संबंधित यंत्रणांची चर्चा; मार्ग काढण्याचा प्रयत्न; बाजार समितीत स्वच्छतेच्या उपाययोजनांची मागणी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी मार्केटमधील  व्यवहार येत्या दोन दिवसांत सुरळीत सुरू करण्याची हमी सरकारने दिली आहे.  त्याला यश आले तरच राज्यातील बाजार समित्यांच्या आवारातील भाजीपाला व फळांचे लिलाव सुरळीत सुरू होतील. त्याचबरोबर शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा फटका शेतकरी व ग्राहक या दोघांना बसला आहे.  शेतात असलेला भाजीपाला व फळे हे विक्रीसाठी नेता येत नाहीत. ते सडून चालले आहेत.  तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना भाजीपाला व फळे मिळत नाहीत. अव्वाच्या सव्व्वा किमती त्यांना आकारल्या जात आहेत.  शेतातील भाजीपाला व फळे विकायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.  पणन मंडळाचे अधिकारी तर पुरते गोंधळून गेले. बाजार समित्यांनी परस्पर बंद पुकारले. आता काहींनी व्यवहार सुरू केले. पण मुख्य अडसर हा मुंबई बाजार समितीचे व्यवहार सुरळीत होण्याचा आहे. आज सरकारने व्यापारी, अधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी, पोलीस, महापालिका अधिकारी यांची बैठक घेतली. उद्या गुरुवारी सायंकाळपर्यंत उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर वाशी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

शेतमाल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणता आलेला नाही. भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असल्याने पोलिसांनी अनेकांना चोप दिला त्यातून ग्राहक, विक्रेते सुटले नाही. आजपासून सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत श्रीरामपूर व नगर बाजार समितीच्या आवारात लिलाव झाले. पण किरकोळ विक्रेत्यांना माल विकता येत नसल्याने त्यांनी खरेदी मर्यादित केली.

बाजार समित्यांच्या आवारात लिलाव सुरू झाले की किरकोळ ग्राहक हे देखील माल खरेदीला येतात. मंडई बंद केल्याने त्यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यात आडते, शेतकरी, हमाल, घाऊक विक्रेते, वाहन चालक, मापाडी आदी मिळून लहानातल्या लहान बाजार समितीत किमान दोन हजार तर नाशिकसारख्या मोठय़ा बाजार समितीत किमान चार ते पाच हजार लोक जमा होतात.  हे चित्र बदलण्यासाठी सरकार, पणन मंडळ, बाजार समित्या, पालिका व महापालिका, कृषी विभाग यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबईला पुरवठा

नाशिक, नगर, श्रीरामपूर, पुणे तसेच कोल्हापूर ,सोलापूर, सातारा, सांगली या भागातून मुंबईला भाजीपाल्याचा पुरवठा होतो. नाशिक बाजार समितीच्या आवारात भाजीपाला लिलाव होतात. तेथून सर्वाधिक भाजीपाला गुजरात व मुंबईत जातो. गुजरातमधून वाटाणा, गाजर, काकडी, मध्यप्रदेशातून येथे बटाटा, लसूण, गाजर तर बुलढाणा येथून मिरची येते. पण राज्यबंदी व जिल्हाबंदी असल्याने मालाची आवक व जावक बंद पडली आहे.

शेतकऱ्यांकरिता काय केले पाहिजे?

बाजार समित्यांच्या आवारात शेतमाल लिलावासाठी दोन तासांचा वेळ अपुरा पडतो. त्याऐवजी चार तासांचा कालावधी दिला पाहिजे. आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस त्रास देतात. त्यांना कृषी विभागाने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना व शेतकऱ्यांना पास दिले पाहिजेत. त्यामुळे मालाची वाहतूक करणे सोपे जाईल. आवारात वाहने आल्यानंतर वाहनतळ व्यवस्था, मालाची हाताळणी योग्य कालावधीत होईल याची दक्षता घ्यावी. व्यापारी जर थेट शेतात माल खरेदी करणार असेल तर त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. घाऊक विक्रेत्यांना प्रोत्साहन द्यावे. अशा शेतकऱ्यांची यादी तयार करावी.

बाजार समितीने काय उपाययोजना करावी

बाजार समितीत गर्दीचे नियोजन करावे, मास्क, सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था करावी. हमाल, व्यापारी, मापाडी यांना करोना विषाणुचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी गर्दीचे नियंत्रण करावे. आरोग्य विभागाचे पथक सकाळी तैनात करावे. ज्याच्याकडे पास नाही त्यांना आवारात येण्यास बंदी करावी.

विक्रेत्यांना माल विक्रीसाठी सुविधा

घाऊक विक्रेत्यांना माल विक्रीसाठी कालावधी वाढवून द्यावा, हमालाची कमतरता असेल तर वखार महामंडळ, बियाणे महामंडळ व अन्य खासगी क्षेत्रांतील हमाल उपलब्ध करून द्यावे. शहरात वाहन नेण्यास परवानगी द्यावी, त्याकरिता खास पास द्यावेत, किरकोळ विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा निष्टिद्धr(१५५)त कराव्या, त्यात योग्य अंतर असावे. पालिका व महापालिका यांनी त्यांना परवाने द्यावे. किराणा दुकानासमोर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी द्यावी. सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास अवधी द्यावा.

शेतमाल  वाहतूक सुरळीत करावी

अनेक गावांनी रस्ते बंद केले आहेत. गावातील पुढाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बंद केलेले रस्ते शेतमालाच्या वाहनांसाठी खुले करावे. या वाहनांना बाजार समित्या पत्र देतात. त्याऐवजी त्यांना गावातच वाहतूक पास मिळावे. पोलिसांनी काचा फोडणे, वाहन चालकांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार बंद झाले पाहिजे.

नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. पण मुंबईचे वाशी मार्केट बंद आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. दर कोसळले आहेत. वाशी बाजार सुरळीत करावा, व्यापारी, हमाल व किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत येता येत नाही. त्याकरिता सुविधा द्यावी. भाजीपाल्याच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी विशेष उपाययोजना करावी. करोनाची भीती असल्याने अनेक उपाययोजना कराव्यात.

जगदीश अपसुंदे, व्यापारी संचालक, नाशिक बाजार समिती.

वाशी बाजारात होणाऱ्या गर्दीचे नियोजन सरकारने करावे, लिलावाच्यावेळी योग्य अंतर राखले जावे, प्रत्येकाच्या आरोग्य तपासणीची सोय हवी, मास्क, सॅनिटायझर व अन्य सुविधा द्याव्या, हमाल, व्यापारी , घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत येण्यासाठी सुविधा हवी, माल वाहतूक व्यवस्था करावी किंवा त्यासाठी परवानगी द्यावी, बाजार समितीचे आवार स्वच्छ व र्निजतुक करावे आदी अनेक प्रश्न आहेत. आजच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. उद्यापर्यंत मार्ग काढण्याचे सरकार, बाजार समिती व प्रशासनाने आश्वासन दिले आहे. त्यानंतर लिलाव सुरू केले जातील.

शंकर पिंगळे , संचालक, भाजीपाला विभाग, वाशी बाजार समिती, मुंबई

संचारबंदीमुळे बाजार बंद आहेत. ते सुरळीत करण्यासाठी महसूल आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यातून मार्ग निघेल.

बी.जे.देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे