वाई: करोना रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या देयकांबाबत सातारा जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून नेमणूक केलेल्या पथकांकडून १ हजार ११२ करोना बाधितांच्या उपचारांच्या देयकांची तपासणी केली असता १२२ जणांची देयके (बिल) अवाजवी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. या १२२ रुग्णांकडून ३३ लाख ९४ हजार ८५६ रुपये जास्तीचे आकारण्यात आलेली रक्कम त्यांना परत करण्यात आली.

करोना ( कोविड- १९ ) बाधित रुग्णांना रुग्णालयांकडून वाजवी पेक्षा जास्त देयक घेतले आहे, अशी तक्रार असलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाद्वारे नोडल अधिकाऱ्याची नेमणूक साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांनी उपचार घेऊन घरी गेलेल्या १२२ करोना बाधित रुग्णांकडून ९६ लाख १० हजार ७७० रुपये आकारण्यात आले होते. या पथकाकडून १२२ करोना बाधितांच्या देयकांमध्ये जादा आकारण्यात आलेली तब्बल ३३ लाख ९४ हजार ८५६ इतकी रक्कम कमी करुन ही रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने विविध खासगी रुग्णालये कोराना आजारावर उपचार करण्यात येत आहेत. परंतु या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारे देयक हे शासनाने निर्धारित केलेल्या दरांप्रमाणे देण्यात येते की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून रुग्णालयनिहाय देयकाच्या तपासणीसाठी पथक तयार करुन प्रत्येक पथकात एक नोडल अधिकारी व एका ऑडीटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. विविध रुग्णांलयाकडून १२२ करोना बाधितांकडून ९६ लाख १० हजार ७७० रुपये आकारण्यात आलेले होते.

यापुढेही रुग्णालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या पथकांकडून करोना बाधितांवर केलेल्या उपचारांच्या देयकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.