News Flash

वंचित बहुजन आघाडी आगामी विरोधी पक्ष

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

सध्या भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची आवक जोरात सुरू असून अजून कोणते नेते येणार हे लवकरच कळेल, असे सांगत पुढचा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल, असे सूतोवाच करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला. तसेच  मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासह विविध प्रकल्प राबवून मराठवाडा सिंचनाने समृद्ध करणार असून यापुढे मराठवाडय़ाला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे ते म्हणाले. नांदेड येथे वार्ताहर बैठकीत ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढल्या आहेत; परंतु त्यांच्या यात्रांना कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सत्तेवर असताना लोकांसाठी काही केलेले नाही, तसेच विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी व्यवस्थित काम केले नाही.  त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मराठवाडय़ाच्या अनेक भागात  दुष्काळसदृश परिस्थिती असून पाऊस आला नाही तर पिके राहतील की नाही, हे सांगता येणार नाही. मराठवाडय़ातील दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात असून त्यापकीच एक म्हणजे मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प आहे. मराठवाडय़ातील धरणांना लूप पद्धतीने पाईपलाईनच्या माध्यमातून जोडले जाणार असून ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. या प्रकल्पावर २० हजार कोटी रुपये खर्च केले जात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे ते या वेळी म्हणाले.

मराठवाडय़ाच्या हक्काचे वाहून जाणारे १०२ टीएमसी पाणी  मराठवाडय़ातच थांबावे यासाठी नवीन योजना आखली जात असून  कोकणातून वाहून जाणाऱ्या ३०० टीएमसी  पाण्यापकी १६७ टीएमसी पाणी उपसा सिंचन पद्धतीने मराठवाडय़ात आणले जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे मराठवाडय़ाच्या दुष्काळमुक्तीचा प्रकल्प ठरणार असून यापुढे मराठवाडय़ाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळमुक्तीचा नारा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 1:02 am

Web Title: vanchit bahujan aghadi devendra fadnavis mpg 94
Next Stories
1 भाजपा-सेना युती होणारच – चंद्रकांत पाटील
2 राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर
3 भाजपा सेना युती तुटणार ही खोटी बातमी – चंद्रकांत पाटील
Just Now!
X