धवल कुलकर्णी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आपली नापसंती दर्शवत पुस्तक बाजारात येऊ देऊ नये अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवराय यांचे वंशज असलेले संभाजी राजे हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार आहेत आणि भाजपाचे सदस्य सुद्धा आहेत. “मोदींबाबत आदर आहे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत  त्यांची तुलना व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याची खबरदारी घ्यावी की हे पुस्तक बाजारात येणार नाही. याचे कारण याचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाले आहे,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

त्याच वेळेला त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट बाबत नापसंती दर्शवली. राऊत यांनी याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या संभाजीराजे आणि सातार्‍याच्या गादीचे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी ह्या बाबत भूमिका घ्यावी असे म्हटले होते. संभाजीराजे म्हणाले की त्यांनी या विषयावर जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात आपली भूमिका मांडल्यानंतर साधारणपणे दोन तासांनी राऊत त्यांनी या विषयावर ट्विट केला होता. राऊत यांनी जबाबदारीने लेखन केले पाहिजे त्यांनी तसे न केल्यामुळे माझ्यासारखा संयमी माणूसही चिडला आहे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. चर्चा व्हावी ती पुस्तकाबाबत आणि बाजारात न येऊ देण्याबाबत, या विषयात राजकारण करायला नको असे आवाहन त्यांनी केले.