जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काही काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. पण, ‘ती घटना पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधातील उद्रेक होता. देशप्रेमी काश्मिरी तरुण हे आमचे बंधू असून आम्ही नेहमी त्यांच्यासोबत उभे राहू’ असं म्हणत युवासेनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. ‘काश्मिरी तरुणांना मारहाण करणारे जर आमचे कार्यकर्त असतील तर युवासेनेकडून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल’ असंही युवासेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एका परिपत्रकाद्वारे युवासेनेने आपली भूमिका मांडली आहे.


यवतमाळच्या वाघापूर परिसरातील वैभव नगर येथे बुधवारी रात्री युवा सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 15 ते 20 काश्मिरी विद्यार्थी यवतमाळमध्ये शिक्षण घेत असून यातील 3 ते 4 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती.

दरम्यान, लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनोले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधील काही तरुण यवतमाळमधील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बुधवारी संध्याकाळी सात ते आठ लोकांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांना वंदे मातरम बोलण्यास भाग पाडले. यातील आरोपींबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, ओळख पटल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.