राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू झाले असून हा अंतर्गत मतभेदाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संघटनेला कितपत यश मिळते यावर पुढील भूमिका अवलंबून आहे. सध्या तरी दोघांकडूनही संघटनेतील कार्यकर्त्यांची गडबांधणी सुरू केली आहे. यावादात कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

राज्यमंत्री खोत यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यावरून खा. शेट्टी यांनी तोफ डागत संघटनेने आदेश दिल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावे लागेल असा संदेश दिल्यानंतर राज्यमंत्री खोत यांनीही जशास तसे उत्तर न देता सरकारचे काम चांगले आहे, मला मित्र पक्ष म्हणून प्रचाराला जावे लागेल असे सांगत आढेवेढे घेण्याचे धोरण अवलंबले आहे. खोत यांनी केवळ संघटनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा असा अप्रत्यक्ष सल्ला खा. शेट्टी यांनी दिला होता.  जिल्ह्य़ात १५ ठिकाणी संघटनेचे उमेदवार संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. मात्र एकाही ठिकाणी खोत आजपर्यत प्रचाराला गेलेले नाहीत.

सध्या तरी राज्यमंत्री खोत यांनी भाजपा शासनाची स्तुती सुरु ठेवली असून शेट्टी मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत गंभीर नसल्याचे सांगत जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागेल असे सांगत आहेत. यातून दोघांमध्ये असलेला विसंवाद अधोरेखित होत आहे.

भाजपाने निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना प्रमुख प्रचारक केले आहे. नजीकच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा ग्रामीण ढंगातील प्रचारक अशी भूमिका खोत यांच्या वाटय़ाला देण्याचे भाजपाचे नियोजन यावरून दिसत आहे.

उत्तर काय देणार?

भाजपाने स्वाभिमानीला आमदारकी व मंत्रीपद हे मागून दिलेले नाही, पशिश्चम महाराष्ट्रात मिळालेल्या मतांची ही किंमत आहे. राज्यमंत्री खोत यांनी राजवस्त्रे परिधान केली म्हणून संघटनेच्या मूळ गाभ्याचे विस्मरण केले तर संघटनेचे धोरण बासनात गुंडाळल्यासारखे होईल आणि प्रस्थापित नेतृत्व आणि संघटना यामध्ये काय फरक, असा सवाल उभा राहिला तर काय उत्तर देणार असा सवाल संघटनेतील जेष्ठ कार्यकत्रेच उपस्थित करीत आहेत.