लसीकरणात पक्षीय भेदभावाचा आरोप

नगर : महापालिका प्रशासन लसीकरणामध्ये भेदभाव करत आहे. सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भागातच लसीकरणाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागाला लसीकरणात डावलले जात आहे, असा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घातला. महापालिकेने आम्हाला लस विकत द्यावी, आम्ही ती नागरिकांना मोफत देऊ, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. येत्या दोन दिवसांत लसीकरण सुरळीत होईल, मनपातील पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेऊन लसीकरण उपकेंद्राचे नियोजन करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त गोरे यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा गोंधळ वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप विरुद्ध काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यामध्ये लसीकरणाचे डोस उपलब्ध करण्यावरून बाचाबाची झाली. मनपाने शहरात लसीकरणासाठी २० उपकेंद्रे सुरू केली. मात्र ही उपकेंद्रे राष्ट्रवादी व भाजपच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा व त्यातून शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागाला डावलले गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याचा निषेध करत आयुक्तांना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, माजी नगरसेवक विक्रम राठोड, अनिल शिंदे श्याम नळकांडे विजय पठारे सचिन शिंदे नीलेश भाकरे आदींनी आयुक्तांना घेराव घातला.

केंद्र सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपच्या सर्व नगरसेवकांना प्रत्येकी  १५० मात्रा उपलब्ध करण्यात आले, केडगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी खासगी जागेत लसीकरण केले आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी दिलीप सातपुते यांनी केली.

कल्याण रस्ता परिसर खूप मोठा असून या भागात फक्त २ टक्के लसीकरण झाले आहे. या भागातील बंद केलेले उपकेंद्र पुन्हा चालू करा, अशी मागणी शाम नळकांडे यांनी केली. लशीच्या वाटपात मनपा प्रशासनाने राजकारण न करता समान वाटप करावे, दुजाभाव करू नये, असा इशारा गणेश कवडे यांनी दिला.

करोना प्रतिबंधक लसीकरणात महापालिका प्रशासन पक्षीय भेदभाव करीत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त शंकर गोरे यांना सोमवारी घेराव घातला.