ऐन उन्हाळ्यात चार दिवसातून एकदाही पाणीपुरवठा होत नसल्याने आणि कोले मळा, स्वामी मळा परिसरातील पाणीपुरवठय़ाकडे गेली तीन वर्षे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक व नागरिकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास बुधवारी टाळे ठोकले. यामुळे जलअभियंता,आरोग्य सभापती, काँग्रेसचे गटनेते यांच्यासह कर्मचा-यांना तासाहून अधिक काळ अडकून रहावे लागले. नगराध्यक्षा व मुख्याधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतर गुरूवारी याप्रश्नी स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.    
इचलकरंजीतील स्वामी मळा व कोले मळा या परिसरात पाणीपुरवठा अनियमित होतो. याबाबत अनेकदा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी तसेच आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात या भागाला आठवडय़ातून एक-दोन वेळा तोही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तेथील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. प्रभागाचे नगरसेवक मदन झोरे, प्रमोद पाटील, सयाजी चव्हाण,विठ्ठल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी पाणीपुरवठा विभागाकडे कूच केली. या विभागाच्या मुख्य दरवाजास टाळे ठोकण्यात आले. यामध्ये महिलांचा पुढाकार होता. टाळे ठोकल्यामुळे कार्यालयात असलेले जलअभियंता सुभाष देशपांडे, अन्य अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सभापती चंद्रकांत शेळके, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते यांना अडकून रहावे लागले, तर बाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करीत ठिय्याआंदोलन सुरू केले.    
शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर गटनेते जयवंत लायकर, तानाजी पोवार यांनी पालिकेत धाव घेतली. त्यांनी याप्रश्नी नगराध्यक्षा बिस्मिला मुजावर व मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संबंधित भागांतील पाणीपुरवठा समस्यांबाबत उद्या गुरुवारी सर्वसमावेशक चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली.