केंद्र व राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच कोकण रेल्वेत कोकण दिसत नाही; त्याकरिता कोकण रेल्वेला स्वतंत्र झोनचा दर्जा द्यावा आणि स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. त्यासाठीच कोकण रेल्वे कामगार सेनेचा लढा सुरूच राहील. सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन टर्मिनल करण्यासाठीच या ठिकाणी जमीन संपादित केलेली असल्याने तो दर्जा मिळेल असे कोकण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस मिलिंद तुळसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकण रेल्वे कामगार सेनेचे वार्षिक अधिवेशन सावंतवाडी-मळगाव रोड स्टेशनजवळील राधाकृष्ण मंगल हॉलवर झाले. तत्पूर्वी मिलिंद तुळसकर पत्रकार परिषदेत बोलत होते.  या वेळी कोकण रेल्वे एम्प्लॉइजचे अध्यक्ष सुभाष माळगी, उपाध्यक्ष गणेश पार्टे, सरचिटणीस पी. रवींद्रनाथ, जामसिंग देशमुख, गिरीश सावंत, हरेश जनक, अनंत वेदन, श्री. पुरतकर, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.  कोकण रेल्वे कामगार, प्रवासी यांच्या हितासाठी कोकण रेल्वे कामगार सेना काम करीत आहे. कामगारांच्या आयुष्यात आर्थिक बळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून ६५० ट्रॅकमनपैकी ३०० कामगारांची भरती झाली असून नव्याने ३५० कामगारांची भरती सुरू आहे. तसेच ११० जणांना उच्च श्रेणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्ट सेप्टी माणसाला ग्रेड वाढवून दिली, असे मिलिंद तुळसकर म्हणाले.
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. कोणतीही योजना किंवा कोकण रेल्वेच्या विकासाला चालना दिली नाही. त्यामुळे कामगार सेना वेळप्रसंगी लोकसभा निवडणुकांनंतर आंदोलन पुकारील असे मिलिंद तुळसकर म्हणाले. चिपळूण-कऱ्हाड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास सन २००७ मध्ये मान्यता मिळाली. पण या बजेटमध्ये काहीच तरतूद नाही. कोकण रेल्वेमार्ग विद्युतकरणाने जोडण्यास बजेटमध्ये तरतूद नाही. प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य नाही. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालय सावत्रपणाची वागणूक कोकण रेल्वेला देत आहे. महाराष्ट्रात मध्य रेल्वे व कोकण रेल्वे आहे, पण महाराष्ट्र सरकारचे धोरण कोकण रेल्वेवर अन्याय करणारेच आहे, असे मिलिंद तुळसकर व सुभाष माळगी यांनी बोलताना सांगितले.
प्रवासी व माल वाहतूक वाढत आहे, त्यामुळे कोकण रेल्वेचा विस्तार दुपदरीकरणाचा व्हावा अन्यथा नवीन लाइन करून सुविधा द्यावी. कोकण रेल्वे कामगार, प्रवासी, माल वाहतुकीसाठी केंद्राने प्रयत्न करायला हवेत. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाल्याने रेल्वे पर्यटन सुविधा व एस.टी. विभागाने सेवा देऊन पर्यटनासाठी हातभार लावावा, असे सांगून लवकरच जनसाधारण तिकीट एजंट नेमले जाणार आहेत, असे मिलिंद तुळसकर म्हणाले.
कोकण रेल्वेच्या स्टेशनवरून एकही रेल्वे सुरू होत नाही. त्यासाठी भारतीय मध्य रेल्वे स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. मध्य रेल्वे प्रशासन कोकण रेल्वेला सहकार्य करीत नाही. त्याकरिता कोकण रेल्वेला स्वतंत्र झोनचा दर्जा व आर्थिक तरतूद करावी तरच कोकण रेल्वेत कोकण दिसेल, असे मिलिंद तुळसकर म्हणाले.
कोकण रेल्वेचे स्वत:चे कोच नाहीत, ते भाडय़ाने घ्यावे लागतात. कोकण रेल्वे स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. कोकणातील स्थानकावर रेल्वेत पाणी भरणे, दुरुस्ती अगर कोच स्वच्छता, सुविधा निर्माण व्हायला हव्यात. टर्मिनल सावंतवाडीत होण्यासाठी जमीन संपादित आहे, असे मिलिंद तुळसकर म्हणाले.
कोकण रेल्वे किफायतशीर व्हायची असेल तर मंगलोर व जयगड बंदरे जोडली जावीत. रेल्वेची जमीन आहे तेथे दुपदरीकरण करणे, कोकण रेल्वेला बजेटमध्ये तरतूद करता येत नसेल तर पीपीएसची गुंतवणूक करणारी योजना आणावी, असे मिलिंद तुळसकर, सुभाष माळगी यांनी सांगितले. दरम्यान, वार्षिक अधिवेशनापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली, तेव्हा जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित होते.