याने ते…”; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

“तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते…”

उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाला उत्तर देताना अगदी पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेपासून महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. त्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या संवादादरम्यान त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही कोणीही अशी एखादी योजना जाहीर करु नका की जिच्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण निर्माण होईल. सवंग लोकप्रियतेच्या अट्टाहासापायी उगच काहीतरी सूट दिली वगैरे असं जाहीर करु नका, कारण जशी तुमची (राज्यांची) परिस्थिती आहे तशीच आमची (केंद्राची) पण आहे. ही जागतिक अडचण आहे. पण या सर्व कालावधीमध्ये आपण सर्व मिळून प्रयत्न करत आहोत. गेल्या महिन्यामध्ये काही जगतिक कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर आपण करारांवर सह्या केलेल्या आहेत. त्यामधून महाराष्ट्रात १६ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सगळीकडे रिव्हर्स गेअर टाकला गेलेला आहे. त्या रिव्हर्स गेअरमध्येही आपल्याकडे गुंतवणूक येत आहे. त्यामुळे सर्व काही संपलं आहे किंवा संपणार आहे अशी परिस्थिती नाहीय. हा सध्याचा काळ हा आणीबाणीचा आणि अतीतटीचा आहे. या कालावधीमधून सर्वांना बाहेर काढणं आणि सावरणं अत्यंत महत्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावा लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राज्यामध्ये ५० हजार उद्योगधंदे सुरु

राज्यातील अनेक भागांमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचेही उद्धव ठाकरेंनी यावेळेस स्पष्ट केलं. मात्र दाट लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याबद्दलचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. “राज्यामध्ये जवळजवळ ५० हजाराच्या आसपास उद्योगधंदे सुरु झाले आहेत. बाकीही उद्योगधंदे लवकरच सुरु होणार आहेत. मात्र मुंबई, पुणे जो पट्टा आहे तिथे प्रादुर्भाव जास्त आहे. यामागील कारण म्हणजे येथील लोकवस्ती अधिक आहे. अधिक लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तिथे लॉकडाउन असून हा सर्व भाग औद्योगिक पट्टा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्रामधील इतर भागांमध्ये जेव्हा ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे झोन केले तेव्हाच उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटी यासंदर्भातील परवानग्या देण्यात आल्या. आता यामध्ये ऑरेंज झोन म्हणजे एखाद्या जिल्ह्यात ठराविक भागामध्ये प्रादुर्भाव आहे आणि आजूबाजूला सर्व काही व्यवस्थित आहे तर आपण अशा ठिकाणी उद्योगधंदे सुरु करण्यास मुभा दिली. ग्रीन झोनमध्येही उद्योगधंदे सुरु झाले आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “ग्रामीण भागांमध्ये पावसाळ्यात करोना केंद्र सुरु करायची असतील तर…”

“उद्योगधंद्यांबरोबरच सरकारी स्तरावरही सुरु आहेत कामं”

उद्योगधंदे सुरु होण्याबरोबरच सरकारी स्तरवारही बरेच काम सुरु करण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.  “सरकारची जी कामं आहेत, यामध्ये अगदी रस्ते, धरणं, कोस्टल रोड, ग्रामीण भागातील कामं, कापूस खरेदी आणि दुधासंदर्भातील कामांनाही परवानग्या दिलेल्या आहेत. दुध खऱेदी आपण ३१ तारखेपर्यंत करत आहोत. मक्याचीही खरेदी केली जात आहे. ज्यांचे बियाणे बोगस निघाले त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून देत आहोत. हे सर्व आपण करत आहोत. आपण हातावर हात धरुन गप्प बसलेलो नाही. साधारणपणे १६ हजार कोटींचे करार आपण केलेले आहेत. एमओयू केले म्हणजे ही प्राथमिक अवस्था असते. आता पुढची बोलणी सुरु आहेत. त्याचबरोबर नवीन काही हजार कोटींची एमओयूंच्या माध्यमातून गुंतवणूक राज्यांमध्ये आणली जाणार आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. एमओयू म्हणजेच सामंजस्य करार ज्याला इंग्रजीमधून मेमोरंड ऑफ अंडरस्टॅण्डींग असं म्हणतात.